Lokmat Sakhi >Parenting > काय करायचं या मुलांचं सुटीत? असा प्रश्न हल्ली पालकांना का छळतो? उपाय काय?

काय करायचं या मुलांचं सुटीत? असा प्रश्न हल्ली पालकांना का छळतो? उपाय काय?

मुलांना उन्हाळ्याच्या सुटीत कुठंतरी अडकवायचंच असं पालक का ठरवतात? ( kids summer vacation and parents.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 05:18 PM2023-04-13T17:18:58+5:302023-04-13T17:27:26+5:30

मुलांना उन्हाळ्याच्या सुटीत कुठंतरी अडकवायचंच असं पालक का ठरवतात? ( kids summer vacation and parents.)

kids summer vacation and parents, how to plan summer vacation | काय करायचं या मुलांचं सुटीत? असा प्रश्न हल्ली पालकांना का छळतो? उपाय काय?

काय करायचं या मुलांचं सुटीत? असा प्रश्न हल्ली पालकांना का छळतो? उपाय काय?

Highlights येत्या उन्हाळी सुट्टीत आपणही कदाचित आपल्याच मुलांविषयी नव्याने काहीतरी शिकू.

- मानसी जोशी
मुलीच्या शाळेला सुटी लागायला एकच आठवडा उरलाय आणि सुट्टीत काय करणाराचा वेताळ महिन्याभरापासूनच मानेवर बसलाय. घरातून, घराबाहेरून, मित्रमंडळीकडून, नातेवाइकांकडून, पेपरमधून, जाहिरातींमधून,टीव्हीमधून आणि अर्थात सोशल मीडियातून असंख्य अनाहूत सल्ले आणि अपेक्षा सुचविल्या जाताहेत. आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती जणू मुलांच्या सुट्टीचा सदुपयोग करण्याच्या उपक्रमात जुंपून गेली आहे, असं वाटायला लागलंय.
साहजिकच माझं मन आधी माझ्या स्वत:च्या बालपणात धावतं. मे महिन्याच्या सुट्टीत मी किंवा माझ्यासोबतचे इतर मित्रमैत्रिणी काय बरं करत असू? पूर्वी मुलं सोसायटीतच किती तरी वेळ आपसात खेळायची. जिन्यात वळणावर रिकामी जागा शोधून पत्ते कुटायची. कॅरमचे मॅचेचस लावायची. संध्याकाळ झाली की मैदानावर पसार व्हायची. मैदानावर न रमणारी मुलं घरात बसून पुस्तकं वाचायची, चित्र रंगवायची,गोष्टी ऐकायची. सुट्टीत खास लहान मुलांसाठी असंख्य अंक निघायचे. सुट्टीविशेष चांदोबा, कुमारचे अंक पुरवून पुरवून सुट्टीभर वाचायला खूप मजा येत असे. न चुकता काही दिवस आम्ही मुलं तेव्हा आजीकडे राहायला जात असू. सगळी नातवंडं एकत्र झाली की मग दिवस कसा संपतो कळायचंच नाही. काही पालक होते की जे मुलांना घेऊन विविध ठिकाणी ट्रिपला जात. पण बहुतांश वेळ हा या ना त्या नातेवाइकांकडे आळीपाळीने एकत्र राहायला जाण्यात जात असे.

(Image : google)


