Join us  

‘तसलं’ नाही आमच्या घरात! आपल्या मुलांना भयंकर व्यसन लागलं आहे हे पालकांना कळतही नाही कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 5:09 PM

मुलांना व्यसन का लागतं हे समजून त्यावर उपाययोजना करायला हव्या, मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

ठळक मुद्देआता प्रश्न असा आहे की ही मुलं व्यसनी का झाली?

डाॅ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)त्रिपुरा राज्यात नुकतीच एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीनुसार येथील शाळा व काॅलेजात शिकत असलेल्या सुमारे आठशेहून अधिक विद्यार्थ्यांना एचआयव्हीचा बाधा झाल्याचे आढळले, त्यापैकी ४७ जणांचा एड्स झाल्याने त्यांचा मृत्यूही झाला. या राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. ‘त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटी’ने सुमारे २२० शाळा व २४ काॅलेज मुलांची तपासणी केली. त्यात असे आढळले की इंजेक्शन व सुयाद्वारे काही विद्यार्थी ड्रग्ज घेतात. त्यात बहुतांश सर्व मुलांचे आईवडील दोघंही नोकरी करतात. त्यांना अचानकच समजले की आपल्या मुलांना एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे तेव्हा अर्थातच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एकाच सुयीने अनेकजण नसांवाटे ड्रग्ज घेत होते, त्यामुळे हा संसर्ग एचआयव्ही संसर्ग झाला होता.त्रिपुरातली ही मुलं काय आणि पुण्यात पोर्श कारच्या अपघातात १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत केलेला कार अपघात काय? मुंबईतलं वरळीतलं प्रकरण काय, सगळीकडे व्यसन हा एक मोठा धागा आहे. आता प्रश्न असा आहे की ही मुलं व्यसनी का झाली?त्रिपुरातील ही मुलं काही अपवाद नव्हेत, मुलांमध्ये व्यसनाधिनता वाढते आहे आणि त्यावर उपाययोजना करावी लागेल. व्यसनाच्या जोखडात अडकलेल्यांना मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. ‘व्यसन, ही वर्तणुकीची एक समस्या आहे. अशी मुले बंडखोर असतात. काहींचा शाळेतला अभ्यासातला परफाॅर्मन्स सर्वसाधारण असतो. अपराधीवृत्ती असते त्यामुळे त्यांच्याकडून गुन्हेगारी कृती होण्याची शक्यता अधिक असते. आत्मविश्वासाचा अभाव असतो. ते चिंताग्रस्त असतात व त्यांच्यात स्वनियंत्रणाचा अभाव असतो. पौगंडावस्थेत लागलेले व्यसन हा आचरण विकार किंवा असामाजिक व्यक्तिमत्त्व विकार यासारखा एक मानसिक आजार असू शकतो. अशा व्यसनी मुलांकडून वाहन अपघात, सायकल अपघात व हिंसाचार होण्याची शक्यता अधिक असते.जर एखाद्या मुलामध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत असतील, त्याचा शाळेतला अभ्यासात परफाॅर्मन्स कमी झालेला असेल, त्याच्याकडून एखादा अपघात झालेला असेल अथवा त्याला वारंवार श्वसनसंस्थेचे आजार होत असतील तर त्याला एखादे व्यसन जडल्याची शक्यता असते.नक्की होतं काय?१. पौगंडावस्थेतला व्यसनी मुलांना ‘डिप्रेशन’ असू शकते, त्याचबरोबर त्यांच्यात अतिचंचलता व एकाग्रतेचा अभाव दिसून येतो. तसेच त्यांच्या चिंताविकार-एन्झायटी अथवा खाण्याचे विकार असू शकतात.२. मित्रांनी आग्रह केल्याने ड्रग्ज घेणे किंवा पिअर प्रेशरमुळे ड्रग्ज घेणे आणि ड्रग्जचे व्यसन लागणे यात मोठा फरक आहे. व्यसनाच्या कारणात मानसिकता, जैविक घटक यांचा समावेश असतो.३. व्यसनासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रग्जचे साधारणपणे उत्तेजक व गुंगी आणणारे असे दोन प्रकार आहेत.४. व्यसन करण्यासाठी तंबाखू, सिगारेट, अल्कोहोल व गांजा या गोष्टी सहज उपलब्ध होतात. पण कोकेन, हेराॅईन, एमएसडीसारखे ड्रग्ज मात्र महागडे असून, ते विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात.५. व्यसन जडलेला मुलगा ड्रग्ज कधी कधीच घेतो की नेहमी घेतो अथवा तो हे ड्रग्ज ग्रुपमध्ये घेतो, की एकटाच असताना घेतो यावर त्याच्या उपचाराच्या दिशा ठरतात. त्याचबरोबर तो हे ड्रग्ज कितीदा घेतो, कधी घेतो हे पहावे लागते. उदा. वीकेण्डला घेतो की शाळा, काॅलेजमध्ये जातानाही रोज घेतो.६. त्याला चांगली झोप लागते का, झोपेच्या समस्या आहेत का, तो जागरण करतो का? आणि तो मोबाइल, लॅपटॉपयासारख्या स्क्रीनचा वापर किती वेळ करतो, या बाबी उपचार करताना विचारात घ्याव्या लागतात.७. मुले ड्रग्जच्या आहारी गेल्याने अनेक समस्या उद्भवतात. बालगुन्हेगारीचे प्रमाण अशा व्यसनी मुलात अधिक असते. व्यसनग्रस्त मुले चोरी, घरफोडी, ड्रग्जचा व्यवसाय, वेश्यागमन करू लागतात. असुरक्षित लैंगिक संबंधातून गर्भारपण व लैंगिकतेतून प्रसार होणाऱ्या आजाराला ते बळी पडतात. नसांद्वारे ड्रग्ज घेतल्याने हिपॅटायटीस ‘बी’, ‘सी’ व एचआयव्ही संसर्गाचा त्यांना धोका असतो.

व्यसनांवर उपचार काय?१. व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यासाठी एखाद्या औषधाचे व्यसन सुटते, असे नाही. त्यावरच्या उपाययोजना क्लिष्ट असून, त्यात पालक, डाॅक्टर, शिक्षक, समुपदेशक या सर्वांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागते. व्यसन सोडण्यासाठी ग्रुप/ व्यक्तिगत काउन्सिलिंग करण्यात येते. मुलाला असलेल्या मानसिक आजारावर इलाज करावे लागतात.२. मुलांना व्यसनाच्या पाशातून मुक्त करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांना संरक्षण द्यावे. महत्त्वाचे म्हणजे मुलांना भावनिक आधार द्यावा. पालकांचा जर मुलांशी मुक्त संवाद असेल तर अशा व्यसनाच्या समस्या अभावानेच उद्भवतात.३. शाळा-काॅलेजमध्ये व्यसनविरोधी वा व्यसनमुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींजचे आयोजन करून मुलांना व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन व मदत करायला हवी. यासाठी समाजात मुलांना आदर्श असणाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. मुलांवर प्रेशर न आणता अगदी मुक्त वातावरणात त्यांचा अभ्यासाचा परफाॅर्मन्स उंचावेल, अशाप्रकारच्या कृतियोजनांची अंमलबजावणी शाळेतून नियमित करणे व्यसनमुक्त मुलांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.४. मुलांना व्यसन जडू नये म्हणून व जडले तर त्याला त्या विळख्यातून सोडवण्यासाठी पालकांना सजग भूमिका बजवावी लागेल.dr.sanjayjanwale@icloud.com

टॅग्स :मुलांमध्ये तारुण्यलहान मुलंआरोग्यशिक्षणपालकत्व