कधी झोपेतून लवकर उठत नाहीत म्हणून तर कधी सांगितलेलं ऐकत नाहीत म्हणून. कधी घरभर पसारा करतात म्हणून नाहीतर जेवत नाहीत म्हणून मुलांना सारखं ओरडावं लागतं. बहुतांश घरांमध्ये पालक मुलांवर सतत काही ना काही कारणाने ओरडत असल्याचे चित्र आपल्याला दिसते. इतकेच नाही तर मुलंही मग जास्त बिथरल्यासारखं करतात आणि हातपाय आपटणे, आदळआपट, ओरडणे, रडणे असं काही ना काही करतात. यामुळे एकूण घराचे वातावरण खराब होते आणि जे काम पटकन करायचे आहे त्यासाठी खूप जास्त वेळ लागतो (Know how to calm down you child's tantrums Parenting tips).
मूल आधीच खूप तणतण करत असताना आपण ओरडल्याला, सांगितल्याचा काही परीणाम त्यांच्यावर होतो की त्यांना काहीच कळत नाही हे समजून घ्यायला हवे. त्यासाठी मुलांना ओरडण्याआधी त्यांची मानसिकता समजून घेतली तर आपलं काम नक्कीच सोपं होऊ शकतं. प्रसिद्ध पॅरेंटींग कोच श्वेता गांधी या बाबतीतली १ अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करतात. त्या नेमकं काय सांगतात समजून घेऊया..
पालकांनी लक्षात घ्यायला हवी एक गोष्ट
मुलं जेव्हा खूप आदळआपट किंवा रडारड करत असतात तेव्हा त्यांचा लॉजिक ब्रेन १०० टक्के बंद असतो. त्यामुळे त्यावेळी आपण कितीही काहीही सांगत असलो तरी ते त्यांना डोक्यावरून जाते. त्यांच्या डोक्यात काहीच जाणार नाही त्यामुळे त्यांना ते समजणारही नसते.
मग यावर उपाय काय?
जेव्हा रात्री आपण मुलाला झोपवतो तेव्हा मुलांशी अतिशय शांतपणे संवाद साधायला हवा. कारण त्यावेळी मूल आणि पालक एकमेकांशी कनेक्टेड असतात. त्यावेळी त्यांच्याशी शांतपणे बोलून त्यांचा येस ब्रेन किंवा लॉजिक ब्रेन ॲक्टिवेट करायला हवा. त्यासाठी मुलांशी 'आज तू जे वागलास ते बरोबर होतं की चूक होतं? उद्या जेव्हा पुन्हा असं होईल तेव्हा तू तुझ्या भावना जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळ' असं बोलायला हवं. या गोष्टी एक किंवा २ वेळा सांगून सोडून देऊ नका तर सतत सांगत राहा. त्यामुळे लगेच नाही पण १,२ किंवा ३ महिन्यात मुलांच्या वागण्यातला बदल तुम्हाला नक्की दिसेल.