अंबिका टाकळकर (संस्थापक-संचालक आरंभ ऑटिझम सेंटर, छत्रपती संभाजी नगर)
लेकरांवर योग्यवेळी योग्य ते उपचार केले, त्यांच्यातले न्यून विसरून त्यांच्यासोबत आपण वाढले की त्यांचं आणि आपलंही जगणं आनंदादायी होतं. मुलांच्या आजारपणाच्या दु:खात न बुडता स्वत:ची प्रगतीही साधली की मुलांकडे-त्यांच्या आजाराकडेही सकारात्मकेनं पाहता येतं. आपल्या अवतीभोवतीही असा सकारात्मक बदल घडवता येतो. त्यानं आनंदी जगण्याची वाटही सापडते.
मी नांदेडमधल्या भोकर गावची. दहावी झाल्यानंतर अकरावीसाठी नांदेड शहरात जाणारी पहिलीच मुलगी. पुढे संगणकाचा एक कोर्स केला आणि लगेच ठाणे शहरातील एका लहानशा कंपनीत प्रोग्रामर म्हणून नोकरी लागली. वर्षभरात लग्न झालं. अगदी आनंदाचे दिवस होते. पती नेव्हीमध्ये होते. ठाण्यात राजाराणीचा संसार सुरू होता. त्यातच बाळाची चाहूल लागली. मुलगा झाला. बाळाचे नाव श्रीहरी ठेवले. सहा महिन्यानंतर माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण बाळाची प्रगती मला खूपच हळू वाटली. मात्र शेजारचे, घरचे यांनी माझी समजूत घातली की एखाद्या बाळाची प्रगती असते हळूहळू. मग मीही वाट पाहायची ठरवली. मात्र नऊ महिने झाले तरी बाळ बसतही नाही म्हटल्यावर मी श्रीहरीच्या बाबांना ही बाब सांगितली. आम्ही कुलाबा इथल्या नेव्हीच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथल्या डॉक्टरांनी चाचण्यांची यादीच हातात दिली. सीटी स्कॅन, एमआरआय आणि इतरही अनेक चाचण्यांचा त्यात समावेश होता. त्या करून आम्ही डॉक्टरांची भेट घेतली असता त्यांनी बाळाला ‘ऑटिझम’ असू शकतो, अशी शंका व्यक्त करून त्याची प्रगती हळूहळू होईल, असं सांगितलं. तोपर्यंत हा शब्दही कानावर पडलेला नव्हता.
त्या डॉक्टरांनी खूप धीर दिला. शिवाय त्या आजाराची सगळी माहिती सांगून त्याला कोणते उपाय लागू पडतील, हेही सविस्तरपणे सांगितलं. डॉक्टरांच्या बाबतीत आम्ही खूप सुदैवी होतो. मी मात्र खचूनच गेले होते. त्यातच नातेवाईक, ओळखीचे यांचे वेगवेगळे सल्ले. कुणी देव-देवस्कीचे उपाय सांगे तर कुणी वेगवेगळे औषधोपचार. खरं तर अश्विनी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता म्हणजे काय ते व्यवस्थित सांगितलं होतं.
स्वमग्नता म्हणजे मतिमंदत्व नव्हे. या मुलांचा आयक्यू (इंटेलिजंट कोशंट) हा चांगला असतो. ते काही मतिमंद नसतात. हायपर अॅक्टिव्ह असतात आणि त्यांच्या-त्यांच्यातच मग्न असतात. त्यातून निर्माण होणारे काही दोष त्यांच्यात येतात. उदाहरणार्थ, त्यांची सगळी प्रगती उशिराने होत असते, संवेदनांच्या बाबतीत समस्या असतात. सगळ्यात मोठा परिणाम अनेकदा त्यांच्या बोलण्यावर होतो. मुलं बोलत नाहीत. त्यांना बदल आवडत नाहीत.
नेव्हीच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की श्रीला फिजिओथेरपी, स्पीचथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीने बराच फरक पडेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्री वर्षांचा झाल्यावर बसायला लागला. मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की, तो सामान्य असला तरी त्याला विशेष मुलांच्या शाळेत घाला ते अधिक परिणामकारक ठरेल.
