काजोल, तिचा अभिनय आणि तिचे चित्रपट आजही चर्चेचा विषय असतात... मागच्या २०- २५ वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या काजोलचा ५ ऑगस्टला वाढदिवस (5th August- Kajol's Birthday) असतो. यावर्षी ती वयाची ४८ वर्षे पुर्ण करते आहे. या वयातही तिचं सौंदर्य आणि तिचा फिटनेस हा अनेकांसाठी चर्चेचा विषय असतो. सौंदर्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी आणि नंतर टिकवण्यासाठी तिने काय केलं किंवा काय करते, याची माहिती ती नेहमीच शेअर करत असते. यावेळी मात्र तिने एक आई म्हणून (Kajol as a mother) मुलांचं संगोपन ती नेमकं कशा पद्धतीने करते, हे सांगितलं आहे. (Parenting tips shared by kajol)
स्टार आणि त्यांचे स्टार किड्स हा सर्वसामान्यांसाठी नेहमीच एक औत्सुक्याचा विषय असतो. सर्वसामान्य लोकांसाठी जरी ते स्टार आणि स्टार किड्स असले तरी प्रत्यक्षात मात्र एक सर्वसामान्य पालक आपल्या मुलांची जशी काळजी घेतो किंवा मुलांबद्दल त्याच्या ज्या अपेक्षा असतात, थोड्याबहुत फरकाने तशाच अपेक्षा सेलिब्रिटींच्याही त्यांच्या मुलांकडून असतातच. शेवटी स्टार किंवा सेलिब्रिटी असले तरी ते पालकच आहेत. म्हणूनच तर १९ वर्षांची न्यासा आणि ११ वर्षांचा मुलगा युग यांना कशी शिस्त लावते, याविषयी काजोलने सांगितलेल्या या काही गोष्टी थोड्या फार फरकाने सर्वसामान्य पालकांना आणि त्यांचा मुलांनाही लागू होतातच. काजोलच्या पॅरेंटिंग टिप्सबाबत या काही गोष्टी टाईम्स ऑफ इंडियाने शेअर केल्या आहेत.
मुलांना शिस्त लावण्यासाठी काजोलचे नियम
१. हिशोब विचारते
आई- वडील दोघेही बडे स्टार. त्यामुळे त्यांच्या मुलांना पैशाबाबत विचारणार कोण, असं काजोलच्या मुलांबाबत समजत असाल तर ते चुकीचं आहे. काजोल म्हणते की मुलांना पैशांचं महत्त्व कळावं म्हणून तिने त्यांना प्रत्येक खर्चाचा हिशोब देण्याची सवय लावली आहे. मुलांना खर्चायला पैसे दिलेच तर किती खर्च झाला, कुठे किती पैसा गेला याचा सगळा तपशील तिची मुलं तिला देतात
२. शिक्षक आणि विद्यार्थी
काही वर्षांपुर्वी मुलीच्या वाढदिवसानिमित्त बोलताना काजोल म्हणाली होती की आईपण ही आयुष्यातली सगळ्यात कठीण परिक्षा आहे. या परीक्षेत तुम्हाला आईची भूमिका तर पार पाडावीच लागते, पण त्यासोबतच शिक्षण आणि विद्यार्थी या दोन्ही गोष्टींमधून जावं लागतं. कधी शिक्षक होऊन मुलांना शिकवावं लागतं तर कधी विद्यार्थी होऊन त्यांच्याकडून किंवा त्यांच्यासाठी काही गोष्टी शिकाव्या लागतात.
३. टिका झाल्यास...
स्टार किड्सला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे ती वेळप्रसंगी तिच्या मुलांना त्यासाठी नेहमीच तयार करत असते. ज्या लोकांना आपण ओळखतही नाही, त्यांच्या बाेलण्याकडे दुर्लक्ष करा, असं ती तिच्या मुलांना सांगते.
४. मुलांवर प्रेम करा
काजोलच्या मते तुम्ही मुलांवर किती प्रेम करता, हे मुलांना कायम लक्षात राहतं. सगळेच पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात. पण ते प्रेम त्यांच्याकडे व्यक्त करा. प्रत्येक दिवशी तुमच्या कृतीतून, बोलण्यातून ते त्यांना जाणवू द्या.
५. मुलांना कंट्रोल करत नाही
काजोल म्हणते ती काही खूप कंट्रोलिंग आई नाही. तिच्या मते मुलांवर असं कायम लक्ष ठेवणं, आपलं म्हणणं त्यांच्यावर लादणं यामुळे नात्यातला मोकळेपणा कमी होत जातो.