Join us  

सोशल मीडियावर अल्पवयीन मुलं लैंगिक-आर्थिक शोषणाचे बळी; काय घ्याल खबरदारी? एकलकोंडेपणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 1:48 PM

पालकांनो तुमची मुले सतत सोशल मीडियावर असतील तर वेळीच सावध व्हा. त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची वेळ आली आहे हे समजून घ्यायला हवे. वेळ गेल्यावर काहीच करता येणार नाही याचे भान राखा

ठळक मुद्दे मुले लैंगिक आणि आर्थिक शोषणाची शिकार ठरू लागली आहेतअल्पवयीन मुले-मुली या आभासी विश्वात रमल्याचे चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवण्याच्या अनेक घटना समोर आल्या

अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलसारखे खेळणे पडले आहे. मोबाइलमध्ये गेम खेळण्यापुरतेच आता त्यांचे व्यसन मर्यादित राहिलेले नाही तर सोशल मीडियावर अकाउंट उघडून आपली कौटुंबिक माहिती देण्याबरोबरच गेमिंग आणि चॅटिंगच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी मैत्री वाढविण्यातून ही मुले लैंगिक आणि आर्थिक शोषणाची शिकार ठरू लागली आहेत. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाइल देताना पालकांनो सावधान! सोशल मीडिया एक मायाजाल आहे. त्याची योग्य माहिती नसेल तर कुणीही व्यक्ती त्याचा बळी ठरू शकतो. सध्या अल्पवयीन मुले-मुली या आभासी विश्वात रमल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

घरातल्या व्यक्तींशी संवाद न साधता एका खोलीत स्वत:ला बंद करून घेत मुला-मुलांनी स्वत:ला सोशल मीडियाच्या स्वाधीन केल्यासारखी स्थिती आहे. या निरागस वयात स्वत:चे चांगले-वाईट समजण्याची त्यांची क्षमता नाही. सोशल मीडियाच्या मायाजालाबद्दल ते पूर्णत: अनभिज्ञ असल्याने अनोळखी व्यक्तींच्या जाळ्यात ते सहज अडकत आहेत. गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुला-मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ही पालकांसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे.  

( Image : Google)

पालकांना हे माहित असायलाच हवे...

 

  •  सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी १३ वर्षांची किमान वयोमर्यादा आहे.
  • मात्र, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर)ने केलेल्या अभ्यास पाहणीतून दहा वर्षांच्या आतील ३७.८ टक्के मुला-मुलींची फेसबुकवर, तर २४.३ टक्के मुला-मुलींचे इन्स्ट्राग्रामवर अकाउंट आहेत.
  • १० ते १७ वर्षे वयोगटातील जवळपास ४२.९ टक्के मुला-मुलींची सोशल मीडियावर अकाउंट आहेत, ही आकडेवारी एनसीपीसीआरने प्रसिद्ध केली आहे.
  •  

पालकांनी घ्यायची काळजी

 

  • तेरा वर्षांच्या आतील मुलांच्या हातात मोबाइल देणे शक्यतो टाळावे.
  • तेरा वर्षांपुढील मुले-मुली सोशल मीडियावर सक्रिय असल्यास त्यांच्या  फ्रेंड लिस्टमध्ये पालकांना समाविष्ट करून घेण्यास सांगावे.
  • सोशल मीडियावर त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये कोण आहेत, ते कोणते फोटो टाकत आहेत. कुणाशी चॅट करीत आहेत, यावर सतत लक्ष ठेवावे.
  • प्रोफाइल शक्यतो लॉक ठेवण्यास सांगावे.
  • कुणाशीही वैयक्तिक माहिती व फोटो शेअर न करण्यास सांगावे. सोशल मीडियाच्या दुष्परिणामांची जाणीव करून द्यावी.

 

( Image : Google)

याबाबत बोलताना सायबर सेलचे पोलीस निरीक्षक दगडू सयाप्पा हाके म्हणाले, सध्या अशाप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. दिल्लीमधील एका व्यक्तीशी अल्पवयीन मुलीची गेमच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने मुलीचे न्यूड फोटो मागितले. ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तो मुलीला ब्लॅकमेल करीत होता. आरोपीचा शोध घेतल्यानंतर आरोपीला पकडण्यात यश मिळाले. अशा घटना सध्या वारंवार समोर येतात. याबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असणारी अल्पवयीन मुले चाइल्ड पॉर्नोग्राफीमध्ये अडकू शकतात. त्यामुळे अठरा वर्षांखालील मुला-मुलींना सोशल मीडिया हाताळण्यास देऊ नये. 

टॅग्स :पालकत्वसोशल मीडिया