Join us  

मुलांना सांभाळताना नाकीनऊ येतात? पालकत्व सोपं होण्यासाठी करा फक्त १ गोष्ट; मुलंही होतील गुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2023 4:43 PM

Know How To Create Yes Environment around the child : मुलांना सांभाळण्याचा ताण येऊ नये आणि पालकत्त्व सोपे व्हावे यासाठी...

मुलांना जन्म देणं एकवेळ सोपं आहे पण त्यांना वाढवणं आणि त्यांचा योग्य पद्धतीने सांभाळ करणं हे मोठे आव्हान असते. आपल्यापैकी बरेच जण या गोष्टीचा  अनुभव घेतात. मुलांना केवळ खायला प्यायला घालणं आणि चांगल्या शाळेत घालणं म्हणजे त्यांचा सांभाळ करणं नाही. इतकंच नाही तर मुलांना महागडी खेळणी आणि हव्या त्या वस्तू आणून दिल्या की आपण उत्तम पालक असा अनेक पालकांचा गैरसमज असतो. पण मुलांना शिस्त लावणे, चांगल्या सवयी लावणे, त्यांच्या आरोग्याची स्वच्छता आणि काळजी घेणे, त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या गोष्टी करणे हे सगळेच मुलांच्या वाढीच्या टप्प्यात महत्त्वाचे असते. हे सगळे करतानाच आपल्याला घरातील कामे, जबाबदाऱ्या, करीयरचे प्रेशर, इतर ताणतणाव या सगळ्याचाही सामना करावा लागतो (Know How To Create Yes Environment around the child). 

हे सगळे करताना मुलांना सांभाळण्याचा ताण येऊ नये आणि पालकत्त्व सोपे व्हावे यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक असते. प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी पालकत्त्वाची प्रोसेस आनंदी, उपयुक्त व्हावी यासाठी नेहमीच काही महत्त्वाच्या टिप्स देत असतात. आताही त्यांनी अशाच काही अतिशय नेमक्या आणि पालकांना उपयुक्त अशा टिप्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी शेअर केल्या आहेत. यासाठी मुलांच्या आजुबाजूचं वातावरण कसं असावं याबद्दल त्या सांगतात की मुलांच्या आजुबाजूला कायम होय म्हणजेच सकारात्मक वातावरण असायला हवे. आपल्याला मुलांना कमीत कमी वेळा नाही म्हणावे लागायला हवे अशी परिस्थिती आपणच निर्माण करायची ही महत्त्वाची टिप त्या पालकांना देतात.   

जी गोष्ट करण्यासाठी आपल्याला मुलांना नाही म्हणावे लागेल असे वातावरण घरात निर्माणच करायचे नाही. म्हणजेच घराची रचना करताना मुलांना सहज फेकाफेकी करता येईल, चढउतार करता येईल अशी रचना ठेवायची. घरात लागेल, असुरक्षित असेल असे फर्निचर किंवा वस्तू मुले किमान लहान असेपर्यंत अजिबात ठेवायच्या नाहीत. तसेच मुलांनी अनुक गोष्ट खाऊ नये किंवा पिऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर ते पदार्थ घरात आणायचेच नाहीत. कारण एकदा मुलांना घरात हे पदार्थ आहेत हे समजले की ते त्यासाठी हट्ट केल्याशिवाय राहणार नाहीत. मुलांना घेऊन चित्रपटाला जाणे आणि तिथे त्यांच्यामागे ओरडत पळत राहणे किंवा यासारख्या गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात. यामुळे आपले पालकत्त्व नक्कीच सोपे होईल आणि सगळ्यांनाच याचा कमीत कमी ताण होईल.  

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं