Join us  

नोकरी करणारी आई मुलांना वेळ देत नाही? असे टोमणे ऐकून गिल्टी वाटणाऱ्या आईसाठी 'खास' मंत्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2023 4:58 PM

Its beneficial for your child if you are Working Women know how : एक ना अनेक प्रकारचे गिल्ट नोकरी करणाऱ्या महिलांच्या मनात सतत असतात.

वर्किंग मदर असणे हा एक अतिशय महत्त्वाचा टास्क असतो. एकीकडे घरातले सगळे मॅनेज करायचे. मुलांच्या वेळा, डबे, पाळणाघर याचे शेड्यूल बसवायचे आणि दुसरीकडे आपण मुलांना वेळ देत नाही म्हणून सतत असलेला गिल्ट. हे सगळे करताना महिलांची शारीरिक ओढाताण तर होतेच पण मानसिक आणि भावनिक ओढाताणही होते. आपण मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला जाऊ शकत नाही, इतर आयांसारखे आपण त्यांना हवे तेव्हा जवळ घेऊ शकत नाही असे एक ना अनेक प्रकारचे गिल्ट नोकरी करणाऱ्या महिलांच्या मनात सतत असतात. संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर मूल आपल्याला येऊन चिकटत असेल किंवा दिवसभरातील काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असेल तरी आपल्या डोळ्यापुढे घरातली कामं असल्याने आपण त्यांच्याकडे कितपत लक्ष देतो हा प्रश्नच आहे (Its beneficial for your child if you are Working Women know how ). 

त्यामुळे एकूण काय तर विकेंड आल्याशिवाय आपण काही आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही आणि त्याचे नकळत एकप्रकारचे ओझे आपल्या मनावर सतत असते. पण आई नोकरी करणारी असणे मुलांच्या वाढीच्या दृष्टीने अतिशय चांगले असते असे प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी यांचे म्हणणे आहे. आता असे कसे काय असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल पण यामागे ३ महत्त्वाची कारणे असून प्रिती यांनी ही कारणे आपल्याला सांगितली आहेत. ही कारणे कोणती आणि ती कशी फायदेशीर आहेत पाहूया...

(Image : Google)

१. आर्थिक स्वातंत्र्य

आपण नोकरी करत असल्याने आपल्याकडे आर्थिक स्वातंत्र्य असते. मग आपण एखाद्या कंपनीत काम करत असलो काय, प्रोफेशनल म्हणून काम करत असलो किंवा लहान मोठा उद्योग करत असलो तरी त्यामुळे आपल्यात कॉन्फीडन्स येतो. हा कॉन्फीडन्स आपल्या रोजच्या वावरण्यात आणि आपल्या निर्णय क्षमतेतही दिसतो. हा कॉन्फीडन्स आपल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. 

२. मूल स्वतंत्र होते

आपण नोकरी करत असल्याने मुलांना मायक्रो मॅनेज करण्यास आपल्याला पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे मूल नकळत स्वतंत्र होते आणि बऱ्याचशा गोष्टी लहानपणापासून आपले आपण हातानी करायला शिकते. याचा आपल्याला मुलांना वाढवताना खूप चांगला फायदा होतो. अनेकदा मुलं मोठी झाली तरी त्यांना काही सवयी नसतात आणि त्यांच्याकडे खूप लक्ष द्यावे लागते पण आई नोकरी करणारी असेल तर ही अडचण कमी जाणवते. तसेच आपली कामं आपण केल्याने मुलांमध्ये नकळत एकप्रकारचा आत्मविश्वास येतो. 

३. इतर लोकांचे योगदान वाढते

घरातली महिला जर घराच्या बाहेर पडत असेल आणि काम करत असेल तर नकळत घरातील इतर व्यक्ती घरातील कामात मदत करतात. मुलं अशा वातावरणात वाढतात तेव्हा लिंगभेदाबाबतचे प्रशिक्षण नकळत होते आणि त्यांच्यावरही तेच संस्कार होतात. अमुक कामे महिलांची आणि अमुक कामे पुरुषांची यासारख्या समजांपासून मुलं दूर राहतात आणि भविष्यात त्यांनाही त्याचा चांगला फायदा होतो. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं