Join us  

मुलं उद्धटासारखी वाट्टेल ते बोलतात अशी तुमचीही तक्रार आहे? ४ टिप्स- घरातले वाद होतील बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2024 4:47 PM

Know How to Control kids behaviour parenting tips : मुलांच्या या सवयी कमी होण्यासाठी पालक म्हणून आपण थोडं सजगपणे वागणं आवश्यक असतं.

मुलांचा हट्टीपणा आणि उद्धटपणा हा असंख्य पालकांसमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. मुलांनी आपलं सगळं ऐकावं आणि त्याचप्रमाणे वागावं अशी पालकांची अपेक्षा असते. पण मुलं थोडं जरी त्यांच्या मनासारखं वागायला गेली की पालक अस्वस्थ होतात आणि मग वादाला सुरुवात होते. बरेचदा मुलांना सतत शिस्तीत वागायला लावल्याने ते सुरुवातीला ऐकतात पण नंतर हट्टीपणा किंवा उद्धटपणा करण्यास सुरुवात करतात. चारचौघात मुलांनी आपलं ऐकलं नाही किंवा हट्टीपणा केला की आपला पारा चढतो आणि मग आपण त्यांच्यावर रागावतो, ओरडतो आणि प्रसंगी हातही उगारतो (Know How to Control kids behaviour parenting tips). 

असे प्रसंग मुलांच्या हट्टीपणासोबत वाढत जातात आणि एकूणच पालक आणि मुलांमधले नाते बिघडण्यास सुरुवात होते. पण मुलं जेव्हा हट्टी किंवा बदमाश वागतील तेव्हा त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारुन म्हणावा तसा फरक पडत नाही. तर मुलांच्या या सवयी कमी होण्यासाठी पालक म्हणून आपण थोडं सजगपणे वागणं आवश्यक असतं. यामुळे नकळत मुलं आपल्याशी कनेक्ट होण्यास मदत होते आणि ते आपलं ऐकतात, इतकंच नाही त्यांच्या वागण्यातही यामुळे सुधारणा होण्यास मदत होते. 

१. मुलांना वेळ देणे

युनिसेफने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अनेकदा मुलांना पालकांचा पुरेसा वेळ मिळत नाही. त्याचा परीणाम म्हणजे मुलं आणि पालकांचे नाते बिघडण्यास सुरुवात होते आणि मुलं पालकांचं ऐकेनासे होतात. त्यामुळे आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ मुलांसोबत घालवला तर मुलांच्या वागण्यात नक्कीच फरक दिसू शकतो. यामुळे पालकांचा मुलांसोबतचे बाँडींग सुधारते आणि मुलांच्या वागण्यात सुधारणा होते. 

२. चांगल्या गोष्टींचे कौतुक

आपले कौतुक केलेले प्रत्येकालाच आवडते, त्याचप्रमाणे मुलांनाही आवडते. ऑक्सफर्ड विद्यापीठात चाईल्ड अँड फॅमिली सोशल वर्क या विषयाच्या प्राध्यापक असलेल्या लूसी क्लूवर म्हणतात, मुलांमधील वाईट सवयी घालवण्यासाठी त्यांच्या चांगल्या सवयींचे कौतुक करायला हवे. त्यांचे कौतुक झाले तर त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि कौतुक होण्यासाठी ते नकळत चांगल्या गोष्टीच करतील.

३. त्यांचा फायदा समजावून सांगायला हवा

(Image : Google)

मुलांना त्यांच्यासाठी चांगलं, त्यांच्या फायद्याचे काय आहे याविषयी सतत सांगायला हवे. त्यामुळे नकळत त्यांच्यात एकप्रकारचा उत्साह निर्माण होईल. इतकेच नाही तर त्यामुळे ते कायम चांगल्या गोष्टींकडेच लक्ष देतील. काय नाही करायला पाहिजे यावर जास्त न बोलता काय करायला पाहिजे यावर जास्त चर्चा करायला हवी. 

४. क्रिएटीव्ह गोष्टी करायला द्या

मुलांना त्यांच्या आवडीचे किंवा थोडे कल्पक असे काही करायला द्यायला हवे. डोक्याला खाद्य मिळाल्यावर ते  मनमानी करण्याऐवजी आपली ऊर्जा योग्य गोष्टींमध्ये खर्च करतील. याचा मुलांच्या विकासासाठीही चांगला फायदा होईल. नकळत त्यांचा उद्धटपणा, हट्टीपणा कमी होण्यास याची चांगली मदत होईल. 

   

टॅग्स :पालकत्वलहान मुलं