मकर संक्रांत म्हटली की तिळगूळ, काळे कपडे यांबरोबरच आपल्याला आठवते ती आणखी एक गोष्ट म्हणजे आकाशात लहरणारे रंगीबेरंगी पतंग.पतंग उडवणे हा खेळ गेल्या काही वर्षात काही कारणाने मागे पडला. पूर्वी थंडीच्या दिवसांत मुले न चुकता टेरेसवर जाऊन तासनतास पतंग उडवताना दिसायची. मग आपला पतंग किती वर जातो, कोण कोणाचा पतंग कापतो इथपासून ते हाताची बोटे कापेपर्यंत आणि मान दुखेपर्यंत पतंग उडवायचा खेळ खेळला जायचा. पण कोरोनाचे सावट, मुलांना शाळा, क्लासेस यांसाठीही बाहेर पडता न येण्याच्या काळात आपण त्यांना थोडीशी मागे पडलेली पण खूप जास्त मजा असलेली पतंग उडवण्याची कला नक्कीच शिकवू शकता. अनेकदा रोजच्या धावपळीत मुलांना क्वालिटी टाइम द्यायला सध्या आपण कमी पडतो. आपल्यालाही त्याची जाणीव असतेच. पण सणावाराच्या निमित्ताने मुद्दाम थोडा वेळ काढून त्यांच्यात वेळ इन्व्हेस्ट केला तर त्यांच्या विकासासाठी त्याचा निश्चितच फायदा होणार हे लक्षात घ्यायला हवे. या पतंग उडवण्याबाबत प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी काही नेमक्या गोष्टी नोंदवल्या आहेत. पतंग हा वेळ घालवण्याचे साधन नसून तो उडवताना मूल बऱ्याच गोष्टी शिकते आणि त्यातून त्यांचा नकळत विकास होतो.
- पतंगामध्ये एक गणित असते, ते गणित मुलांना समजावून सांगायला हवे.पतंगाची कणी बांधणे हा अगदी स्पेशलाइज जॉब आहे. त्यात बॅलन्स राहायला हवा. पतंगाचे पूर्ण टेक्निक कणीच्या गाठीवर अवलंबून असतं. त्यामुळे नुसता पतंग उडवायला शिकवण्यापेक्षा तो बांधण्यापासून शिकवणे गरजेचे आहे.
- सुरुवातीला मूलांना यातली मजा, त्यातील तांत्रिक गोष्टी लक्षात येणार नाहीत. पण एकदा लक्षात आल्या की त्यांना त्यातली मजा उमगेल. कणीला असणाऱ्या ३ गाठींचा एक रेशो असतो, हा रेशो समजून घेऊन तो मूलांना शिकवणे गरजेचे असते. यामुळे मुलांना रेशो लक्षात येतो.
- दोन पतंग कणी बांधण्यासाठी वाया गेले तरी चालतील पण मुलांना स्वत:च्या हाताने पतंगाची कणी बांधायला लावावी. ते बांधत असताना त्यात पालकांनी हस्तक्षेप करु नये. सुरुवातीला ती कशी बांधायची हे एका पतंगावर शिकवावे, पण त्यांचा पतंग त्यांनाच बांधू द्यायला हवा. त्यांना जमतंय हा विश्वास आला की मुलांनाही या सगळ्या प्रक्रियेत नकळत मजा येईल.
- पतंगाला हिसका कसा द्यायचा हे शिकवणेही महत्त्वाचे असते. सुरुवातीला दोन वेळा स्लो हिसका दिला की पतंग बॅलन्स होतो आणि तिसऱ्या वेळी थोडा जोरात आणि तिरका हिसका दिला की पतंग वर जातो. यातली गंमत मुलांना अनुभवायला देण्यात मजा आहे.
- पतंग ही शिकवण्याची गोष्ट नसून ती अनुभवण्याची गोष्ट आहे, त्यामुळे मुले जितका तो हाताळतील तितकी त्यातली मजा त्यांना लक्षात यायला लागेल आणि ते या खेळात रमतील.
- निरीक्षणातून कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे असते, पतंग यासाठी अतिशय उत्तम माध्यम ठरु शकते. वाऱ्याची दिशा कशी, मांजा कसा धरायला हवा, त्याला किती प्रमाणात हिसका दिल्यास तो वर जाईल या गोष्टी ट्रायल आणि एरर मधूनच शिकता येतात.
- पतंग उडवण्याची कोणती परफेक्ट पद्धत नाही ही कला ज्याने त्याने त्या त्या वेळेनुसार ठरवायला हवी. असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्यानुसार पतंग उडवणे ही आणखी एक गोष्ट मुले यातून नकळत शिकतात.
- पतंगाला ढिल कधी द्यायची तो खेचायचा कधी यातून मुलांना परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे समजते. त्यामुळे या गोष्टी एकदा दाखवल्यानंतर त्यांच्या त्यांना करु द्याव्यात त्यातून त्यांचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल.
- पतंगाचे टोक खूप वरती असेल तर तो खेचावा लागतो, त्याला दिशा कशी द्यायची याच्यासाठी मुलांनी योग्य पद्धतीने निरीक्षण करणे आणि त्यातून शिकणे गरजेचे आहे. म्हणजेच निरीक्षण कसं करावं यासाठी पतंग उपयोगी ठरतो.
- मोबाइलसारख्या आभासी जगात जगण्यापेक्षा मुलांना वेळ देऊन त्यांना आपल्या पारंपरिक खेळ किंवा कला आवर्जून शिकवायला हव्यात.
- पतंग उडवताना एकाचवेळी डोळे, हात, पाय असे तिन्ही अवयव वापरावे लागत असल्याने मुले सिंक्रोनायजेशन अतिशय चांगल्या पद्धतीने शिकतात. त्याचा त्यांना इतरही बऱ्याच गोष्टींसाठी फायदाच होतो.