मूल काही केल्या भाज्या खात नाही अशी तक्रार तमाम आई करत असतात. भाज्यांमधून मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळणार असल्याने त्यांनी फळभाज्या, पालेभाज्या, सलाड असे सगळे पुरेशा प्रमाणात खायला हवे अशी प्रत्येक आईची इच्छा असते. पण कितीही चमचमीत मुलांना आवडेल अशी भाजी केली तरी ते नाक मुरडतात आणि जाम, सॉस, गूळ-तूप, तूप साखर याबरोबरच पोळी खातात. असे केल्याने शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक त्यांना मिळत नाहीत आणि पर्यायाने प्रतिकारशक्ती कमी राहते. मग सतत सर्दी-ताप आणि इतर काही ना काही समस्या उद्भवतात. आता मुलांनी भरपूर भाज्या खाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर भाज्यांचे कोणते वेगळे पदार्थ केल्याने मुले भाज्या खातील ते पाहूया...
१. पराठा
आपण एरवी मेथी, पालक, बटाटा यांसारख्या भाज्यांचे पराठे करतो. त्याचप्रमाणे मूळा, कोबी, दुधी भोपळा, गाजर, बीट यांसारख्या भाज्यांचे पराठेही अतिशय मस्त होतात. या भाज्या किसून त्यात गव्हाचे पीठ, आलं-मिरची-लसूण पेस्ट, धने-जीरे पावडर, कोथिंबीर, ओवा, तीळ, मीठ घालून पीठ भिजवावे. याचे गरमागरम पराठे अतिशय मस्त लागतात. यावर तूप, लोणी घेऊन सोबत दही, लोणचं, सॉस यांसोबत हे पराठे अतिशय चांगले लागतात. जेवणासाठी किंवा अगदी नाश्त्यालाही हे पराठे हा उत्तम उपाय होऊ शकतो. अशा पराठ्यामुळे आपण कोणत्या भाज्या खात आहोत हेही मुलांना समजत नाही आणि अगदी आवडीने ते हे गरमागरम पराठे खाऊ शकतात.
२. भाज्यांचे पकोडे
फ्लॉवर, कोबी, ढोबळी, घोसाळे, पालक, गाजर यांसारख्या भाज्या थोड्या मोठ्या आकारात कापून त्याचे भज्यांसारखे पकोडे करता येतात. हॉटेलमध्ये आपण व्हेज क्रीस्पी म्हणून खात असलेल्या पदार्थात तेच केलेले असते. डाळीच्या पीठात तिखट, मीठ, तीळ घालून घट्टसर पीठ भिजवावे. चिरलेल्या भाज्यांना थोडे मीठ लावून ठेवावे. या भाज्या पीठात घोळवून त्याची भजी करावीत. या माध्यमातून मुलांना चमचमीत पदार्थ खाल्ल्याचा आनंदही मिळतो आणि भाज्याही पोटात जायला मदत होते. मधल्या वेळेत किंवा जेवणाबरोबरही अशाप्रकारची भाज्यांची भजी देता येऊ शकतात. यामध्ये अगदी मेथी आणि पालकाचेही पकोडे करता येतात.
३. पावभाजी
पावभाजी म्हणजे त्याच्यासोबत बटर, पाव असे सगळे पाहीजे असे आपल्याला वाटते. पण गाजर, दुधी भोपळा, बीट यांसारख्या काही भाज्या घरात असतील आणि मुलांनी या भाज्या खाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर या भाज्या शिजवून बारीक करुन त्यात कमी प्रमाणात बटाटा घालून पावभाजीचा मसाला घालून भाजी करावी. मुलांना यामध्ये आपण कोणत्या भाज्या घातल्या हे लक्षात येत नाही आणि पावभाजीची भाजी म्हणून ते खातात. आपलाही हेतू साध्य व्हायला मदत होते.
४. सूप
सूप हा थंडीच्या दिवसांत आणि भाज्या पोटात जाण्यासाठी एक उत्तम उपाय असतो. टोमॅटो सूप, पालक सूप, व्हेज सूप, लेमन कोरीएंडर सूप असे सगळे प्रकार आपण अगदी कमीत कमी वेळात घरी करु शकतो. आलं लसूण पेस्ट, मीरपूड, मीठ आणि उकडलेल्या कोणत्याही भाज्या यांपासून हे गरमागरम सूप अतिशय मस्त लागते. लाहन मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे सूप अतिशय आवडीने पितात. तसेच थंडीच्या दिवसांत घशाला गरमागरम सूप प्यायल्याने बरे वाटते.
५. टीक्की किंवा कटलेट
बीट, गाजर, मूळा, भोपळा, मेथी, फरसबी, कोबी, मटार अशा उपलब्ध असतील त्या भाज्या उकडून किसून घ्याव्यात. त्यात आलं-मिरची-लसूण पेस्ट, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, लिंबू आणि चवीला साखर असे घालून त्याचे कटलेट करावेत. ब्रेडच्या चुऱ्यात हे कटलेट घोळवून ते शॅलो फ्राय करावेत. ब्रेडसोबत किंवा नुसतेही हिरवी चटणी आणि सॉस यांच्यासोबत हे कटलेट खायला अतिशय मस्त लागतात.