Join us  

मुलांना रोज ४ पानं तरी वाचायला हवीतच, तज्ज्ञ सांगतात १ मोठा फायदा! बघा फरक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 4:37 PM

Know How Reading With Child is Important : तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला - बौद्धिक, मानसिक क्षमता सुधारण्यासोबतच वाचनाचा महत्त्वाचा फायदा

वाचन हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग असला पाहिजे असं आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो. ही सवय लहान वयापासूनच आपल्याला असेल तर मोठेपणी आपल्याला त्याचा फायदा होतो. वाचनाने माणून समृद्ध तर होतोच पण त्यामुळे त्याच्या भाषेवर, विचारांवर, मनावर चांगले संस्कारही होत असतात. लहान मुलांना आपण ज्याप्रमाणे इतर चांगल्या सवयी लावतो त्याचप्रमाणे वाचनाची सवयही लहान वयापासूनच लावली तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पालकांनीही मुलांसोबत एकत्रित वाचन करायला हवे. वाचनाचे इतरही कसे फायदे होतात याविषयी बालमानसतज्ज्ञ प्रिती काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहूया (Know How Reading With Child is Important).

(Image : Google)

प्रिती सांगतात, रोज न चुकता मुलांसोबत २० ते २५ मिनीटे काही ना काही वाचायला हवे. यामध्ये आपण मुलांच्या आवडीचे कोणतेही पुस्तक घेऊ शकतो. सध्या बाजारात रंगबिरंगी चित्र असलेली असंख्य पुस्तके उपलब्ध असतात. वाचनामुळे मुलांचे संवादकौशल्य आणि भाषा सुधारते. हे तर ठिकच आहे पण वाचनामुळे मुलांचा तुमच्यासोबत असणारा कनेक्ट स्ट्रॉंग व्हायला मदत होते. पालक म्हणून आपला मुलांशी चांगला कनेक्ट असणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने वाचन कसे महत्त्वाचे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही नात्यात चांगला कनेक्ट हवा असेल तर त्या दोन व्यक्तींनी एकमेकांसोबत वेळ घालवणे अतिशय गरजेचे असते. 

मुलांशी काय बोलावं किंवा त्यांच्यासोबत वेळ कसा घालवावा असा प्रश्न अनेक पालकांना असतो. अशावेळी शाळेत काय केलं असा कॉमन प्रश्न विचारला जातो, मात्र या प्रश्नाचे उत्तर पालकांना मिळतेच असेत नाही. त्यामुळे तुम्ही वाचन करत असाल तर त्याच्या रेफरन्सनी मुलांशी संवाद साधणे सोपे जाते. पुस्तक वाचत असताना आपण त्यातील पात्रांबाबत आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. इतकेच नाही तर दुसऱ्या दिवशी किंवा नंतर कधीही आपण पुस्तकातील संदर्भ देऊन मुलांशी संवाद साधू शकतो. असे केल्याने मुलं आपल्याशी पटकन आणि अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतात. यामुळे आपले मुलांशी असणारे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं