आपलं मूल सर्वगुणसंपन्न असावं, त्याला कला, क्रिडा, अभ्यास, संस्कार या सगळ्यांमध्ये गती असावी असं प्रत्येक पालकांना वाटते. त्यासाठी आपण मूल लहान असल्यापासून त्याला शक्य तितक्या गोष्टी शिकवत राहतो. जगण्याची मूल्ये शिकवताना मुलांमध्ये विविध गुणांचा विकास व्हावा यासाठीही आपण त्यांना कुठे ना कुठे पाठवतो आणि आपल्या परीने शिकवत राहतो. मूल मोठे झाल्यावर कशात कमी पडू नये हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. नेतृत्त्व गुण हा त्यापैकीच एक महत्त्वाचा गुण असून मुलांमध्ये तो असावा असं अनेक पालकांना वाटतं खरं. पण तो विकसित व्हावा यासाठी काय करावं हे मात्र आपल्याला माहित असतंच असं नाही. अशावेळी मुलांमधील नेतृत्त्व गुणांचा विकास करायचा तर पालकांनी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टी कोणत्या आणि त्याचा भविष्यात कसा फायदा होणार आहे ते जाणून घेऊया (Know How to Develop Leadership Skill in yor Child parenting tips)...
निर्णयक्षमता विकसित करायची म्हणजे नेमकं काय?
- मुलांची निर्णय क्षमता विकसित होणे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. याचा अर्थ मुलांना पाहिजे ते करु द्यावे असा नसून मुलांना योग्य पद्धतीने निर्णय घेता यायला हवेत असा त्याचा अर्थ होतो. सुरक्षितता आणि आरोग्याच्या बाबतीत मात्र मुलांचे निर्णय पालकांनीच घ्यायला हवेत.
- तर मुलांना निर्णय घेता यावेत यासाठी काही संधी पालक म्हणून आपण निर्माण करायला हव्यात. या संधी कोणालाच त्रासदायक नसतील याची काळजी मात्र घ्यायला हवी. यामध्ये अगदी मुलांच्या बेडवर कोणते बेडशीट घालायचे इथपासून ते घरात एखादी नवीन वस्तू घेताना त्याचा रंग कोणता असावा इथपर्यंत काहीही असू शकेल. यामुळे मुलांना ते महत्त्वाचे आहेत याची अगदी सहज जाणीव होईल.
- तसेच रात्रीच्या जेवणात पुरी खायची की पराठा असे पर्याय असलेले प्रश्न विचारले तर त्यांनाही उत्तरे देणे आणि आपल्याला ते पूर्ण करणे सोपे होईल. मुलांनी घेतलेल्या निर्णयाचा निकाल त्यांच्यासमोर येईल असे पाहा. आज मी हॉलमध्ये बसून अभ्यास करणार असं जर मुलांनी ठरवलं आणि तेवढ्यात कोणी पाहुणे आले तर आपला निर्णय चुकीचा होता हे मुलांना लगेचच समजू शकेल.
- नियमितपणे तुम्ही मुलांना शॉर्ट टर्म, हानी होणार नाही आणि पर्याय असलेले प्रश्न विचारुन लहानपणापासून निर्णय द्यायला लावले तर लहान वयापासून मुलांमध्ये निर्णयक्षमता वाढण्यास मदत होईल आणि भविष्यात त्यांच्यात नकळत लीडरशिप क्वालिटी निर्माण होण्यास मदत होईल.