Join us  

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठच बंद केला तर फायद्याचं ठरेल, की तोट्याचंच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 2:09 PM

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे नुकतेच शिक्षणमंत्री म्हणाले. खरंच मुलांचा गृहपाठ बंद करणं फायद्याचं ठरेल?

ठळक मुद्देगृहपाठ करण्यासाठी किती वेळ द्यावा लागेल, त्याचे मुलांच्या वयानुसार तारतम्य ठेवावे लागेल.

विनोदिनी काळगी

‘शालेय शिक्षण’ ही प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणारी महत्त्वाची गोष्ट आहे, त्यातूनच पुढची पिढी सक्षम होणार आहे आणि म्हणूनच तिचा अतिशय गंभीरपणे विचार होणे गरजेचे असते. त्यासाठी शैक्षणिक धोरण हे कोणताही पक्ष, व्यक्ती यावर अवलंबून असता कामा नये. प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक, शिक्षणाचा अभ्यास करणारी तज्ज्ञ मंडळी यांनीच ते आखलेले असायला हवे. पण आपल्याकडे कोणालाही याचे गांभीर्य नाही, असे दिसते. व्यक्ती बदलली की, त्यांनी आपल्या मनाला येतील ते निर्णय जाहीर करावेत. मग तो वर्गात शिक्षकाचा फोटो लावण्याचा असो की गृहपाठ बंद करण्याचा असो आणि यांचे आदेश मानायचे कोणी तर सरकारी आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांनी. तिकडे अनेक इंग्रजी शाळांनी सीबीएसई, आयसीएसई इत्यादी बोर्ड घेऊन राज्य सरकारपासून आपली सुटका करून घेतलेली असते. माझ्या अनुभवानुसार याच शाळांमध्ये भरमसाठ गृहपाठ देतात आणि फक्त गृहपाठ करून घेण्यासाठी अनेक पालक मुलांना ट्युशन लावतात.असो, तर आजचा आपला विषय आहे गृहपाठ!

(Image : Google)

माझ्यामते गृहपाठ ही आवश्यक गोष्ट आहे. फारतर तो किती आणि कसा असावा, यावर चर्चा होऊ शकते. शिक्षण ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. त्यामुळे जसे शाळेत शिक्षण होते तसेच ते घरीही होऊ शकते. त्यातील काही वेळ हा शाळेत शिकलेल्या औपचारिक शिक्षणाच्या दृढीकरणासाठी देता येईल तर बाकी वेळ घरातील, परिसरातील गोष्टींतून अनौपचारिक शिक्षणासाठी देता येईल. एकतर मुले ५-६ तास शाळेत आणि त्यापेक्षा जास्तवेळ घरी असतात. त्यांच्याकडे बराचवेळ असतो. बहुतेक मुले शाळेतून अभ्यास दिला असेल तरच घरी अभ्यास करतात, नाहीतर नुसताच दंगा-मस्ती-टाईमपास. त्यातून कोविड काळात त्यांची अभ्यासाची, बैठकीची, एकाग्रतेची सवय कमी झाली आहे. बऱ्याच जणांना मोबाइल, टीव्ही यांचा छंद जडला आहे. यावर उपाय म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या वेळाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी शिक्षकांना गृहपाठाचा कल्पकतेने उपयोग करता येईल.काही शाळांतील शिक्षक तसे करतही आहेत. मात्र, काही शिक्षक वर्गात लिहून दिलेले परत उतरवून काढा, मी सांगितलेली उत्तरे पाठ करा, धड्याखालची प्रश्नोत्तरे लिहा, गणिताचा प्रश्नसंग्रह पूर्ण करा, असे लिहिण्यावर भर असणारे आणि काहीच नाविन्य नसणारे गृहपाठ देतात. लिहिणे ही अभ्यासातील महत्त्वाची पायरी असली तरी ती एकमेव गोष्ट नाही आणि नुसते बघून उतरवून काहीच उपयोग होत नाही. अशा गृहपाठांचा मुलांना कंटाळा येतो, जाच वाटतो. अभ्यासक्रमाचे दृढीकरणही व्हावे आणि मुलांनी त्यातून काहीतरी नवीन शिकावे, करून बघावे असे अनेक गृहपाठ तयार करता येतात. नमुना दाखल आमच्या शाळेचे काही गृहपाठ सोबतच्या चाैकटीत आहेत.कल्पक शिक्षक ही यादी कितीपण वाढवू शकतील.

