लहानपणी मुलं मुली काय खातात पितात, ते किती खेळतात, किती वेळ बसून राहातात यावर त्यांची उंची अवलंबून असते. मुला मुलींची अपेक्षेनुसार उंची वाढलीच नाही तर मग आपण त्यांच्या उंची वाढीकडे लक्ष देण्यास कमी पडलो अशी खंत पालकांना वाटत राहाते. पालकांनी मुलांची उंची नीट वाढण्यासाठी त्यांच्या आहार विहाराकडे कसं लक्ष द्यायला हवं, त्याबाबत काय काळजी घ्यायला हवी याबाबत आहार आणि पोषण तज्ज्ञ शिल्पा मित्तल यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Image: Google
खाण्या पिण्याची काळजी कशी घ्याल?
शिल्पा मित्तल म्हणतात की सध्या मुलांच्या खाण्यात जंक फूड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे मुलांची स्थूलता वाढली आहे. त्याचा परिणाम मुलांच्या उंची वाढण्यावर होतो. मुलांची उंची यामुळे खुंटू शकते. शिवाय खाण्यापिण्याच्या सवयीचं वैशिष्ट्य म्हणजे मुलं लहानपणी जे खातात तेच त्यांना मोठेपणीही आवडतं. त्यामुळे मोठेपणीही त्यांना जंकफूडच आवडलं तर मात्र त्यांच्या उंचीवर तर परिणाम झालेला असतोच सोबत त्यांचं आरोग्यही धोक्यात येतं. त्यामुळे मुलांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश असेल याकडे पालकांनी बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. मुलांनी जंक फूड ऐवजी पौष्टिक खाल्लं पाहिजे हा आग्रह पालकांनी धरला तरच मुलांची आरोग्यदायी पदार्थ खाण्याची चव डेव्हलप होते. मुलांना पौष्टिक पदार्थ त्यांना आवडेल अशा पध्दतीने कसे द्यायचे याबाबत पालकांनी थोड्या युक्त्या केल्या तर मुलं पौष्टिक पदार्थही आवडीनं खातात.
Image: Google
असा असावा डाएट प्लॅन
मुलांचा डाएट प्लॅन कसा असावा याबाबत शिल्पा मित्तल म्हणतात की उंची आणि आरोग्य यांचा विचार करता त्यांच्या आहारात प्रथिनं, कॅल्शियम, ड, ब 12 जीवनसत्त्व या गुणधर्मांचे पदार्थ असणं आवश्यक आहे. मुलं नाश्ता करु देत नाही तर संध्याकाळचं स्नॅक्स खाऊ देत त्यांच्या प्रत्येक खाण्यात प्रथिनं असायलाच हवीत याकडे लक्ष द्यायला हवं. यासाठी सकाळच्या नाश्त्यात, पोहे/ उपमा/ पराठे/ दलिया सोबत एक कप दूध द्यावं. दुपारच्या जेवणात पोळी, एक वाटी डाळ, थोडं ताजं दही, भाजी, थोडा भात आणि मोड आलेली कडधान्यं असावीत. संध्याकाळच्या नाश्त्यात सुकामेवा, सीडस, लाह्यांचा चिवडा किंवा चणे फुटाणे द्यावेत. रात्रीच्या जेवणात त्यांच्या भुकेप्रमाणे पोळी, डाळ, भाजी द्यावी. मुलांना सकाळच्या नाश्ता आणि जेवणाच्या मधे आणि पुन्हा दुपारचं जेवण रात्रीच्या जेवणाच्या मधे जो अवकाश असतो त्यात त्यांन एखादं हंगामी फळ द्यावं. मुलांच्या खाण्यात ज्वारी, बाजरी, नाचणी हे सर्व धान्यं यायला हवीत याकडे लक्ष द्यावं. कायम याची त्यांन भाकरीच खाऊ घालावी असं नाही तर नागली, बाजरी, ज्वारी यांच्या रव्याचा गोड किंवा भाज्या घालून केलेला तिखट उपमाही छान लागतो. नूडल्स ऐवजी घरगुती शेवया खाण्याची सवय मुलांना लावावी.
Image: Google
मुलं बसके बटाटे व्हायला नको
मुलांनी त्यांच्या वाढत्या वयात जास्तीत जास्त शारीरिक क्रिया करणं आवश्यक आहे. ते एकाजागी बसून तासनतास टी.व्ही पाहात असतील, मोबाईल गेम खेळत असतील तर त्याचा परिणाम मुलांच्या उंचीवर होणारच. मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्यासाठी उद्युक्त करायला हवं. मुलं सायकलिंग, स्विमिंग, बास्केट बॉल, फुटबॉल, कबड्डी, खोखो असे मैदानी खेळ खेळतील याकडे लक्ष द्यावं. मैदानी खेळ खेळल्याशिवाय मुलांची उंची वाढत नाही हे कायम लक्षात ठेवावं.