Join us  

मुलांना वेळच देता येत नाही म्हणून स्वतःवर चिडता? ४ गोष्टी - मुलेही होतील खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 9:50 AM

Know how to make Parenting Easy : आपण मुलांशी त्यांच्या आवडीप्रमाणे खेळू शकत नाही म्हणून आपण काहीतरी चुकतो आहोत असं समजायचं अजिबात कारण नाही

मुलांसोबत आपण खेळलो, त्यांना वेळ दिला तर आपलं पालकत्व सोपं होतं असं अनेकदा सांगितलं जातं. पण मुलांसोबत घर-घर किंवा शाळा-शाळा खेळणे प्रत्येक आईला किंवा वडिलांना जमेल, आवडेलच असं नाही. अनेकदा आपण खूप जबरदस्ती त्यांच्यासोबत हे खेळतो मात्र आपण त्याचा आनंद घेऊ शकत नाही आणि देऊही शकत नाही. पण काहीवेळा काही पालक मात्र मुलांशी अगदी एकरुप होऊन हे खेळ खेळू शकतात. आपण मुलांशी त्यांच्या आवडीप्रमाणे खेळू शकत नाही म्हणून आपण काहीतरी चुकतो आहोत किंवा आपल्यात काही कमी आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही (Know how to make Parenting Easy). 

कारण पालक आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट यायलाच हवी किंवा आवडायलाच हवी असं काही बंधन नाही. पण मग आपल्या बाबतीत असं होत असेल तर आपण मुलांना क्वालिटी टाईम कसा द्यायचा किंवा त्यांच्यासोबतचा वेळ चांगल्या पद्धतीने कसा घालवायचा हा प्रश्न कायम राहतो. तर त्यासाठी आपल्याला काही वेगळ्या गोष्टी करण्याची निश्चितच आवश्यकता असते. प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी यांनी याबाबतच पालकांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या असून मुलांसोबतचा हा वेळ कसा घालवायचा ते पाहूया...

नियोजन अतिशय महत्त्वाचे...

१. आपण मूल जन्माला आल्यापासून त्याला कधी झोपवायचे, कधी खायला घालायचे, कधी डायपर बदलायचे याचे अतिशय बारकाईने प्लॅनिंग करतो. त्याचप्रमाणे मुलांसोबतच्या अॅक्टीव्हीटीज किंवा त्यांनी कोणत्या वेळेला काय करायचे याचेही बारकाईने प्लॅनिंग करायला हवे. 

२. या वेळात आपण त्यांच्यासोबत चित्र रंगवणे, काही लिहीणे, वाचन करणे, बैठे खेळ खेळणे, त्यांना आवडणाऱ्या विषयांवर गप्पा मारणे असे नक्कीच करु शकतो. त्यामुळे ते कंटाळणार नाहीत आणि त्यांनाही आपण त्यांना वेळ दिला याचे समाधान वाटेल. 

३. मुलांना शाळेला, पाळणाघराला सुट्ट्या असतील तेव्हा ते कुठे बाहेर जातील, घरात काय अॅक्टीव्हीटी करु शकतील, मित्रमैत्रीणींसोबत कोणत्या वेळेला खेळू शकतील याचे प्लॅनिंग असेल तर आपले पालकत्त्व नक्कीच सोपे होऊ शकते. 

४. याचप्रमाणे सणावाराला घरी पाहुणे येणार असतील तेव्हा मुलांनी काय करायला हवे. आपण बिझी असताना मुलांचा वेळ त्यांनी कसा सत्कारणी लावायला हवा. आपण मोकळे असताना त्यांना कशाप्रकारे वेळ देऊ शकतो या गोष्टींचे बारकाईने प्लॅनिंग केले तर मुलांचा आपल्याशी कनेक्ट चांगला राहील आणि पालक व मुले दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवण्याचे प्रेशर न येता पालकत्वाचा हा प्रवास आनंदाचा-उत्साहाचा होऊ शकेल.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं