‘माझी लेक रुही युट्यूब उघडते, स्वत:चं नाव टाइप करते, रुही जोहर, तिचे व्हिडिओ येतात, ती ते पाहत बसते.. मला वाटतं ती मेगॉलोमेनियाक झाली आहे.’ करण जोहर हसत सांगत असतो. मेगॉलोमेनियाक म्हणजे अशी व्यक्ती जी स्वत:ला श्रेष्ठ समजते, जिच्यात आपण इतरांहून भारी आहोत अशी भावना असते. करण सांगतो, ती स्वत:चीच फॅन झाली आहे, इंटरनेटवर जाऊन स्वत:चेच व्हिडिओ पाहते..’ - एक बाबा म्हणून करण जोहर हे कौतुकानं सांगत असला आणि सर्वांनाच आपल्या मुलाचं कौतुक असतं, त्यांचे व्हिडिओ स्वत: पाहण्यात आणि इतरांना दाखवण्यात रस असतो पण हे सारं मुलांच्या वाढीसाठी कितपत योग्य, हे ‘शॅरेण्टिंग’ अतीच होत चाललं आहे का याचा आता जगभर विचार सुरु झाला आहे. करण जोहर आपल्या लेकीविषयी जे काैतुकानं सांगतात ते शेरेण्टिंगचाच भाग आहे.
असतं काय हे शेरेण्टिंग हे पाहण्यापूर्वी करण जोहर काय म्हणाला ते जरा तपशीलवार पाहू. सोशल मीडीया स्टार जेनीसला त्यानं अलीकडेच मुलाखत दिली. जेनीसने त्याला प्रश्न विचारला,की सोशल मीडियाच्या काळात तुम्ही मुलांच्या वाढीकडे कसं बघतात. कॅमेऱ्यासमोर मुलांना आणणं न आणणं. काहीजण आपल्या मुलांची प्रायव्हसी जपतात. तुमचं याविषयी काय मत?
(Image : Google)
या प्रश्नाला उत्तर देताना करण जोहर म्हणाला, ‘ हे प्रत्येकानं ज्याचं त्याचं ठरवायचं असतं. मी मुलांसह व्हिडिओ करायला लागलो लॉकडाऊनमुळे. लॉकडाऊनच्या काळातच सुरु झालं हे सारं. सगळे घरात होते, करायला काहीच नव्हतं. मी घरीच होतो. मुलांसोबत एक व्हिडिओ केला टाकला, तो सगळ्यांना आवडला. आनंद वाटला त्या व्हिडिओने, सर्वांना मुलं क्यूट निरागस वाटली, त्या निरागसपणाचा आनंद होता.’
करण जोहरला सरोगसीने २०१७ मध्ये दोन मुलं झाली. मुलगा यश आणि मुलगी रुही. मुलांसोबत ते छोटे व्हिडिओ करतात, त्यात मुलं गाणी म्हणतात, वडिलांशी गप्पा मारतात. पाच वर्षांची मुलं जितपत बोलतात तितपतच असतं ते. मात्र सेलिब्रिटी असल्यानं ते व्हिडिओ खूप पाहिले जातात, त्याच्या बातम्याही होतात.
त्यालाच अनुसरुन करण जोहर सांगतो, की ते व्हिडिओ पाहून पाहून आता रुहीच इंटरनेटवर स्वत:चं नाव टाइप करुन स्वत:चे व्हिडिओ पाहू लागली आहे. स्वत:चेच व्हिडिओ पाहण्याचा तिला नाद लागला आहे.’
(Image : Google)
शेरेण्टिंग काय असतं?
करण जोहर आपल्या लेकीविषयी जे कौतुकानं सांगतात तसं अनेक पालक सांगतात. आपल्या मुलांचे फोटाे, व्हिडिओ सर्रास सोशल मीडीयात टाकतात. व्हॉट्सॲप ग्रूपवर नातेवाईक, मित्रमैत्रिणींना पाठवतात. लाइक्स-लव्ह जास्त आले की खुश होतात. युट्यूबवरही टाकतात. काहीजण तर मुलांच्या नावाने स्वत:च अकाऊण्ट चालवतात.
पालकांनी मुलांचे फोटो व्हिडिओ असे सोशल मीडियात पोस्ट करणं, सतत पोस्ट करणं त्याला शेरेण्टिंग असं म्हणतात.
आता जगभर चर्चा सुरु झाली आहे की असं शेरेण्टिंग योग्य नव्हे, मुलं लहान असली तरी मुलांच्या खासगीपणाच्या अधिकारावर ते पालकांचं अतिक्रमण आहे. आणि त्यातून पालक मुलांचा वापर स्वत:ची लोकप्रियता वाढवण्यासाठीही करत असल्याचे दिसते.
(Image : Google)
शेरेण्टिंगचा मुलांवर काय परिणाम होतो?
पहिला परिणाम हा की जसं रुही आपले व्हिडिओ पाहू लागली आहे तसं सामान्य मुलंही आपले सोशल मीडियातले फोटो व्हिडिओ पाहत बसतात.
कुणी लाइक केलं, कुणी कमेण्ट केली, नाही केली याची नोंद दहा वर्षांच्या आतली मुलंही ठेवू लागतात.
आपण कसे दिसतो, फोटोत कसे दिसतो हे पाहतात, फिल्टर लावायला शिकतात. आणि त्यातून त्यांची बॉडी इमेज, दिसणे, आत्मविश्वास यासाऱ्यावरच परिणाम होऊ शकतो.
पालकांनी काय करावं?
याचा अर्थ उत्साहानं कधीतरी पालकांनी मुलांसोबतचे फोटो शेअरच करु नयेत का?
तर करावे. कधीमधी, निमित्ताने करायला काहीच हरकत नसते.
मात्र ते पब्लिक नसावे. फक्त फ्रेण्ड्सपुरतं सेटिंग योग्य.
आपल्या मुलांच्या फोटोचा वापर कशासाठी केला जाईल याचा काहीच अंदाज नसतो, पालकांनी ते तारतम्य जरुर बाळगावे.
मुलांनी हातातले फोन सोडून दुसरं काहीतरी करावं अशी अपेक्षा असलेले पालकच सतत सोशल मीडियात असतात, तिथं काय टाकायचं याचा विचार करतात हे मुलांच्या नजरेतून सुटत नाहीच. स्क्रिन टाइम हा प्रश्न वाढीस लागलेला दिसतोच.