‘जुन ते सोनं’ किंवा ‘आमच्या वेळी बघा..’ असे म्हणून बळेच सर्वांचा जयजयकार करावा इतकं वय नाहीच झालं माझं, परंतु या सर्वांमधून मुलांना काय मिळालं याचा विचार करायला हवा. पण मग आता हे सर्व आता शक्य नाही का हा खरा प्रश्न उद्भवतो.
सर्वप्रथम तर त्या पिढीतले दोन्ही पालक नोकरी करतात अशी घरं आताच्या तुलनेत खूप कमी होती. बऱ्याच घरात आजी-आजोबा सोबत राहत असत त्यामुळे मुलांच्या सुट्टीत त्यांना ठेवायचं कुठे? हा प्रश्न कमी प्रमाणात पडत असे. आता माझ्या मुलांना असेल दोन महिन्यांची सुट्टी, पण माझ्या ऑफिसला नाही ना लागत उन्हाळी सुट्टी ! ‘मग काय करणार? आणि त्यासोबतच मुलांचा ‘सर्वांगीण विकास’ हा ध्यास जो आताच्या पालकांना लागलाय तो या पिढीत नवानवाच आहे.
एकाच वेळी आपल्या मुलांनी अभ्यासात हुशार असावं, एखादा खेळही त्यांनी उत्तमच खेळावा, चित्रकलासुद्धा त्यांना यावी, स्वसंरक्षणासाठी कराटे, इंग्रजी सुधारण्यासाठी फोनिक्स, गणित सुधारण्यासाठी वैदिक मॅथ हवं, एखादा डान्स तरी शिकवाच आणि जमलंच तर पुढच्या वर्षीची पुस्तकं आणून अभ्यास सुद्धा बघून घ्यावा इतका पॉवर पॅक प्लॅन आताचे पालकच करायला लागले आहेत. आणि ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ न्यायाने हे सर्व उपलब्ध करून देणारे व्यापारी कमी नाहीतच.
मला जेव्हा आई म्हणून माझ्या मुलीकरिता किंवा एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून इतरांच्या मुलांकरिता पालक हा प्रश्न विचारतात की अमुक-अमुक क्लासला किंवा तमुक-तमुक शिबिराला पाठवायचं का. तेव्हा मला ते पाठविण्यामागची कारणं विचारणं गरजेचं वाटतं. ती कारणं सहसा दोनच मुद्द्यांवर येऊन थांबतात. पहिलं म्हणजे सुट्टीचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकणं आणि दुसरं म्हणजे मुलांना कुठेतरी अडकवायला हवं.
दोन्ही कारणं मान्य. पण सुट्टीचा मूळ उद्देश हा मुलांना ‘मजा’ यायला हवी हा आहे. आणि दुसरा मुद्दा हा की ‘सर्वांगीण विकास’ कशाला म्हणायचं नेमकं? जिन्यातल्या मोकळ्या जागेत पत्ते खेळून मजा येत होती आपल्याला. आत्याकडे राहायला जाऊन स्वावलंबन शिकत होतो आपण. दुसऱ्यांच्या घरी राहताना पालकाची भाजी आवडत नसली तरी कधीतरी चालवून घेता येते ही ॲडजेस्टमेण्टसुद्धा शिकत होतो. मुलमुलं एकत्र राहिल्याने एकमेकांच्या वागण्यातून कितीतरी नवीन गोष्टी शिकत होती. मुलं अनुकरणातूनच शिकतात. आजीकडे राहून जसे लाड होत, तशी वेळेवर उठायची, आपापल्या अंंथरुणाची घडी घालायची आणि जेवणानंतर ताट उचलून ठेवायची शिस्त सुद्धा लागतच होती. मुख्य म्हणजे या सगळ्या ॲक्टिव्हिटी समूहात घडत होत्या, एकलकोंड्या वैयक्तिक विकासात नाही.
आताच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे म्हणा, पालकांच्या विविध मर्यादांमुळे म्हणा किंवा अन्य कोणत्याही कारणाने जर हे शक्य नसेल तर सुट्टीतले उपक्रम निवडताना हा अनुभव देता कसे येईल हा विचार करून बघू. पंधरा दिवसांच्या क्रिकेट कोचिंगने कोण विराट कोहली बनत नसतो, पण येत्या सुट्टीत असे समर कॅम्प शोधू ज्यात एक म्हणजे मुलांना मजा आली पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यांनी जीवनकौशल्य शिकली पाहिजेत. हीच त्यांना या बदलत्या जगाच्या स्पर्धेत पुढे नेतील. सहकार्याची भावना, स्वावलंबन, पर्यावरणाची काळजी, आजूबाजूच्या समाजाविषयीची जाणीव, बंधुभाव आणि खूप सारं प्रेम हेच तर नव्या पिढीला तारणार आहे ! त्यांना पानाफुलांत रमायला, पक्षांचे आवाज ओळखायला, आपली आपण काम करायला, पोटभर पुस्तकं वाचायला तरी शाळेच्या धुमश्चक्रीत वेळ कुठेय?
उगीच जग पुढे निघून जाईल. या भीतीने आपल्या एका चिमुरड्याला ओझं देण्यात काय सुट्टीची मजा आहे?

(Image : google)

त्यापेक्षा थोडं आपणसुद्धा अर्धविराम घेऊन विचार करू की, मुलांना मजा येणारं आणि तरीही नवं काही देणारं येत्या सुट्टीत काय बरं शक्य होईल? शोध थोडा कठीण होईल कदाचित, थोडी जास्त मेहनत लागेल, विचार करावा लागेल. शोधाशोध करावी लागेल, पण पर्याच नक्की सापडतील ! आपण आपला परीघ वाढवूया तरच मुलांचासुद्धा वाढेल. या आजूबाजूच्या सपोर्ट सिस्टीमवर थोडा अधिक विश्वास वाढवला तर मुलांना विश्वास ठेवायला तर आपण शिकवूच पण जीवनकौशल्य मुलांना शिकवताना येत्या उन्हाळी सुट्टीत आपणही कदाचित आपल्याच मुलांविषयी नव्याने काहीतरी शिकू.

(लेखिका मुंबईच्या नायर रुग्णालायात क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट आहेत.)
mansi.cp@gmail.com

Web Title: kids summer vacation and parents, how to plan summer vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.