काळानुसार असंख्य गोष्टी बदलत जातात पण या बदलत्या गोष्टींना आपण कसे सामोरे जातो हे अतिशय महत्त्वाचे असते. आपल्या प्रत्येकावर असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्या निभावण्याची आपली पद्धत यामुळे आपलं आयुष्य नक्कीच सुकर होऊ शकतं. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली आणि आता ती २ मुलांची आई आहे. एकीकडे करिअर, आईपण, संसारातील इतर जबाबदाऱ्या आणि ग्लॅमर हे सगळे सांभाळताना तिचीही ओढाताण होतच असेल कदाचित. पण या सगळ्याकडे करीना कशी पाहते हे सांगणारी एक स्टोरी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. असंख्य पातळ्यांवर एकावेळी लढणाऱ्या आईची गोष्टच करीना या पोस्टमधून आपल्याला सांगते. अभिनेत्री असली म्हणून काय झालं, प्रत्येक स्त्रीला करावा लागणारा झगडा कमी अधिक प्रमाणात तिलाही करावाच लागत असणार. पण या सगळ्याकडे ती कशापद्धतीने पाहते ते अतिशय महत्त्वाचे आहे (Kareena Kapoor Instagram story about motherhood) .
या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे “एकीकडे करिअर, वय वाढत असलेल्या पालकांची काळजी, घराची साफसफाई, स्वयंपाक, मित्रमंडळी, आपण चांगले दिसावे यासाठी सुरू असलेला झगडा, मुलांच्या शाळा, शेड्यूल असे सगळे करावेच लागते. आपला संसार म्हणजे आपल्यासाठी एक वेगळं गाव असतं पण हे गाव तुम्हाला कोणी तयार करुन दिलेलं नसतं तर ते तुमचं तुम्हाला तयार करायचं असतं.
मुलांना स्वतंत्र मोबाइल घेऊन देण्याचे योग्य वय कोणते? तज्ज्ञ देतात याचे नेमके उत्तर...
यासाठी लागणारी ऊर्जाही तुमची तुम्हालाच मिळवायची असते. हे सगळे करताना तुम्ही खूप बिझी आहात असे दाखवून चालत नाही कारण ते रुड वाटू शकते.तसेच हे सगळे करता म्हणून तुम्ही फारच अवतारात आहात असेही नको तर सगळ्या गोष्टी करताना तुम्ही छानही दिसायला हव्यात. शेवटचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विशेष म्हणजे हे सगळे करताना ते अवघड आहे असं म्हणण्याचीही तुम्हाला परवानगी नसते कारण ते तुम्ही तुमच्या इच्छेने निवडलेले असते.”
२०२३ मध्ये आईपण निभावण्याचा वेडेपणा करताना असे या पोस्टचे टायटल असून हे अतिशय खरे आहे असे करीनाने ते आपल्या स्टोरीमध्ये ठेवताना म्हटले आहे. त्यामुळेच जगातील प्रत्येक आईला या सगळ्या किंवा यापेक्षा कमी-जास्त पातळ्यांवर लढायचेच असते हे आई म्हणून तुम्ही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे तुम्ही आईपणाच्या किंवा बाईपणाच्या प्रवासात थोड्या जरी थकला असाल तर करीनाची ही पोस्ट तुम्हाला नक्कीच बूस्ट कऱणारी ठरु शकते. कारण प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहणे हा परिस्थिती उत्तमपणे हाताळण्याचा सोपा मार्ग असतो हे नक्की. आईपण ही अतिशय सुंदर आणि तितकच आव्हानात्मक गोष्ट असते हे आई झालेली प्रत्येक स्त्री अनुभवतेच. पण ही कसरत सुकर व्हावी तर करीनाने दिलेला हा मंत्र नक्कीच उपयोगी ठरेल.