पाठदुखी ही आता अतिशय सामान्य समस्या झाली आहे. हा त्रास आता केवळ तरुणांची आणि वयस्कर लोकांची समस्या राहीलेली नाही. तर अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनाही आता पाठदुखीची समस्या उद्भवते. दप्तराचे ओझे, सततचा स्क्रीन टाइम, बसण्याच्या चुकीच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव यांमुळे मुलांना पाठ दुखण्याची समस्या उद्भवते. लहान वयात अशाप्रकारे पाठदुखी आणि मणक्याच्या समस्या उद्भवणे हे या लहानग्यांच्या भविष्यासाठी अतिशय धोकादायक असते. शाळेच्या किंवा ट्यूशनच्या दप्तरामध्ये प्रमाणाबाहेर सामान असल्याने पाठीवर आणि मानेवर ताण येतो. गेल्या काही वर्षांत कोरोनामुळे आणि एकूणच मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर लहान वयातील मुलांमध्येही वाढला असल्याने तेही मानदुखी आणि पाठदुखीचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे (Know the Reasons Behind Children's back pain Doctor Says).
याबाबत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना सांगळे सांगतात...
आपल्या पाठीच्या कण्याला नैसर्गिक बाक आणि वळणे असतात ,कुठल्याही कारणाने हा बाक आणि वळणे (Curvetures)जर वाढली किंवा त्यावर ताण पडला तर पाठ दुखू शकते .चुकीच्या पद्धतीने बसणे, तासंतास लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही बघत एका जागी बसणे, व्यायामाचा अभाव, प्रमाणाबाहेर वाढलेले वजन आणि मैदानी खेळांचा अभाव ही लहान मुलांमध्ये पाठदुखी होण्याची मुख्य कारणे आहेत. चालायची, बसायची, वाकायची योग्य पद्धत, शरीराची योग्य पद्धतीने होणारी हालचाल आणि त्याचा व्यायाम यामुळे बरेचदा ही पाठदुखी बरी होऊ शकते.
मात्र आवश्यक असल्यास त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. काही कारणाने पाठ दुखत असेल असे म्हणून मुलांच्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नये. या पाठदुखीमागे काही काही जुने आजार (chronic disease) असतील तर ते ओळखून डॉक्टर त्यावर औषधोपचार सुरू करू शकतात. पण मुख्यतः व्यायामाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने चालणे बसणे आणि वाढलेले वजन हे पाठदुखीमागचे मुख्य कारण असते. त्यामुशे या गोष्टींकडे गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे. मुलांनाही याकडे विशेष लक्ष देण्यास सांगावे.