मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हा प्रत्येक पालकांसाठी एक मोठा टास्क असतो. त्यांना वाढवणं म्हणजे केवळ खायला-प्यायला घालणं आणि चांगल्या सवयी लावणं नाही. तर मुलांचा भावनिक, बौद्धिक, मानसिक विकास व्हावा यासाठी मुलांना क्वालिटी टाइम देणं अतिशय गरजेचं असतं. अनेकदा पालक म्हणून आपल्याला हे कळत असतं पण ऑफीस, घरातली कामं आणि इतर गोष्टींमुळे आपण मुलांना म्हणावा तसा क्वालिटी टाइम देऊ शकतोच असं नाही. तसंच क्वालिटी टाइम म्हणजे नेमकं काय, तो किती वेळाचा असावा याबाबत आपल्याला पालक म्हणून पुरेशी माहिती असतेच असं नाही. क्वालिटी टाइममध्ये नेमकं काय करायला हवं याविषयी प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. या टिप्स कोणत्या ते पाहूयात (Know how much quality time parents must give to their child parenting tips)...
क्वालिटी टाइम म्हणजे काय?
असा वेळ जेव्हा आपण इतर काहीही न करता फक्त आणि फक्त मुलांकडे लक्ष देतो. या वेळात मोबाइल, टीव्ही, इतर कोणीही व्यक्ती किंवा दुसरी कोणतीही व्यत्यय आणणारी गोष्ट मुलात आणि आपल्यात नसते. मुलांसोबत खेळताना जर एका हाताने तुम्ही खेळत असाल आणि दुसरीकडे तुमच्या कानाला फोन असेल तर त्याला क्वालिटी टाइम म्हणता येणार नाही.
क्वालिटी टाइम किती असावा?
प्रत्येकाला आपल्या रोजच्या धावपळीत मुलांना खूप जास्त वेळ देता येईलच असं नाही. पण दिवसातून किमान २० ते २५ मिनीटे वेळ दिला तरी पुरेसा असतो. त्याहून जास्त आपण कितीही वेळ देऊ शकतो. आपण किती वेळ देतो यापेक्षाही जो वेळ देतो तो पूर्णपणे मुलांसाठी असतो का याकडे लक्ष द्यायला हवे. तसंच यामध्ये नियमितपणा असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रोजच्या रोज एक ठराविक वेळ ठरवून त्या वेळेला मुलांसोबतचा हा वेळ घालवा. त्यामुळे तासनतास मुलांसोबत घालवण्यापेक्षा रोजच्या रोज मुलांना हा वेळ देणं जास्त महत्त्वाचं आहे.