Join us  

बाहुलीचा खून करायला शिकवणारं मोबाइलचं खेळणं मुलांच्या हातात दिलं कुणी? दोष द्यायचा तर कुणाला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 6:15 PM

मुलांना बाजारातून आणलेला मोबाइल नको असतो, त्यांना हवं असतं प्रेम-सुरक्षितता-स्वातंत्र्य आणि विश्वास; पण हे सारं त्यांना देण्याची पालकांची तयारी आहे का?

ठळक मुद्देआता दिवसरात्र सतत मुलांच्या समोर जो स्क्रीनचा मारा होत आहे, त्याचा मुलांवर काय परिणाम होत असेल ?

रंजना बाजी

मुलगा लहान असताना त्याचा बाबा त्याला गोष्ट सांगायचा. उंट आणि कोल्हा नदीजवळ उसाच्या शेतात जातात, ऊस खातात, इ. इ.एकदा बाप-लेक स्कूटरवरून जाताना नदीवरच्या पुलावरून निघाले होते. बाबानं सांगितलं, ही नदी बरं का ! लेक म्हणाला, आता उंट, कोल्हा दाखव.उंट, कोल्हा यांची गोष्ट होती, ते खरं नव्हतं, हे लेकाला कळूच शकलं नाही. मुळात खोटं असं काही असतं, हे मुलांना माहीत नसतं.मूल नेहमी खऱ्या जगात असतं. खोटं त्याच्या जगात नाही. काही गोष्टींची मूल कल्पना करेल; पण ती कल्पना मूल जगत असलेल्या सत्यावर बेतलेली असेल.मुलानं बाबाकडून उंट, कोल्ह्याची ती गोष्ट एक-दोनदा नुसती ऐकली तरी त्याच्यावर एवढी बिंबली गेली होती. मग आता दिवसरात्र सतत मुलांच्या समोर जो स्क्रीनचा मारा होत आहे, त्याचा मुलांवर काय परिणाम होत असेल ?काल-परवाचीच बातमी, मुलाने बाहुलीला फास लावला आणि स्वत:लासुद्धा. मुलांसाठी खरं-खोटं असं काहीच नसतं. त्यांना सगळी दुनिया खरी वाटते; कारण ती सत्यात जगत असतात. मोबाइल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत. खोटं आहे, हे त्यांना कळत नाही. स्क्रीनवर जे जे दिसतं ते खोटं असतं, त्यावर विश्वास ठेवायचा नाही, हे त्यांना मुळात कळत नाही; कारण खोटं काय हेच, त्यांना माहीत नसतं.

(Image : Google)

मोबाइल आणि इतर स्क्रीन त्यांच्यासमोर येतात तेव्हा ते आभासी, काल्पनिक आहे, हे मुलांना कळत नाही. जे समोर आहे त्यावर मूल विश्वास ठेवतंच. अशा नकळत्या वयात मुलं मोबाइल, टीव्ही, टॅबला सामोरे जातात. ते पाहून मुलांवर कोणत्या गोष्टींचा काय परिणाम होत असेल, त्यातून ते काय उचलत असेल, त्या गोष्टी मुलांपर्यंत कशा पोहोचत असतील, याबद्दल विचार करायला आई-वडिलांना वेळ आहे का? किंवा हा विचार करायचा असतो, याचं भान तरी आहे का ?मोबाइल पाहू नका, असं आपण मुलांना सांगू शकतो का ?आपण त्यांना फक्त शब्दातून ‘सांगतो.’ पण मुलं बघतात की आई- वडील आपल्या मोबाइल वापरावर बंदी आणतात; पण ते स्वत: सतत मोबाइल, कॉम्प्युटर वापरत असतात. काम करतील, गेम्स खेळतील, फिल्म्स बघतील. जी गोष्ट आई-वडील आणि इतर मोठे करतात, ती वाईट आहे, हे मुलांना कसं पटेल ? मुलं शब्दातून शिकत नाहीत तर अनुकरण, निरीक्षण यातून शिकतात. त्यामुळं जोपर्यंत आजूबाजूला अनिर्बंधपणे मोबाइल वापरणारी माणसं असतील तोपर्यंत मुलं तेच शिकणार आहेत.