नेव्हीची कुलाब्याला विशेष मुलांसाठीची ‘संकल्प’ नावाची शाळा आहे. तिथे आम्ही श्रीला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर मी आणखीच हादरून गेले. कारण तिथे वेगवेगळ्या कॅटेगरीतील ४० वर्षांपर्यंतचे विद्यार्थी शाळेत होते. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा भट यांनी आम्हाला समजावले. (त्या स्वत: ऑक्युपेशनल थेरपिस्ट होत्या. पुढे त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.) त्यांनी श्रीला शाळेत प्रवेशही दिला. पहिले सहा महिने श्री शाळेत जाताना खूप रडायचा. कारण त्याला मला सोडून राहायची सवयच नव्हती. मात्र हळूहळू तो स्थिरावला. तोपर्यंत श्रीच्या बाबांचीही बदली ठाण्याहून कुलाब्याला झाली. तो शाळेत जायला लागल्यावर मला मोकळा वेळ मिळायला लागला. कारण त्याच्या जन्मानंतर मी नोकरी सोडली होती. आपल्याच वाटय़ाला असं का असे प्रश्न सतत पडायला लागले. वीणा भट मॅडमशी सतत त्याच्या प्रगतीविषयी चर्चा व्हायची. त्यांनी माझी स्थिती ओळखली होती. त्या म्हणाल्या, ‘‘तू शिकलेली आहेस, तुझ्याकडे वेळ आहे तर इथे शाळेत का येत नाहीस. मदत तर होईलच शिवाय तुलाही शिकायला मिळेल.’’ मी त्यांचं बोलणं मनावर घ्यायला पुढचं शैक्षणिक वर्ष उजाडलं. तिथे मी तीन वर्ष काम केलं. त्या काळात मात्र इतर पालकांची, मुलांची स्थिती पाहिली आणि मला माझे दु:ख शीतल भासू लागले. त्या तीन वर्षांच्या काळात मी श्री आणि त्याच्या आजाराला पूर्णत: स्वीकारलं.
भट मॅडमनी मला विशेष मुलांसाठीचे बी.एड. करावे हेही सुचवले. शिवाय मी दुसऱ्या मुलाचा विचार करावा, हेही सांगितलं. त्यामागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सगळं सुरळीत सुरू आहे, असं वाटत असतानाच श्रीच्या बाबांची विशाखापट्टणमला बदली झाली. तिथल्या शाळेत श्रीला घातलं आणि रुटिन सुरू करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यानच्या काळात बी.एड.साठी मला हैदराबादचे कॉलेज मिळाले आणि श्रीच्या बाबांची पुन्हा मुंबईला बदली झाली. या काळात माझ्या आईची मला खूप मदत झाली. ती माझ्यासाठी हैदराबादला येऊन राहिली. याच काळात दुसऱ्या बाळाची चाहूल लागली होती. बी.एड. दुसऱ्या वर्षी सहा महिन्यांच्या निधेयला, श्रीला घेऊन आणि आईच्या मदतीने मी पेपर, प्रक्टिकल अशी कसरत पूर्ण केली. माझं शिक्षण झालं, मात्र सततच्या बदल्यांमुळे श्री मात्र चिडचिडा झाला होता. मग त्याच्या बाबांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आणि आम्ही औरंगाबादला स्थिरावलो. तिथे मात्र ‘ऑटिझम’च्या मुलांसाठी काहीच सुविधा नव्हत्या. श्रीच्या प्रगतीत पुन्हा खीळ बसते की काय अशी भीती निर्माण झाली. तिथे मला त्याच्यासारखी आणखी काही मुलं असल्याचं आढळलं, मग त्यांच्या पालकांच्या आग्रहाखातर २०११ मध्ये ‘आरंभ ऑटिझम सेंटर’ सुरू केलं. त्यात श्रीबरोबरच इतर मुलांनाही वेगवेगळ्या थेपरीसह शिकवण्यास ‘आरंभ’ केला. आज आरंभमध्ये ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आज श्रीला बाहेर कुठेही घेऊन जाताना त्रास होत नाही. त्याच्या स्वत:च्या सगळ्या गोष्टींसाठी तो स्वावलंबी आहे. शिवाय शाळेतही तो एक उत्तम मदतनीस असतो. घरीही तो मला भाज्या चिरून ठेवणे, निवडून ठेवणे इतर कामांमध्ये मदत करतो. त्याचे हायपर अॅक्टिव्ह असणे खूपच कमी झाले आहे. निधेय आणि त्याचे नाते इतर भावांचे असते तसेच आहे. निधेय आता सातवीत आहे. लहानमोठय़ा खोडय़ा चालूच असतात दोघांमध्ये. मात्र निधेय त्याची आणि श्री निधेयची काळजी घेत असतात. त्याच्या बाबांनी मला सगळ्या बाबतीत मोकळीक दिली, सहकार्य केले. मात्र मुळात नेव्हीतल्या नोकरीमुळे आणि आता अहमदनगर इथे नोकरीला असल्यामुळे त्यांचा सहवास मात्र कमीच मिळतो. जेवढा मिळतो तो मात्र क्वॉलिटी टाईम असतो.