प्रियांका मोगरे
उन्हाळ्याची सुटी.लहानपणीच्या सुटीच्या प्रत्येकाकडे किती आठवणी असतात. तासंतास रंगलेले पत्त्यांचे डाव. भावंडं आणि मित्रांनी मिळून केलेली भेळपार्टी किंवा पॉट आईस्क्रीम पार्टी. मामाच्या गावाला जाणं. तिथं सगळ्या भावंडांनी मिळून अंगणात किंवा गच्चीवर मोकळ्या आकाशाखाली झोपणं. दिवस दिवस फक्त क्रिकेट खेळणं. खूप खाणं, खूप हसणं-खिदळणं. दुपारच्या उन्हात मस्त ताणून देणं, सायंकाळी सुस्ती घालवणारा आजी-मावशी-मामीच्या हातचा चहा पिणं.गप्पाच गप्पा आणि वेळेचं हरवलेलं भान हे सारं म्हणजे सुटी.
आता मुलांना तशी सुटी असते का?
आईबाबा ऑफिसमध्ये, तसे मामामामी-मावशी-काका-काकू. सगळेच बिझी.मग मुलांनी सुटीत करायचं काय?नव्या सुटीचे नवे प्रश्न.आईबाबांच्या पिढीच्या सुटीच्या कल्पना कितीही रोमॅण्टिक असल्या तरी आताच्या मुलांच्या वाट्याला येणारी सुटी तशी नाही. ती सुटी मुलांना आता घरात डांबून घालते नाहीतर विविध शिबिरांना पाठवते. कुठला तरी क्लास लावते नाहीतर सरळ हातात मोठे स्क्रिन आणि स्क्रिनचे रिमोट देऊन टाकते.पण त्यामुळे मुलांचं बाेअर होणं संपत नाही. सुटीत काहीतरी खास केलं हा फिल येत नाही.
(Image : google)
पालकांना तरी काय दोष देणार?त्यांना सुटीच मिळत नाही, मिळाली तरी चार दिवसांची ट्रिप.पण पुन्हा मुलांचा प्रश्न तोच, मला बोअर होतं आहे. मी काय करू?
मुलांची सुटी आनंदी करता येणार नाही का?
आईबाबांनी थोडा वेळ काढला, दिवसाला अर्ध पाऊण तास.मित्र-भावंडं सगळे जमून काहीतरी छान केलं.वाळवणाचं काम केलं.झाडं-पान ते कॅरम-पत्ते नवे खेळ शोधले तर सुटी आनंदी होऊ शकेल.प्रयत्न तर करायला हवा..