(Image : Google)

अर्थात मुलांना मुक्त खेळण्यासाठीही वेळ द्यायला हवा. त्यामुळे गृहपाठ करण्यासाठी किती वेळ द्यावा लागेल, त्याचे मुलांच्या वयानुसार तारतम्य ठेवावे लागेल.ही सर्व जबाबदारी एकट्या शिक्षकाची नाही तर पालकांचीही आहे हे लक्षात ठेवून पालकांनी ठरवून रोज मुलांसाठी वेळ काढायलाच हवा. मुलांना आज वर्गात काय शिकवले, शाळेत काय मजा आली यावर चर्चा करणे, दिलेला गृहपाठ मुले नीट पूर्ण करतात का ते बघणे, त्यात मुलांना आवश्यक ती मदत करणे, एखाद्या दिवशी गृहपाठ नसेल तर स्वत:हून मुलांबरोबर कृती करणे, बाजार-बस स्टँड-रेल्वे स्टेशन-एखादे प्रदर्शन इत्यादी ठिकाणी मुलांना मुद्दाम नेऊन माहिती करून देणे अशा कितीतरी गोष्टी पालकांनी करणे आवश्यक आहे. यातून त्यांचे मुलांबरोबरचे नातेही सुदृढ होईल.या सर्वांतून मुलांच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळेल. गृहपाठाचा कल्पक आणि उत्तम विचार करण्याची गरज आहे. शिक्षक-पालक आणि धोरणकर्त्यांनीही. महाराष्ट्रभरातील माझे अनेक सहकारी शिक्षक खूप वर्षांपासून शिक्षक भरतीच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत, आंदोलन करत आहेत. त्याकडेही शासनाने लक्ष दिले तर फारच बरे होईल.

(Image : Google)

गृहपाठ म्हणून काय देता येईल?

1. घरातील वेगवेगळे वासाचे पदार्थ शोध व यादी कर.... तुझे आवडते व नावडते असे वर्गीकरण कर.2. तुझे एक खेळण घे व त्याबद्दल सात आठ ओळी लिही, चित्रपण काढ.3. स्वयंपाकघरातील क्रिया माहीत करून घे. उदा. लसूण सोलणे, ताक घुसळणे....4. तुझ्या घराचा नकाशा काढ किंवा मेकॅनोच्या साह्याने थ्रीडी नकाशा बनव.5. पहाटे सूर्योदयाच्या वेळी खिडकीतून किंवा बाहेर जाऊन निसर्गाचे निरीक्षण कर व ते वर्गात सांग.6. वर्तमानपत्रातील तुला समजणारी बातमी कापून आण.7. दोऱ्यापासून एक खेळणे बनवून आण.8. तुझ्या आवडत्या कार्टूनबद्दल लिही.9. आई-बाबांच्या मदतीने कुटुंबाचा वंशवृक्ष तयार कर.10. तुझी लहानपणीची एखादी आठवण घरच्यांना विचार व उद्या वर्गात सांग.11. ‘मुग्धा लिहू लागली’ धड्यावर आधारित.... तू तुझी रोजनिशी लिही, वर्गात वाचून दाखव.12. घरातील जोडीच्या वस्तू शोध व लिही. जसे कुलूप किल्ली, गादी उशी...13. घरातील किंवा शेजारील आजी, आजोबा यांना प्रश्न विचारून मुलाखत घे.14. मित्रांबरोबर पाठीवर अक्षर बोटाने गिरवून ओळखण्याचा खेळ खेळ15. तुझ्या घरात असणाऱ्या 'क' आवाजाच्या वस्तूंची चित्र काढ.16. कुंडीत किंवा प्लास्टिकच्या डब्यात बी रुजवून, पाणी दे, निरीक्षण कर.17. शब्दाच्या शेवटी 'डी' आवाज येणारे शब्द आठव व लिही.18. तुला आवडणारी कोणतीही एक गोष्ट ऐक व त्यातील तुला काय आवडले त्याचे चित्र काढ.19. आई, बाबांची मदत घेऊन छोटासा पदार्थ तयार कर. पदार्थ तयार करून झाल्यावर तो पदार्थ तयार करताना काय काय साहित्य वापरले ते लिही किंवा त्याचे चित्र काढ.20. तुझ्या घरातील लाकडी वस्तूंची नावे लिही.21. पालकांच्या मदतीने घड्याळ तयार कर, स्वतः काटे फिरवून पूर्ण व अर्धा तासाची वेळ दाखव.22. वेगवेगळ्या वजन काट्यांचे निरीक्षण कर23. वजन कशाचे करतात, कुठे कुठे केले जाते, कोणते वजन काटे तू बघितले आहे त्या नावांची यादी कर.24. इंग्रजी महिने शिकल्यावर मित्रांचे, नातेवाइकांचे, शाळेतल्या ताईंचे वाढदिवस यांची माहिती गोळा करून चार्ट तयार कर. सांगितलेल्या क्रियेसाठी शाब्दिक उदाहरण तयार कर.25. दंडगोल, शंकू, इष्टिकाचिती या आकाराच्या घरातील वस्तू शोधून आणा व वर्गात त्यांचे प्रदर्शन मांडा.26. कागदाच्या नोटा बनवून मित्रांबरोबर दुकान-दुकान खेळ- 

(लेखिका नाशिकस्थित आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेच्या संचालक आहेत.)vinodini.kalagi@gmail.com 

टॅग्स :पालकत्वशिक्षण