Lokmat Sakhi >Parenting > मुलांचे डोळे सतत लाल होतात? गोवरमुळे लहान मुलांच्या दृष्टीलाही धोका; डोळ्यांची अशी घ्या काळजी

मुलांचे डोळे सतत लाल होतात? गोवरमुळे लहान मुलांच्या दृष्टीलाही धोका; डोळ्यांची अशी घ्या काळजी

जगभरात गोवर झाल्याने अंधत्व आल्याच्या 30 हजार ते 50 हजार नोंदी करण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:07 PM2022-12-26T15:07:03+5:302022-12-26T15:07:55+5:30

जगभरात गोवर झाल्याने अंधत्व आल्याच्या 30 हजार ते 50 हजार नोंदी करण्यात आल्या आहेत.

Measles also threatens the eyesight of young children; Take care of your eyes | मुलांचे डोळे सतत लाल होतात? गोवरमुळे लहान मुलांच्या दृष्टीलाही धोका; डोळ्यांची अशी घ्या काळजी

मुलांचे डोळे सतत लाल होतात? गोवरमुळे लहान मुलांच्या दृष्टीलाही धोका; डोळ्यांची अशी घ्या काळजी

महाराष्ट्रात गोवरचा संसर्ग वाढत असल्याने या आजाराचा डोळ्यांवर होणारा परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे. गोवर या आजाराचे गांभीर्य समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा डोळ्यांवरही परिणाम होऊ सकतो. विकसनशील आणि विकसित जगातील मुलांना गोवरमुळे धोका निर्माण झाला आहे. जगभरात गोवर झाल्याने अंधत्व आल्याच्या 30 हजार ते 50 हजार नोंदी करण्यात आल्या आहेत.

दर वर्षी या आजाराचा कुपोषित व सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतील मुलांवर परिणाम झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे ज्या मुलांना गोवरची लस दिलेली नाही, त्यांना हा आजार होण्याची आणि त्याच्या संबंधित डोळ्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. डॉ. वंदना जैन, रिजनल हेड - क्लिनिकल सर्व्हिसेस वाशी, डॉ. अगरवाल्स नेत्र रुग्णालय  यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

गोवरमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या

गोवरचा डोळ्यांवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. त्यातील सर्वात सामान्यपणे आढळणारा प्रकार म्हणजे कंजक्टिवायटिस किंवा 'डोळे येणे'. यात डोळे लाल होतात आणि डोळ्यांतून पाणी येऊ लागते आणि गोवर झालेल्या अनेक रुग्णांवर हा परिणाम झालेला दिसून येतो. या आजारात डोळे येणे हा प्रकार लवकर उद्भवतो. त्यासोबत ताप, खोकला व इतर लक्षणे दिसतात. किंबहुना, गोवरच्या रुग्णांमध्ये पुरळ येण्याआधी डोळे येतात. त्यामुळे काही वेळा प्रत्यक्ष पुरळ दिसण्यापूर्वी डॉक्टर डोळे येण्याला गोवरचे पहिले लक्षण म्हणून पाहतात.

गोवरचा डोळ्यांवर अजून एक परिणाम होतो. जो डोळे येण्याच्या तुलनेने कमी आढळतो. त्याला केराटायटिस म्हटले जाते. यात डोळ्याच्या पुढील बाजूकडील पारदर्शक पडद्याला (कॉर्नियाला) संसर्ग होतो. केराटायटिसची लक्षणे अधिक गंभीर स्वरुपाची असतात आणि त्याचे परिणामही जास्त धोकादायक असतात. यात डोळे लाल होतात, प्रकाशाचा खूप त्रास होतो. डोळ्यांमधून पाणी येते आणि डोळ्यात कण गेल्यासारखे वाटते. डोळ्यात आयड्रॉप घालून यावर उपचार करता येऊ शकतात. पण केराटायटिसमुळे डाग पडला तर त्यामुळे दृष्टीवर कायमस्वरुपी परिणाम होतो.

