डॉ. श्रुती पानसे (अक्रोड उपक्रम संचालक आणि मेंदूअभ्यास तज्ज्ञ)
आपल्याकडे सध्या दोनही प्रकारचे पालक आहेत. एक प्रकारचे पालक, जे मुलांना म्हणतात की तू तुझा अभ्यास कर. कोणत्या विषयात पुढचं शिक्षण घ्यायचं आणि पुढे जाऊन कशात करिअर करायचं ते तुझं तू ठरव. दुसऱ्या प्रकारचे पालक अर्थातच, सर्व काही स्वत:च्या हातात ठेवणारे. अमुक करिअर तुला करायचं आहे, त्यासाठी या परीक्षा पुढे द्याव्या लागतील. म्हणून आत्ता नववी दहावीला खूप अभ्यास करावा लागेल आणि हे इतके क्लास लावावे लागतील. पहाटेपासून रात्री पर्यंत अशांची मुलं वेगवेगळे क्लास लावतात आणि मार्क मिळवण्याच्या पाठीमागे लागतात. अनेकांना यात ९० टक्क्यांच्या पुढे मिळतात. इतके मार्क मिळाले आहेत तर आता सायन्सला जा, असं मग सगळेच म्हणायला लागतात. मूल दहावीत गेलं की घरोघर असं वातावरण बदलू लागतं.
यंदा मूल दहावीत आहे का?
१. मूल दहावीत असेल तर वास्तविक हे दोनही प्रकार न करता सुवर्णमध्य गाठायला पाहिजे. शाळेचा अभ्यास पुरत असेल तर अनेकांना एक क्लास लावण्याचीही गरज नसते. क्लासशिवायही हवे तेवढे मार्क मिळतात. त्यामुळे आधी ती चाचपणी करावी.२. ज्या विषयात मार्क कमी मिळत आले आहेत, त्या विषयासाठी जास्त वेळ देऊन अभ्यास करण्याची, प्रयत्नपूर्वक मार्क मिळवण्याची गरज असतेच. म्हणून अभ्यासाच्या वेळापत्रकात त्यासाठी पुरेसा वेळ ठेवणं, अन्य शिक्षकांचं मार्गदर्शन घेणं हे करावं लागतं.
३. जे पालक अजिबातच काही अपेक्षा ठेवत नाहीत त्यांच्या मुलांमध्ये पुरेशी प्रेरणा निर्माण होणं हे फार गरजेचं असतं. अजून थोडा जास्त अभ्यास केला असता, सराव केला असता, तर जास्त बरं झालं असतं. असं नंतर वाटून उपयोग नसतो. म्हणून घरातलं वातावरण हलकं फुलकं ठेवण्याबरोबर अभ्यासाकडे नेहमीपेक्षा जास्त लक्ष आहे ना हे बघितलं पाहिजे.४. तसंच खूप जास्त अपेक्षा करून मुलांना दडपणाखाली ठेवलं तर अनेक क्लास लावूनही, नेमकं परीक्षेच्या वेळी मुलांमध्ये चिंतेचं प्रमाण वाढतं. ताण वाढतो. काहीच आठवत नाही. दडपणामुळे किंवा जागरणामुळे आधी नीट झोप झालेली नसेल तरी मेंदूवरचा ताण वाढतो. आणि आठवत नाही. गोंधळ होतो. म्हणून घरचं वातावरण महत्वाचं आहे.५. मूल दहावीत असेल यंदा तर हा समतोल घरात राखता यायला हवा.