डॉ. श्रुती पानसे (अक्रोड उपक्रम संचालक आणि मेंदूअभ्यास तज्ज्ञ)शाळा ही मुलांची आवडती जागा असायला हवी. कारण तिथे अभ्यास तर असतोच पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे मित्र मैत्रिणी मिळतात. गप्पा मारायला, खेळायला, डबा खायला मजा येते. अशी मजा घरात बसून मिळत नाही. असं असलं तरी काही मुलांना शाळेत जायचं, हीच एक चिंता वाटते. शाळेत जायची इच्छा नसते. मुलांना स्कूल एंझायटी असते, असं का होतं? स्कूल एंझायटी म्हणजे नेमकं काय?
स्कूल एंझायटी म्हणजे नेमकं काय?१. शाळेत सुरक्षित वाटत नसेल, शिक्षक किंवा इतर मुलंमुली यांचे अनुभव चांगले आले नाहीत तर मुलांना शाळा नकोशी होते. २. शाळेत शिक्षकांविषयी आत्मीयता वाटली नाही तर शाळेत जाणं हा एक चिंतेचा विषय होऊन बसतो. ३. इतर मुलं, त्यातही काही दांडगट मुलं अरेरावी करत असतील, भीती दाखवत असतील तर मुलं शाळेला जायला नकार देतात.
४. अभ्यास जमत नसेल, तर तो आवडेनासा होतो. त्याचंच एक ओझं होऊन बसतं. ते ओझं टाळण्यासाठी मुलं शाळेत जात नाहीत. न जमणारा अभ्यास हाच एक शत्रू होऊन बसतो. जड पावलांनी आणि तेच एक ओझं घेऊन मुलं शाळेत येतात. पण तिथे ती चिंतेत असतात. ५. अशीच काही वर्ष गेली की मुलांचा अभ्यासातला आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे मित्रमैत्रिणींमधला रस ही कमी होतो. शाळा नकोशी वाटते. या आणि याप्रकारच्या अनेक कारणांमुळे स्कूल एंझायटी निर्माण होऊ शकते.
करायचं काय? दिवसभरातला सर्वच महत्वाचा वेळ, खरं तर जागेपणीचे अनेक तास मुलं शाळेत काढतात. या वेळात त्यांच्या मनात सकारात्मक भावना असायला हव्यात. कारण मुलांच्या व्यक्तिमत्वाचा पाया याच वयात बांधला जात असतो. अभ्यास, खेळ, विविध – आवडतील त्या कलांचं शिक्षण या गोष्टीत रमण्यासाठी मुलांच्या मनात उभारी असायला हवी. मैत्री करणं, धिटाईने बोलणं, मतं बनवणं, प्रश्न विचारणं अशी कित्येक प्रकारची सामाजिक कौशल्य मुलं या वयात आसपासच्या परिसरातून म्हणजेच घर, शाळा, इतर संस्था यातून मुलं जे अनुभव घेतात, त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं. म्हणून शाळेतलं वातावरण फार महत्वाचं असतं. त्यामुळे मुलांना स्कूल एंझायटी असेल तर त्यावर उपाय शोधायला हवा. मुलांना मारुन, रागावून शाळेत पाठवणं हा काही उपाय नव्हे.