लहान मुलांचे संगोपन हा एक अतिशय महत्त्वाचा अभ्यासाचा विषय आहे. मात्र आपल्याकडे याकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. मुलांचे योग्य पद्धतीने संगोपन करायचे तर त्यांना अभ्यास, चांगल्या सवयी यांबरोबरच व्यवहाराच्याही ४ गोष्टी आवर्जून शिकवायला हव्यात. आपल्याकडे याबाबत पुरेशी जागरुकता नसल्याने मुलांना जगण्याची मूल्य शिकवायला हवीत असा दृष्टीकोनच नसतो. परिणामी मुलांमध्ये लहानपणापासूनच आत्मविश्वासाची कमतरता असणे, चारचौघात बोलण्याचे-वागण्याचे भान नसणे, व्यवहारज्ञान नसणे अशा समस्या दिसायला लागतात. मात्र वेळीच मुलांमध्ये या गोष्टी रुजवल्या तर त्यांचे आयुष्य नक्कीच सुकर होऊ शकते (Know How to Make Our Child Confident Adult) .
आता मुलांना व्यवहाराच्या गोष्टी शिकवायच्या म्हणजे नेमकं काय करायचं याविषयी मानसोपचारतज्ज्ञ प्रिती काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. आपल्या पॅरेंटींग डायरीज विथ प्रिती या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या पालकांशी याविषयी संवाद साधतात. मुलं मोठी झाल्यावर एक जागरुक नागरीक व्हावीत यासाठी पालकांनी लहानपणापासून काही गोष्टी त्यांच्याशी वागताना लक्षात ठेवायला हव्यात. तरच भविष्यात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आता त्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी प्रिती आपल्या व्हिडिओतून सांगतात.
१. आत्मविश्वास वाढवायचा तर...
मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवायचा तर मुलांना लहानपणापासूनच त्यांचे निर्णय घ्यायला लावायला हवेत. त्यामुळे नकळत त्यांना निर्णय घेण्याची तर सवय लागतेच पण त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही याची चांगली मदत होते. यामध्ये ते अगदी त्यांना कोणते कपडे घालायचेत, चपला कुठे ठेवायच्या, कुठे अभ्यास करायचा, खायला कुठे बसायचं अशा कोणत्याही गोष्टींचे निर्णय घेण्याचा समावेश असू शकतो. त्यानंतर जे चांगले-वाईट परीणाम होतील त्याचा मुलांवर जो परिणाम होतो तोही त्यांना अनुभवू द्यायचा.
२. कुठे नाही म्हणायचे हेच समजत नाही
मुलं मोठी होतात, कॉलेजला जातात, हॉस्टेलला राहायला लागतात. अशावेळी चांगल्या कुटुंबातून असूनही ते व्यसनांच्या आहारी जातात. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आयुष्यात त्यांनी कधीच आपले निर्णय घेतले नसल्याने असे घडते. विशिष्ट वयात चुकीच्या गोष्टी जेव्हा त्यांच्यासमोर येतात तेव्हा त्यांना नाही कसे म्हणायचे हेच अनेकदा त्यांना समजत नाही आणि ते व्यसनांची शिकार होतात. त्यामुळे विरोधात निर्णय कसा घ्यायचा हेच न समजल्याने मुलांच्या हातून चुकीच्या गोष्टी घडून बसतात. त्यामुळे मुलांना लहानपणापासून आपले निर्णय आपण घेण्याची सवय असायला हवी. प्रत्येक गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम तपासून पाहायला हवेत. त्याच्या परिणामांनाही सामोरे जाण्याची तयारी हवी.