Join us  

नवजात बाळांना अजिबात देऊ नका गायीचे दूध, डॉक्टर सांगतात यामागची ५ कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 5:43 PM

Know Why cow milk is harmful for infants below 1 year : नवजात अर्भकांना हे दूध देणे योग्य नाही असे बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन मंडाविया यांचे म्हणणे आहे.

लहान बाळ हे फक्त दूधावर असल्याने किमान ६ महिन्यापर्यंत तरी त्याला फक्त दूधाचाच आहार दिला जातो.  बाळाच्या आईला अंगावर दूध नसेल किंवा कमी प्रमाणात असेल तर बाळाचे पोट भरण्यासाठी वरचे दूध देण्याचा सल्ला दिला जातो. वरचे दूध म्हणजे एकतर फॉर्म्युला मिल्क किंवा गायीचे नाहीतर म्हशीचे दूध. लहान बाळांसाठी गायीचे दूध जास्त चांगले म्हणून त्यांना गायीचे दूध देण्याचे प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. गायीच्या दुधात लहान मुलांच्या शरीरासाठी आवश्यक असणारे बरेच पोषक घटक असतात त्यामुळे हे दूध केव्हाही आरोग्यासाठी जास्त चांगले मानले जाते. मात्र नवजात अर्भकांना हे दूध देणे योग्य नाही असे बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन मंडाविया यांचे म्हणणे आहे. त्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत याबाबत डॉ. मंडाविया यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून विस्ताराने माहिती दिली आहे, ती समजून घेऊया (Know Why cow milk is harmful for infants below 1 year)...

१. हाय कॉम्प्लेक्स प्रोटीन 

गायीच्या दुधात खूप जास्त प्रमाणात कॉम्प्लेक्स प्रोटीन असते. या प्रोटीनचा नवजात अर्भकाच्या किडणीवर चुकीचा परीणाम होण्याची शक्यता असते. हे प्रोटीन पचवण्याची ताकद लहान बाळांमध्ये नसल्याने हे दूध प्यायल्याने मुलांच्या किडणी खराब होऊ शकतात. यामुळे जुलाब तसेच संडासवाटे रक्त येण्याचीही शक्यता असते. 

(Image : Google)

२. लोहाची कमतरता 

गायीचे दूध पोषण देणारे असते असे आपण म्हणत असलो तरी त्यामध्ये लोहासारखे पोषक घटक नसतात. मुलांच्या वाढीसाठी हे घटक आवश्यक असल्याने जन्मानंतर लगेचच गायीचे दूध दिल्यास लोहाची कमतरता होऊन अॅनिमियासारख्या तक्रारी उद्भवू शकतात. 

३. व्हिटॅमिन सी

गायीच्या दूधात व्हिटॅमिन सी अजिबात नसते. मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय गरजेचे असते. मुलांची वाढ आणि विकास यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचे असल्याने मुलांना दूधातून ते मिळायला हवे. 

४. पोषण होत नाही

आपण लहान बाळांना वरचे दूध देताना त्यामध्ये काही प्रमाणात पाणी मिसळून देतो. त्यामुळे दूध पचायला हलके होते असा आपला समज असतो. मात्र गायीच्या दूधात आधीच फॅटस नसतात, त्यात पाणी घातल्याने आहेत तेही फॅटस नीट मिळत नाहीत. 

५. लठ्ठपणा 

गायीच्या दुधात फोस्फेट आणि प्रोटीन दोन्हीही चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे सतत हे दूध प्यायल्यास मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढते. यामुळे मुलं लठ्ठ किंवा वजनदार दिसतात पण त्यांची वाढ किंवा विकास म्हणावा तसा होत नाही. 

त्यामुळे १ वर्षाच्या आतील मुलांना गायीचे दूध न देतो फॉर्म्युला मिल्क देणे केव्हाही जास्त चांगले. १ वर्षानंतर गायीचे दूध दिल्यास हरकत नाही.  

टॅग्स :पालकत्वदूधलहान मुलंआरोग्य