Join us  

आईला पाहिलं की मुलं हट्टीपणा करतात, एरव्ही एकदम शहाण्यासारखी वागतात, असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 5:12 PM

Know Why Child Behave Worse with Mom : एरवी शहाण्यासारखी वागणारी मुलं आई दिसली की हट्ट करतात, आक्रस्ताळी होतात, जेरीस आणतात असं का?

आई म्हणून आपण समोर आलं की मुलं खूप हट्ट करतात, भयंकर त्रास देतात. रडारडी, आरडाओरडी हे सगळं आईसमोर आल्यावरच होतं. एरवी ते अतिशय शहाण्या मुलांसारखे वागतात. शाळेत, क्लासमध्ये ते आदर्श विद्यार्थी असतात. शिक्षकांना किंवा इतर पालकांना विचारलं तर ते त्यांच्या मुलांना आपल्या मुलाचे उदाहरण देऊन वागण्यास सांगतात हे ऐकल्यावर आपला त्यावर काही काळ विश्वासच बसत नाही. पण खरंच बाहेर अतिशय गुणाने वागणारी मुलं आपण समोर आलो की असे विचित्र का वागतात असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो (Know Why Child Behave Worse with Mom). 

यावर काय करावे तेही अनेकदा आपल्याला कळत नाही. मग आपला मुलांशी संवाद होण्याऐवजी वाद होतो आणि पालक म्हणून आपले मुलांशी नाते बिघडत जाते. आपण आधीच घरातली कामं, ऑफीस हे सगळं करुन खूप वैतागलेले असतो. अशातच मुलांनी हट्टीपणा किंवा रडारड केली की आपले नियंत्रण सुटते आणि मग आपण एकतर त्यांच्यावर ओरडतो किंवा हात उचलतो. पण असे केल्याने परिस्थिती सुधारत नाही तर जास्त हाताबाहेर जाते. पण असं का होतं? डॉ. संतोष यादव याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात.

 

मुलं आईसमोरच सगळ्यात जास्त हट्टी का असतात?  

मुलं आईसमोर असताना ८०० पट जास्त हट्टीपणा करतात असं एक अहवाल सांगतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुलं आईसोबत सगळ्यात जास्त सेफ फिल करतात. त्यांना आईजवळ सगळ्यात जास्त सुरक्षित वाटतं. त्यामुळे ते आपल्या भावना सहजपणे व्यक्त करु शकतात. त्यामुळे मुलं त्यांच्या मनाला वाटेल तसं मोकळेपणाने वागू शकतात. त्यामुळे मुलं तुमच्यासमोर जास्त नखरे करत असतील, हट्टीपणा आणि आरडाओरडा करत असतील तर तुम्ही आई म्हणून तुम्ही वैतागू नका. तर उलट आपलं मूल असं करतंय म्हणून तुम्ही आनंदी व्हायला हवं. कारण याचाच अर्थ मूल तुमच्याशी कनेक्टेड असण्याचे आणि तुमच्यासोबत ते सेफ फिल करत असल्याचे हे महत्त्वाचे लक्षण आहे हे लक्षात घ्या. 

अशावेळी पालक म्हणून तुम्ही काय करायला हवे? 

मुलांनी दंगा करण्याचे किंवा कोणतीही गोष्ट करण्याचे लिमीट सेट करायला हवे. मात्र हे करताना रागाने किंवा वैतागून न करता प्रेमाने करायला हवे. यामुळे मुलांना भविष्यात कुठे कसे वागायचे हे समजेल. त्यामुळे तुमच्या मुलाने पुढच्या वेळी तुमच्यासमोर हट्टीपणा केला तर तुम्ही आनंदी व्हायला हवे. कारण याचा अर्थ मुलाचे तुमच्यावर खूप प्रेम आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं