माधुरी पेठकर
गिआडा. लेखिका. मध्य इटलीत राहणारी. तिचा जोडीदार एका दुकानात सहायक म्हणून काम करतो. दोघे तिशीच्या आतबाहेरचेच. गिआडाने तर अनेक ठिकाणी विनापगार काम केलेलं. आता कुठे तिला एका कंपनीत कामाचा पगार मिळू लागला आहे. तिला आणि तिच्या जोडीदाराला मूल हवंय. पण, मूल होणं आपल्याला परवडणारं नाही म्हणून गिआडाने आई होण्याची इच्छा पुढे ढकलली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे आई होणं परवडत नाही, अशा गिआडासारख्या इटलीत सध्या अनेकजणी आहेत. जिथे रोजचा खर्च भागवणंच अवघड, तिथे मूल होऊ देणं, ही परवडणारी बाब नाही. मी गरोदर राहिले तर कंपनी आपला नोकरीचा करार रद्द करू शकते, अशी भीतीही गिआडासारख्या अनेक महिलांना वाटते.
...आणि ही समस्या गंभीर आहे.
आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने इटलीमध्ये मूल होण्याचं नियोजन अनेक महिला पुढे ढकलत आहेत. पहिलं मूल तिशीनंतर होण्याचं प्रमाण मोठं आहे. इटलीतील ' डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिपोर्ट'च्या अहवालानुसार २०२२मध्ये ६२ टक्के महिलांनी ३० ते ३९ या वयात पहिल्या मुलाला जन्म दिला आहे.लग्न झाल्यानंतर लगेच मूल व्हायलाच हवं, असा सामाजिक दबाव काही इटलीमधील महिलांवर नाही. मात्र, परवडतच नाही म्हणून इच्छा असूनही अनेकजणी मूल होऊ देत नाहीत. एकदा का मूल झालं की, त्या स्त्रीची नोकरी करणं, मूल सांभाळणं अशी तारेवरची कसरत सुरू होते. तिथेही मुलांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी ही महिलांचीच मानली जाते. शिवाय पाळणाघरात मूल ठेवणं अतिशय खर्चिक आहे.ही समस्या ओळखून आता इटली सरकारने यंदाच्या आर्थिक नियोजनात मूल सांभाळण्याच्या व्यवस्था उभारण्यावर भर दिला आहे. ज्यांना दोन मुलं आहेत, त्यांना सोयी सवलती देण्याचे, त्यांची नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठीची पावलं येथील सरकार आगामी काळात उचलणार आहे. हे जेव्हा खरंच होईल तोवर तरी आईपण तिथे फार अवघड आहे.