मोबाइल हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील जवळचा मित्र आणि शत्रू झाला आहे. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांचेच आयुष्या या मोबाइल भोवती फिरत असताना दिसते. मात्र त्याचा आपल्या मनावर, भावनांवर, मानसिकतेवर आणि शरीरावर विपरीत परीणाम होत असल्याचे आपण वेळीच लक्षात घ्यायला हवे. पालक म्हणून मुलांचा स्क्रिन टाइम कमी करणे हे आज सगळ्याच पालकांपुढील एक मोठे आव्हान आहे. परंतु हॉलिवूडमधील प्रसिध्द अमेरिकन अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस हिने या मोबाइलच्या वापराबाबत आपल्या मुलांसाठी एक अतिशय महत्त्वाचा नियम केला आहे. त्यामुळे मुलांवर काही प्रमाणात बंधने राहण्यास मदत होते. जगभरात ज्युलिया रॉबर्टसच्या अभिनयाचे चहाते आहेत. पन्नाशी ओलांडलेली ज्युलिया आजही तितकीच सुंदर आणि आकर्षक दिसते (Julia Roberts reveals her one rule for her teenage kids parenting tips).
अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली ज्युलिया तिच्या खासगी आयुष्यातही अतिशय काटेकोर आहे हे बरेचदा आपल्याला दिसते. छायाचित्रकार असलेला डॅनियल मॉडर हा तिचा पती असून त्यांना १९ वर्षांची फिनियास आणि हेजल असा एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. तर १६ वर्षांचा हेन्री हा आणखी एक मुलगा आहे. ज्युलियाला एकूण ३ मुलं असून ते सगळे आता टिनएजमध्ये आहेत. त्यांना वाढवताना तिच्या घरात एक खास नियम तिने लागू केला आहे. त्या नियमाबद्दल नुकतेच समोर आले आहे. टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही आमच्यासाठी काही साधे नियम घालून घेतले आहेत. घरात पोहोचल्यावर चार्जिंग स्टेशनमध्ये प्रत्येकाचा फोन जातो. त्यामुळे आमच्याकडे जेवणाच्या टेबलवर फोन नसतात. रात्रीचे जेवण सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत घ्यावे हा त्यामागचा हेतू असतो.
पालकत्त्वाची आपली भूमिका घरात आणि बाहेर सारखीच असते असेही ज्युलिया म्हणाली. मुलं मोठी होत असताना ज्युलिया त्यांना आजही त्याच प्रेमाने आणि काळजीने सांभाळत असल्याचे दिसते. ज्युलिया तिच्या वैयक्तिक आयुष्यातला खासगीपणा जपत असली तरी गेल्या काही वर्षात तिने आपल्या पालकत्त्वाबाबतच्या काही गोष्टी जाहीरपणे सांगितल्याचे दिसते. आपली जुळी मुलेही लहान मुलांप्रमाणेच आजही आपले सगळे ऐकतात असं ती अतिशय आनंदाने सांगते. मी आणि माझे पती डॅनियल आमची मतं ठाम आहेत.जगण्याकडे आणि जगाकडे सहानुभूतीने पाहावे असे आम्हाला वाटते.आमच्या मुलांमध्येही आम्ही या गोष्टी उतरवण्याचा प्रयत्न करतो असेही ती म्हणाली.