Join us  

मुलं अभ्यासात हुशार पण चारचौघात बोलायचा आत्मविश्वास नाही? करा ३ गोष्टी, मुलं बोलतील कॉन्फिडण्टली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 3:43 PM

Know how to Improve Communication skill of your child : मुलांना एखादी गोष्ट शिकवण्यासाठी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात...

संवाद ही आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. उत्तम संवाद साधता येणे हे एक महत्त्वाचे कौशल्य असून मुलांना हे कौशल्य शिकवावे लागते. आपण मुलांना इतर गोष्टी ज्याप्रमाणे शिकवतो त्याचप्रमाणे त्यांना संवाद साधायला शिकवणे अतिशय महत्त्वाचे असते. चांगली भाषा, चांगले शब्द आणि वाक्यरचना या सगळ्या गोष्टी संवादात महत्त्वाच्या असतातच. पण याबरोबरच आपले विचार, भावना शब्दांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने व्यक्त करता येण्यासाठीही संवाद कौशल्य अतिशय महत्त्वाचे असते. हे कौशल्य शिकवताना पालकांनी काही नेमक्या गोष्टी केल्यास त्याचा मुलांना हे कौशल्य शिकवताना अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. या गोष्टी कोणत्या आणि त्या मुलांसोबत केल्याने त्याचा कसा फायदा होतो पाहूया (Know how to Improve Communication skill of your child)...

१. अनुभव शेअर करणे 

आपण मुलांसोबत एखादा चित्रपट पाहिला किंवा एखादे पुस्तक वाचले तर त्याविषयी मुलांशी आवर्जून चर्चा करायला हवी. यामध्ये असलेली पात्र, कोण चांगले वागले, कोण वाईट वागले. कोणते प्रसंग मुलांना विशेष भावले, कोणते प्रसंग आवडले नाहीत याविषयी त्यांच्याशी चर्चा केल्याने त्यांची विचारप्रक्रिया स्पष्ट होण्यास मदत होते. 

(Image : Google)

२. दाखवा आणि सांगा 

मुलांना एखादी गोष्ट दाखवा आणि त्याबद्दल मुलांना काही बोलायला लावा. यामुळे नकळत त्यांच्या विचारांना चालना मिळण्यास मदत होईल. पाहिलेली गोष्ट कशाप्रकारे मांडायची याचा अंदाज यातून मुलांना नकळत येत जाईल. मुलांनी त्या गोष्टीबद्दल ५ ओळी सांगितल्या तर आपणही त्याबाबत ५ ओळी सांगायला हव्यात. एखाद्या घटनेतील, व्यक्तीतील आवडलेल्या ३ गोष्टी सांगणे अ अशाप्रकारे संवाद साधायला हवा. जेणेकरुन विचार करणे किंवा म्हणणे मांडणे म्हणजे काय हे स्पष्ट होण्यास मदत होईल. 

३. चित्रावरुन चर्चा करणे 

वृत्तपत्र, मासिक, पुस्तक किंवा कोणत्याही प्रकारचे चित्र मुलांना दाखवा आणि त्यावर मुलांना बोलायला सांगा. हे चित्र एखादे देवाचे, एखाद्या उपकरणाचे, निसर्गाचे किंवा अगदी कशाचेही असू शकते. यामुळे मुलांच्या संवाद कौशल्यात नक्कीच चांगली भर पडण्यास मदत होईल. नियमितपणे या ३ गोष्टी केल्यास त्याचा मुलांना चांगला फायदा होण्यास मदत होईल.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं