Join us  

Mother's Day 2022 : आईला नक्की काय आवडतं, हेच माहिती नाही? मग आईसाठी बेस्ट गिफ्ट कसं निवडाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2022 5:21 PM

Mother's Day 2022 : gift ideas and celebration - मदर्स डे साजरा करण्यासाठी बाजारातून गिफ्ट आणणं हा एकच पर्याय आहे का?

ठळक मुद्देसंसाराच्या आणि मुलांच्या धबडग्यात आईचा एखादा छंद मागे पडून गेला असेल तर तो पुन्हा सुरु करण्यासाठी तिला काहीतरी द्या.

मदर्स डे आहे तर आईसाठी गिफ्ट काय घ्यायचं हा एक गहन प्रश्न असतो. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे आईला नेमकं काय आवडतं ते कधीच कोणाला माहिती नसतं. बहुतेक वेळा ती जे आहे त्यात भागवणे आणि ऍडजस्ट करणे हेच करत असते. त्यामुळे तिचा चॉईस आहे तरी काय हेही ती सांगत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजारपेठ नावाची महाकाय यंत्रणा आईला गिफ्ट देण्यासाठी इतक्या वाट्टेल त्या वस्तूंच्या जाहिराती दाखवत असते, की त्यामुळे आपला फक्त गोंधळ वाढतो. आणि मग मदर्स डे ची सकाळ उजाडली तरी आपलं गिफ्ट अजून बाजारातच असतं. पण मदर्स डे साजरा करण्यासाठी बाजारातून गिफ्ट आणणं हा एकच पर्याय आहे का?

(Image : Google)

आईला छान वाटेल यासाठी आपण अजून काही वेगळं करू शकतो का?

१. सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे आईला एक पूर्ण दिवस घरकामातून सुट्टी द्या. सकाळच्या चहापासून सगळं हातात द्या, ते रात्रीचा ओटा धुवून ठेवण्यापर्यंत सगळं करा. आणि हा तुमचा प्लॅन तिला शक्यतो आधी सांगा. म्हणजे त्या दिवसभराच्या सुट्टीत काय करायचं ते ती आधी ठरवू शकेल.२. आईच्या मैत्रिणींना / भाऊ बहिणींना घरी बोलवून आईसाठी सरप्राईझ पार्टी अरेंज करा.३. आईच्या लहानपणापासूनचे किंवा लग्नापासूनचे फोटोज गोळा करून त्याचा भिंतीवर मोठा कोलाज करून लावा.४. एखादा केक किंवा आईस्क्रीम आणा, आणि त्यातला शेवटचा तुकडा आईसाठी ठेवा. ही गोष्ट बघायला फार छोटी वाटते. पण आपल्या हे लक्षात येत नाही की इतर सगळ्यांसारखाच केकचा किंवा पिझ्झाचा शेवटचा पीस आईला सुद्धा पाहिजे असतो. पण ती तसं कधीच म्हणत नाही. कायम तो इतर कोणालातरी वाढून टाकते. त्यामुळे आजचा दिवस तो तिच्यासाठी राखून ठेवा.

(Image : Google)

५. आईला तिचंच काम वाढवणारं स्वयंपाकघरातलं कुठलंही यंत्र देऊ नका! जे काही द्यायचं असेल ते तिच्या व्यक्तिगत वापरासाठीचं असेल अशी वस्तू द्या.६. संसाराच्या आणि मुलांच्या धबडग्यात आईचा एखादा छंद मागे पडून गेला असेल तर तो पुन्हा सुरु करण्यासाठी तिला काहीतरी द्या. म्हणजे पेंटिंगचं सामान आणणं, गाण्याच्या क्लासची फी भरणं अश्या गोष्टी सहज करण्यासारख्या असतात. किंवा तिची इच्छा असेल तर तिला तिचा यूट्यूब चॅनल सुरु करून द्या किंवा तिला तिचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायला मदत करा. या सगळ्याच बाबी अश्या आहेत की त्या पुढे कायम चालू राहणार आहेत. पण त्याची सुरुवात आपण मदर्स डेला नक्कीच करू शकतो.

टॅग्स :मदर्स डे