Lokmat Sakhi >Parenting > तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या आईनं मागितली प्रवाशांची माफी!- पण आईने का ‘सॉरी’ म्हणावं?

तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या आईनं मागितली प्रवाशांची माफी!- पण आईने का ‘सॉरी’ म्हणावं?

तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या एका आईनं २०० प्रवाशांना गुडी बॅग्ज देत सांगितलं की, माझं बाळ रडलं तर माफ करा! ही अशी माफी आईने का मागायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 04:00 PM2022-03-23T16:00:20+5:302022-03-24T14:23:14+5:30

तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या एका आईनं २०० प्रवाशांना गुडी बॅग्ज देत सांगितलं की, माझं बाळ रडलं तर माफ करा! ही अशी माफी आईने का मागायची?

Korean mom gives 200 crying baby goodie bags, saying sorry! | तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या आईनं मागितली प्रवाशांची माफी!- पण आईने का ‘सॉरी’ म्हणावं?

तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या आईनं मागितली प्रवाशांची माफी!- पण आईने का ‘सॉरी’ म्हणावं?

Highlights आपणही स्वत:ला विचारावं, रडकं बाळ आईचं, दोष आईचाच असं म्हणत आपणही आईलाच दोष देत गुडी बॅगसह सॉरी म्हणायला लावणार का?

अनन्या भारद्वाज


गोष्ट तशी जुनी आहे, फेब्रुवारी २०१९ची. मात्र, आता पुन्हा ती समाजमाध्यमात व्हायरल झाली आहे. तर गोष्ट काय, सेऊल, कोरियाची राजधानी. तिथून एक विमान निघालं ते अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोला. दहा तासांचा प्रवास. त्या प्रवासातली ही गोष्ट १२ फेब्रुवारी २०१९ रोजी एका प्रवाशाने फेसबुकवर पोस्ट केली. त्या विमानात एका महिलेनं २०० प्रवाशांना ‘गुडी बॅग्ज’ भेट दिल्या. त्या बॅगेत काही चॉकलेट्स, एअर प्लग्ज आणि एक छोटं पत्र होतं. ‘जुनवू’ नावाच्या ४ महिन्यांच्या बाळाचं पत्र. ते बाळ प्रवाशांना सांगत होतं, ‘मी चार महिन्यांचा आहे. पहिल्यांदाच विमानात बसलोय. माझी आई आणि आजीसह माझ्या मावशीला भेटायला अमेरिकेला जातोय. पण पहिलाच प्रवास, मी लहान आहे. तर मी चिडू-रडू शकतो. प्रयत्न करतो न रडण्याचा, पण प्रॉमिस करत नाही. जर मी रडलोच आणि तुम्हाला त्रास झाला तर हे एअरप्लग वापरा आणि मला सांभाळून घ्या...’ ती पोस्ट, बाळासह त्या आईचा फोटो तेव्हाही व्हायरल झाला. (आता पुन्हा समाजमाध्यमात फिरतोय.) अनेकांनी त्या महिलेचं हे ‘सौजन्यपूर्ण’ वर्तन किती जबाबदारीचं आहे, अशा पोस्ट लिहिल्या. लांबच्या विमान प्रवासात बाळं रडत असतील तर प्रवाशांची झोपमोड होते, काम होत नाही, चिडचिड होते, असे अनुभव अनेकांनी लिहिले. ते पाहता पालक म्हणून ही जुनवूची आई किती जबाबदारीने वागली म्हणून तिचं कौतुक झालं.

(Image : Google)

