बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी बेबो वयाच्या चाळीशीत असली तरी तिचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. २ मुलांची आई असलेली करीना सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर संसारात रमल्याचे दिसले. तैमूर आणि जेह या आपल्या लाडक्या मुलांसोबत करीना नेहमीच काही ना काही पोस्ट करताना दिसते. कधी ती मुलांसोबत रंगपंचमी खेळताना दिसते तर कधी त्यांना सुट्टीसाठी एखाद्या ट्रिपला घेऊन जाताना. इतकेच नाही तर आपल्या मुलांच्या वाढीकडे करीनाचे अतिशय बारीक लक्ष असते. मुलांचा चांगला विकास व्हावा यासाठी मी दिवसभरात कितीही बिझी असले तरी झोपताना त्यांना गोष्टी वाचून दाखवते असे करीनाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले (Kareena Kapoor Parenting Tips Unicef).
करीनाचा तैमूर हा मोठा मुलगा आता ६ वर्षांचा असून जेह २ वर्षांचा आहे. कुटुंब हे आपले प्राधान्य असल्याचे करीनाच्या बोलण्यातून अनेकदा समोर येते. युनिसेफतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात करीनाने हजेरी लावली होती. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या शाळेत युनिसेफचे पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षक यांच्याशी संवाद साधताना करीनाने वाचनाचे महत्त्व सांगितले. इतकेच नाही तर या शाळेतील लहान मुलांना जमिनीवर बसून तिने पुस्तकातील गोष्टही सांगितली. लहान मुलांना गोष्टी सांगितलेल्या आवडतात, त्यामध्ये ते छान रमतात. म्हणूनच दिवसभर आपण कितीही बिझी असलो तरी रोज रात्री झोपताना आपण मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, पुस्तक वाचून दाखवतो असे करीना म्हणाली.
करीना म्हणाली, मी खूप उशीरा वाचन सुरू केले पण मुलांना लहान वयापासून वाचनाची सवय लावायला हवी. त्याचा त्यांना केवळ शिक्षणातच उपयोग होतो असे नाही, तर शब्दसंपदा वाढण्यासाठी, संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी आणि विचारप्रक्रिया चांगली होण्यासाठीही वाचन अतिशय महत्त्वाचे असते. एक आई म्हणून वाचनाचा माझ्या मुलांवर होणारा परीणाम मी अनुभवत आहे असे सांगताना ती आपल्या मुलांना वाचनाशी जोडून ठेवण्यासाठी काय करते हे तिने सांगितले.
पुढे ती म्हणाली, मी किंवा सैफ दोघांपैकी एक जण कितीही बिझी असलो तरी १५ ते २० मिनीटे गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढतो आणि मुलांना गोष्ट सांगतो. तैमूर आता कळण्याच्या वयात असल्याने त्याला पंचतंत्र, अकबर-बिरबल, अमरचित्र, अल्लाउद्दीन या गोष्टी आवडतात. तर जेह लहान असल्याने त्याला परीकथांमध्ये मजा येते. तुम्ही वर्कींग असाल आणि तुम्हाला हे करणे अवघड होत असेल तर आजी-आजोबा, काका-काकू, मावशी असे कोणीही गोष्ट नक्की सांगू शकते असा सल्लाही करीना जाता जाता पालकांना देते.