- अझहर शेख, (वरिष्ठ उपसंपादक, लोकमत नाशिक)पाऊस आला की डोंगरदऱ्या, टेकड्या हिरव्यागार होतात. कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे सुंदर दिसतात. पाऊससरी बरसू लागल्या की अनेकांना पावसाळी पर्यटनाचे वेध लागतात अन् सहलींचे बेत आखण्यास सुरुवात होते. वाटतं की पावसात भिजावं, फिरावं हिरव्या ओल्या वातावरणात. मात्र ही सुखाची हाक अनेकदा जीवघेणी ठरते. लेकराबाळांना घेऊन पावसात फिरायला जाताना जीवावर बेतल्याच्या अनेक घटना, व्हिडीओ आजकाल आपण पाहतो. नेमकं चुकतं काय?
पावसाळी वातावरण सुखद असते; पण निसर्गाचां ऐकलंही पाहिजे. अचानक वाढणारा पाऊस, घाटमार्गात कोसळणाऱ्या दरडी, धबधब्यांसह नदी- ओहोळांना अचानक वाढणारे पाणी, दाट धुके, ढगाळ हवामान अन् वृक्षराजींमुळे कमी होणारी दृश्यमानता, निसरड्या वाटा हे सारे काही नित्याचे नसते. शहरी माणसांना तर नसतेच नसते. स्थानिक लोक, वनविभागाचे कर्मचारी, पोलिस यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणं अनेकदा घातक ठरतं. एखादा धबधबा, आहोळ, गडाजवळ जाताना स्थानिक माणसं सूचना देतात. सल्ले देतात. याहून पुढे जाऊ नका म्हणतात तेव्हा ऐकायला हवं. पावसाची स्थिती आणि तेथील ठिकाणांच्या स्थितीबद्दल त्यांना चांगली जाण असते, याचा विसर पडू देता कामा नये. आपण जेव्हा कुटुंबासोबत पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडतो, तेव्हा आपली जबाबदारी जास्त वाढलेली असते. सोबत मुलं-ज्येष्ठ नागरिक असतील तेव्हा अधिक खबरदारी घ्यायला हवी.
फोटोसेशनचा मोह, रीलचा मोह, कुठंही पाण्यात उतरण्याचा-उड्या मारण्याचा मोह टाळायला हवा. शक्यतो नदीनाले, ओहोळ, धबधब्याच्या प्रवाहाच्याजवळ जाऊ नये. सुरक्षित अंतरावर राहूनसुद्धा निसर्गाचा आनंद लुटता येऊ शकतो. वर्षा सहलीचा जरी आनंद घेत असले तरी सोबत रेनकोट, छत्री, शॉल, स्वेटर असू द्यावे. अंगात थंडी भरून लहान मुलांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो. पुरेसे खाद्यपदार्थ, पिण्याचे शुद्ध पाणी सोबत असू द्यावे. चांगल्याप्रकारचे शूज पायात असणं तर फार आवश्यक. अधिकृतपणे वन तपासणी नाक्यांवरूनच पर्यटनस्थळी प्रवेश घ्यावा, जेणेकरून आपली नोंद तेथे असते. वेळमर्यादेचे भान ठेवावे. वातावरणामुळे वेळ लक्षात येत नाही. दुपार अन् संध्याकाळ समजून येत नाही, अशावेळी अधूनमधून घड्याळ बघत रहावे.म्हंटलं तर हे साधं आहे पण इथेच अनेकजण चुकतात आणि जीवावर बेतते.
पर्यटक इथेच चुकतात..१. गड-किल्ल्यांवर जाण्याचा अट्टाहास.२. गड-किल्ले चढताना स्थानिकांच्या सूचनांकडे कानाडोळा.३. नदी-ओहोळ, धबधब्यांच्या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांच्या सूचना न पाळणे.४. प्रवेश फी वाचविण्याच्या नादात वनविभागाचे तपासणी नाके चुकवून प्रवेश करणे.५. धबधब्यांजवळ जात सेल्फीसाठी आटापिटा करणे.६. घाटमार्गात थांबून धोकादायक स्थितीत सेल्फी काढणे.७. खोलीचा अंदाज न घेता एखाद्या धबधब्यापर्यंत जाणे.८. हवामानाचा पूर्वअंदाज व माहिती जाणून न घेता बाहेर पडणे.९. मद्यपान करणं, आणि मद्यपान करत पावसात निसरड्या वाटांवर फिरणं.१०. पावसाळी पर्यटनाला जाताना वाहनाची तपासणी न करणे.११. चांगल्या दर्जाची पादत्राणे न वापरणं.
‘रील्स’बघून पर्यटनाला जाऊ नका...सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ अन् एखाद्या पर्यटनस्थळाचे ‘रील्स’ बघून पावसाळी पर्यटनासाठी त्याठिकाणी जाण्याचा मोह आवरलेला नेहमीच चांगला. रील बघून एखादा गड, गिल्ला भ्रमंतीचा ‘प्लॅन’ जीवावर बेतणाराही ठरू शकतो. रील्समध्ये पुरेशी माहिती अजिबात नसते. रीलमध्ये व्ह्रूज मिळविण्यासाठी केलेली सुंदर फोटोग्राफी, प्रत्यक्षात ती जागा धोक्याची असू शकते. रील पाहून किल्ले चढायला जाणं तर टाळलेलंच बरं.
‘टूर-ट्रेक’मधील फरक लक्षात घ्या ! -- युगंधर पवार, गिर्यारोहकपावसाळी टुरिझमला जाणे अन् ट्रेकिंगला जाणे यामध्ये खूप फरक आहे. नागरिकांनी हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक ऋतूत ट्रेकिंगची ठिकाणे वेगवेगळी असतात, हे लक्षात घ्यावे. पावसाळ्यात ट्रेकिंगचे बेत हौशी लोकांनी न आखणंच योग्य. जे गड-किल्ले उन्हाळ्यात सोपे वाटतात, ते पावसाळ्यात अवघड होऊन जातात.
पर्यटनासाठी वेळमर्यादा स्वत:ला घालून घ्यावी. सुरक्षित पर्यटनस्थळांना भेटी देत निसर्गाचा आनंद घ्यावा. कुटुंबासमवेत पर्यटनाला जाताना काटेकोरपणे पुरेशी खबरदारी घ्यावी. कोठेही विनाकारण प्रवेश करू नये. जंगल, झाडीझुडपांच्या वाटांवर जाऊ नये. नदी-नाले, ओहोळ, धबधब्यांचा प्रवाह पावसाळ्यात कधीही वाढू शकतो. यामुळे धबधब्यांपासून सुरक्षित अंतरावर थांबावे. सूर्यास्तापूर्वीच पर्यटनस्थळावरून सुरक्षितरीत्या बाहेर पडावे. आपत्कालीन घटनेची माहिती त्वरित ११२ व १०८ या क्रमांकावर कळवावी.- श्रीकृष्ण देशपांडे, नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारदरा परिसरात वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात. तरीदेखील मुसळधार पाऊस व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणाचा अंदाज बांधून स्थानिक वन कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत पर्यटन करावे. सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. तेथे जाण्याचा अट्टाहास करू नये. पावसाळ्यात परिसरातील गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाऊ नये. वनविभागाच्या वेळमर्यादा पाळावी.- दत्तात्रय पडवळे, प्रभारी सहायक वनसंरक्षक तथा वनक्षेत्रपाल