(Image : Google)

आपलं मूल एक जिवंत, व्यक्तिमत्त्व आहे. ते व्हलनरेबल आहे. कोणत्याही चांगल्या-वाईट गोष्टी त्याच्यावर लगेच परिणाम करू शकतात. कोरोनाकाळात तर अभ्यास, शाळा सगळं ऑनलाइनच. त्यामुळं मुलांच्या हातात किती वेळ मोबाइल असावा, याला धरबंद नव्हताच. शाळेच्या वेळेनंतरसुद्धा तो मुलांकडेच असायचा. मोबाइल युजर फ्रेण्डली असतो, चाइल्ड फ्रेण्डली नाही. मुलांच्या उपजत कुतूहलातून मुलं मोबाइल एक्सप्लोअर करत जातात.त्यात असतो हिंसा आणि पॉर्नचा भडिमार ! किती तरी मुलं त्याला बळी पडलेल्या हकीकती मुलांसोबत काम करणाऱ्या संघटना पुढे आणत आहेत. मोबाइल, स्क्रीनच्या व्यसनातून जर एखादं मूल असं वावगं वागलं तर त्याच्या आई-वडिलांनाच पूर्ण दोषी मानायला पाहिजे, असं मनापासून वाटतं.मुलांना खरं तर मोबाइलसारख्या बाजारातून आणलेल्या कोणत्याही वस्तूंची गरज नाही. गरज आहे ती फक्त निरपेक्ष प्रेम, शारीरिक आणि मानसिक सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि पूर्ण विश्वास याच गोष्टींची! यातूनच ती बहरून उठणार आहेत, हे आपण पालक कधी समजून घेणार ?

(Image : Google)

 

पालकांना काय करता येईल?

१. घरातल्या मोठ्यांनी मुलांसाठी वेळ काढणं आणि त्यांच्याशी सततचा सुसंवाद गरजेचा आहेच.२. पुन्हा मोबाइल हे वेळ घालवण्याचं साधन बनू नये म्हणून मुलं काही तरी करत राहतील, असं वातावरण घरात तयार करणं, हे नक्कीच होऊ शकतं.३. त्यासाठी घरात काही कामं मुलांना सोबत घेऊन करणं, मोठ्यांनी बागकाम, स्वयंपाक, विणकाम, भरतकाम, वेगवेगळ्या दुरुस्त्या यासारखे छंद जोपासणं, निसर्गात किंवा जिथं काही इंटरेस्टिंग घडत असेल अशा ठिकाणी (कुंभार, शिंपी, शेती आदी) मुलांना घेऊन जाणं, तिथं वेळ घालवणं, अशा साध्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी करू शकतो. अशा गोष्टी करण्याने मुलांसोबत मोठेही मोबाइलपासून दूर राहू शकतील.४. वेगवेगळ्या वयाची मुलं, मोठी माणसं अशा ‘खऱ्या’ माणसांमध्ये, समाजामध्ये मुलांचा सहजपणे वावर असला पाहिजे. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.५. मूल जन्माला घालणं हा काही विचारांती घेतलेला निर्णय असतो. अशा वेळी पालकांनी कमीत कमी १२-१३ वर्षे तरी त्याला एक चांगलं, नैसर्गिक वाढीला अनुकूल, उच्च जीवनमूल्यांनी युक्त असं बालपण देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हा खरं तर जन्मलेल्या प्रत्येक मुलाचा हक्क आहे.(लेखिका सहज शिक्षण अभ्यासक आहेत.)dranjana12@gmail.com

टॅग्स :मोबाइललहान मुलं