अमेरिकेतल्या एका वृत्त समुहात फोटोग्राफर असलेल्या दीव कोरोना यांनी ती पोस्ट शेअर केली होती. मात्र, ते म्हणतात, ‘मी काही अशी गुडी बॅग वाटणार नाही. पण, मी त्या आईची भावना समजू शकतो. मला जुळी मुलं आहेत. त्यांना प्रवासाला, हॉटेलात नेताना पालक म्हणून जी तारांबळ उडते ती अवघडच असते.’
त्यामुळेच एकीकडे जुनवूच्या आईचं कौतुक होत असलं तरी तेव्हाही या विषयावर चर्चा करताना अनेक महिलांनी असं गुडी बॅग्ज वाटत, इतरांना आईने सॉरी म्हणणं, अपराधीभावानं प्रवास करणंच मान्य नव्हतं.
अनेक महिलांचं म्हणणं होतं की, ‘आईने का सॉरी म्हणायचं?’
मूल होणं, मूल सोबत घेऊन प्रवास करणं, हा काही बाईचा गुन्हा नाही. लहान मुलं रडणं, चिडणं, प्रवासात त्रास देणं नैसर्गिक आहे. त्याचा इतर प्रवाशांना त्रासही होतोच. पण आपणही कधीतरी लहान होतो, आपल्यालाही मुलं आहेत, आपल्या जीवाभावाच्या माणसांना मुलं आहेत आणि मुख्य म्हणजे माणसाची तान्ही बाळं रडतातच हे न समजण्याइतके काही समाज म्हणून आपण कठोर नाहीत.
इथं चर्चा तान्ह्या बाळांची आहे. नवजात ते दीड - दोन वर्षांची अगदी लहान मुलं. तिथून पुढची मुलं उगाच दंगा करत असतील, पालक त्यांना दापतच नसतील, तर प्रवाशांना त्रास होतो अशी कुरकुर करणं रास्त आहे. पण जे बाळ तान्हं आहे, रडणं हीच ज्याची भाषा त्यानं आणि म्हणजे त्याच्या आईनं का मोठ्यांना सॉरी म्हणावं?
टुडे.डॉटकॉमच्या संपादकांनी २०१४मध्येच या विषयावर एक लेख लिहिला होता. २०१९मध्ये जुनवूची गुडी बॅग व्हायरल झाल्यावर त्यांनी तो पुन्हा पोस्ट केला. २०१४मध्येही एका तान्ह्या बाळाच्या आईनं अशी गुडी बॅग वाटली होती, तर संपादक रिबिका डुबे आपल्या लेखात म्हणतात, ‘हा ट्रेण्ड धोकादायक आहे आणि आईवर कामाचा अतिरिक्त बोजा लादणारा आहे. तान्हं बाळ घेऊन प्रवास करणाऱ्या आईवर आधीच बराच ताण, बरीच तयारी असते. त्यात हे गुडी बॅग्ज वाटा, इतरांना सॉरी म्हणा. का तर तिला लहान बाळ आहे, हा तिचा दोष? बाळ घेऊन ती प्रवास करते हा गुन्हा? म्हणजे आईनं काय घरातच बसून राहायचं का? आणि ती बाहेर निघाली बाळाला घेऊन तर समाजाची माफी मागायची? हे मान्य की पालकांनी मूल रडूच नये म्हणून काही प्रयत्न करणं, काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, अनेकदा सगळं करुनही बाळं रडतात. सोबतच्या प्रवाशांना त्रास होतो. पण त्यांनी आपली सहनशक्ती थोडी वाढवणं हेच माणूसकीचं लक्षण आहे. माणसांची बाळं रडणं यात चूक किंवा अनैसर्गिक काय आहे? आणि त्यासाठी आईने का सतत मनात अपराधभाव घेऊन जगायचं?’
अशी मतं समाजमाध्यमात त्याकाळी अनेक महिलांची दिसतात. किरस्टे हान नावाची एक महिला म्हणते, ‘आपण आई झालो, याचाच नव्या आईवर ताण असतो. आता मूल रडलं तर काय याचं टेन्शन येतं आणि मूल रडलं की लोक कायम आईलाच दोष देतात. आईने सतत अपोलोजेटिकच राहायला हवं, असा काय समाजआग्रह? त्या आईला मदत करणं तर दूर तिचं मूल रडलं म्हणजे तिचाच दोष, असा हा सूर चुकीचा आहे.’
फिलिस्ती हमिदा नावाची एक समाजमाध्यम वापरकर्ती म्हणते, ओसाका ते ॲमस्टरडम या प्रवासात माझ्या शेजारी बसलेल्या महिलेचं मूल रडत होतं. तिचीही तब्येत बरी नव्हती. मी तिला म्हटलं तू औषध घेऊन थोडा आराम कर, मी बाळ सांभाळते. बाळ माझ्याकडे राहिलं, शेजारच्या सीटवर बोअर होत असलेला एक मुलगा अजून एक प्रवासी बाळाशी खेळायला आले. आम्ही सांभाळलं ते मूल. बाईंना किरकोळ मदत झाली. ठरवलं तर अवघड नाही हे, फक्त आईला दोष देण्याइतकं सोपं नाही, इतकंच!
आता आपल्याकडे पुन्हा हा फोटो व्हायरल असताना आणि त्या कृतीचं कौतुक होत असताना आपणही स्वत:ला विचारावं, रडकं बाळ आईचं, दोष आईचाच असं म्हणत आपणही आईलाच दोष देत गुडी बॅगसह सॉरी म्हणायला लावणार का?

Web Title: Korean mom gives 200 crying baby goodie bags, saying sorry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.