गोवरमुळे कॉर्नियल अल्सरही होऊ शकतो. यात कॉर्नियामध्ये अल्सरेशन होते. अनेकदा हे अल्सर कॉर्नियावर पांढऱ्या डागांच्या रुपात दिसतात आणि विविध प्रकारच्या डोळ्यांच्या ड्रॉप्सने त्यावर उपचार केले जातात. अनेकदा हे अल्सर बरे होतात तेव्हा कॉर्नियावर व्रण राहतो आणि त्यामुळे दृष्टी कायमची कमकुवत होते.

डोळ्यांवर होणारा अजून एक धोकादायक परिणाम म्हणजे रेटिनोपथी. यात विषाणू रेटिनाला नुकसान पोहोचवतो आणि तात्पुरते अंधत्व येते. पण खूप क्वचित यामुळे कायमस्वरुपी अंधत्व येते.

ऑप्टिक न्यूरिटिस हा डोळ्यांवर गोवरमुळे होणारा अजून एक धोकादायक परिणाम आहे. यात रेटिनाकडून मेंदूकडे संदेश वाहून नेणाऱ्या नसेला सूज येते. या नसेला काही झाले तर आपण पाहू शकत नाही. ऑप्टिक न्यूरायटिसमुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. पण वेळेत निदान झाले तर योग्य औषधांनी त्यावर उपचार करता येतात आणि नस पूर्ववत करता येऊ शकते.

डोळ्यांच्या डॉक्टरची भेट कधी घ्यावी?

गोवर झालेल्या ज्या मुलाच्या डोळ्यांमध्ये समस्या असेल तर त्याने ताबडतोब नेत्रचिकित्सकाकडून तपासणी करून घ्यावी. मुलाचे डाळे लाल झाले आहेत का, किंवा त्याला प्रकाशाचा त्रास होत आहे का, याकडे विशेष लक्ष द्यावे. डोळ्यांची सखोल तपासणी करावी. कॉर्निया आणि रेटिनाचीही तपासणी करावी. त्याचप्रमाणे मुलांना त्यांच्या वयोगटानुसार बालरोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने अ जीवनसत्वाचे जोस द्यावेत.

काळजी

गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. घरात इतर मुले असतील तर पालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांना गोवर झाला आहे त्यांना शक्यतो वेगळे ठेवावे. त्याचप्रमाणे त्या मुलाला शाळेत पाठवले जाऊ नये, कारण इतरांना संसर्ग होऊ शकतो. पालकांनी डोळ्यांच्या समस्यांकडेही लक्ष द्यावे. विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यावर डोळे लाल होणे, पाणी येणे, प्रकाशाचा त्रास होणे इत्यादी लक्षणांवर लक्ष द्यावे. कारण या समस्या गोवरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. जर मुलाने यापैकी कशाचीही तक्रार केली तर पालकांनी ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरची भेट घ्यावी, जेणेकरून या समस्यांचे सखोल मूल्यमापन केले जाईल.

गोवरशी संबंधित डोळ्यांच्या समस्या

गोवरचे उपचार म्हणजे लक्षणांचे सुयोग्य व्यवस्थापन. कारण तो बरा होण्यासाठी अँटिव्हायरल किंवा औषधे नाहीत. गोवरशी संबंधित डोळ्यांच्या समस्या असतील, म्हणजे डोळे आले असतील किंवा केराटायटिस असेल तर सूज लवकर उतरविण्यासाठी मुख्यतः उपचार करण्यात येतात. रेटिनोपथी किंवा ऑप्टिक न्यूरिटिसमध्येही हीच प्रक्रिया अवलंबली जाते. डोळ्यांवर थेट उपचार करून (ड्रॉप्स किंवा तत्सम वापरून) हे आजार बरे केले जातात आणि काही प्रकरणात रेटिना व ऑप्टिक नसेची सूज कमी करण्यासाठी सिस्टेमिक उपचारांचा (रक्तावाटे पेशींवर परिणाम करणारी ओषधे) वापर करण्यात येतो.

Web Title: Measles also threatens the eyesight of young children; Take care of your eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.