लहान मुलांना सांभाळणं ही कला आहे त्याचप्रमाणे आपल्या सहनशक्तीची परीक्षाही असते. पालक म्हणून मुलांना सांभाळताना त्यांच्या गोष्टी नीट ऐकून घेणे, त्यांच्यासोबत खेळून त्यांना वेळ देणे, त्यांना वेळच्या वेळी खायला-प्यायला भरवणे या गोष्टी महत्त्वाच्या असतातच. पण त्यांचे सतत वरखाली होणारे मूड सांभाळणे, त्यांच्या मनात सुरू असणारी आंदोलनं समजून घेऊन त्यानुसार त्यांच्याशी वागणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यांच्या मनात सुरू असलेले वेगवेगळया प्रकारचे, पातळीवरचे गोंधळ समजून घेऊन त्यांची मनस्थिती जपणे याकडेही पालक म्हणून आपल्याला बारकाईने लक्ष द्यावे लागते (Know How To Be our Child Less Aggressive and More Calm).
मुलं कायम आनंदी राहायला हवीत असं सांगणं सोपं असलं तरी त्यांनी तसं असावं यासाठी पालक म्हणून आपल्याला असंख्य गोष्टी कराव्या लागतात. मुलांनी सतत चिडचिड करु नये म्हणून पालकांनी काय करायला हवे याबाबत आपण नेहमी ऐकतो. पण तसे सगळे करायला आपल्याला जमतेच असे नाही. सकाळी उठल्यापासून मूल चिडचिड करत असेल आणि पालक म्हणून आपणही त्याच्यावर चिडचिड केली तर हे चक्र कधीच संपणार नाही. उलट यामुळे घरातील वातावरण बिघडण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे मुलं चिडलेली असताना पालकांनी आवर्जून करायला हवी अशी १ गोष्ट समुपदेशक प्रिती सांगतात, ती कोणती पाहूया...
नेमके काय करायचे?
मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळी त्यांच्या आजुबाजूला कशा प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत हे तपासून पाहायला हवे. जसं अन्न तसं मन असं आपल्याकडे मानले जाते. आपण जे खातो ते बनवताना किंवा खाताना त्यामागे काय विचार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे असते. अनेकदा मुलं मोबाइल पाहतच अन्न खातात. यामध्ये मोबाइलमध्ये असणारी व्हायब्रेशन्स, रेडीएशन्स अन्नासोबत मुलांमध्ये जातात. तसंच मुलं जे काही पाहत आहेत ते जोरजोरात धावणारे, उड्या मारणारे असे काही असेल तर मुलांमध्ये नकळत ते जाते.
त्यामुळे मुलं जेव्हा काहीही खात असतील तेव्हा आजुबाजूला शांत व्हायब्रेशन्स असायला हवीत. त्यामुळे खाताना मुलांसोबत गप्पा मारणे, पुस्तक वाचून दाखवणे, चित्र दाखवणे अशा गोष्टी आपण नक्कीच करु शकतो. त्यामुळे नकळत त्यांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि खाताना ते आनंदी राहतात. यामुळे मुलांच्या वागण्यात निश्चितच बदल घडून आलेला तुम्हाला दिसेल.