Join us  

माधुरी दीक्षित देतेय लेकाला स्वयंपाकाचे धडे; मोठं होताना स्वयंपाक तर शिकायलाच हवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2023 12:20 PM

Madhuri Dixit And Shriram Nene Teaches Their Son Arin How To Cook : आईच्या भूमिकेत असलेल्या माधुरीला वाटतं आपल्याही मुलांना सगळं यायला हवं

ठळक मुद्दे१० मिनीटांत होणारी ही भारतीय रेसिपी अरीन स्वत: करताना दिसतो.याचा व्हिडिओ नुकताच डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

स्वयंपाक म्हणजे काहीतरी अवघड काम आणि ते फक्त महिलांनीच करायचं असतं. या स्टिरिओटाईपमधून आता आपल्यातील बरेच जण बाहेर यायला लागले आहेत. आई-वडील दोघंही वर्किंग असल्याने हल्ली अनेकदा काही घरांत बाबा कुकर लावताना दिसतो तर कधी मुलांना काहीतरी खाऊ करुन देताना दिसतो. त्यामुळे स्वयंपाकाच्या बाबतीलत मुलगा-मुलगी हा भेद न राहता आता घरातील सगळ्यांनीच सगळ्या गोष्टी करायला हव्यात असे आपण मुलांना सांगतो. आपणही मुले थोडी मोठी झाली की त्यांना चहा करणे, सँडविच, मॅगी असे काही ना काही करायला शिकवतो. त्याचप्रमाणे बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिनेही नुकतेच आपल्या मुलाला स्वयंपाकाचे धडे दिले (Madhuri Dixit And Shriram Nene Teaches Their Son Arin How To Cook).

लग्नानंतर माधुरी संसारात चांगलीच रमल्याचे दिसते. अमेरिकेत स्थायिक असलेल्या डॉ. श्रीराम नेने आणि मुलांसोबतचे तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. माधुरी सेलिब्रिटी असली तरी घरात काही ना काही रेसिपी आवर्जून करताना दिसते. इतकेच नाही तर आता ती आपल्या मुलालाही कुकींगचे धडे देत आहे. माधुरी आणि डॉ. नेने आपल्या मुलांच्या विकासाबाबत बरेच जागरुक असल्याचे त्यांच्या पोस्टमधून दिसते. याचाच एक भाग म्हणजे आता आपला मुलगा अरीन यालाही कुकींगमधलं काही ना काही करता यायला हवं यासाठी या दोघांनी त्याला खास धडे दिले आहेत. याचा व्हिडिओ नुकताच डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

यामध्ये अरीन मसाला ओटस बनवताना दिसत आहे. अगदी १० मिनीटांत होणारी ही भारतीय रेसिपी अरीन स्वत: करताना दिसतो आणि त्याचे आईवडील म्हणजेच माधुरी आणि डॉ. नेने याबद्दल त्याचे कौतुक करताना दिसतात. भारतात सहज मिळणारे आणि झटपट होणारे चविष्ट असे मसाला ओटस आरोग्यासाठीही अतिशय चांगले असल्याचे डॉ. नेने यामध्ये सांगताना दिसतात. माधुरीला अरीन आणि रयान अशी २ मुले असून अरीन आता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पण आपल्या मुलांना स्वयंपाकातील किमान गोष्टी यायला हव्यात असे वाटत असल्याने या दोघांनी अरीनला हे खास कुकींगचे धडे दिल्याचे दिसते. 

टॅग्स :पालकत्वमाधुरी दिक्षितकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.