Join us  

आधी बारावी मग केलं स्पेशल बीएड; स्वत: शिकून आईने विशेष मुलांसाठी सुरु केली शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2024 6:15 AM

Mother's day 2024 Special : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये विशेष मुलांसाठी शाळा सुरु करणाऱ्या सुनीता महालेंच्या अफाट कष्टांची यशोगाथा.

ठळक मुद्देआईपणाचा हा प्रवास आव्हानांचा अन संघर्षाचा असला तरी खूप आनंद देणारा, समाधान देणारा आहे.

सुनीता महालेसंस्थापक - संचालक, 'निगराणी विशेष मुलांची प्रशाला' -मनमाड-जि. नाशिक(शब्दांकन : माधुरी पेठकर)

२२ वर्षांच्या विपीनने नुकताच आपला मतदानाचा अधिकार पहिल्यांदा बजावला. त्यामुळे तो खूप खूश आहे. तो जेव्हा हार्मोनियम वाजवण्यात गुंग असतो, पणत्या रंगवण्यात हरवून जातो तेव्हा त्याला पाहून मला खूप समाधान वाटतं. वाटतं हा क्षण पाहण्यासाठीच तर आपण एवढा अट्टाहास केला होता. लग्नानंतर दोन वर्षांनी विपीन झाला. घरात आनंदी आनंद होता. बाळाचे लाड- कौतुक होत होते. पण विपीनची वाढ फारच हळू होतेय असं आम्हाला वाटायला लागलं. त्याचं पालथ पडणं, चालणं, बोलणं सर्वच बाबतीत इतर मुलांच्या तुलनेत विपीन फारच हळू होता. घरातले म्हणायचे काही बाळांची वाढ होते हळू. पण हे नाॅर्मल नाहीये असं वाटल्यावर आम्ही डाॅक्टरांकडे गेलो. तपासण्याअंती विपीन मतिमंद असल्याचं कळलं. पूजा-अर्चा, बाबा बुवा, अंगारे-धुपारे हे सर्व करुन झाले. एका टप्प्यानंतर आता हे सर्व थांबवायचं ठरवलं. आपल्या मुलासाठी आता आपल्याला स्वत:ला प्रयत्न करण्याशिवाय, कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही हे समजलं आणि त्यादिवसापासून मी माझ्या विपीनसाठी मला शक्य ते सर्व प्रयत्न करायला उभी राहिले.

घर खटल्याचं. एकत्र कुटुंबपध्दती. त्यामुळे घरातला कामांचा पसारा खूप, जबाबदाऱ्या फार. यातून विपीनसाठी स्वतंत्र वेळ काढणं अवघड होतं. पण मी ठरवून दुपारी २ ते ५ असा वेळ काढू लागले. त्या वेळेत बिपीनला घेवून बसायचे. जेवढं शक्य आहे तेवढं शिकवायचे. त्याला शाळेतही घातलं होतं. पण शाळेत तो फक्त जायचा आणि यायचा. शाळेत घडत काहीच नव्हतं. तो मुलांमध्ये मिसळत नव्हता. शिक्षकांचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. वर्ग सुरु असायचा आणि विपीन बाहेर माती खेळत असायचा. हे पाहून माझा जीव तुटायचा. काय करु आणि काय नको असं होवून जायचं मला. मग आम्ही विपीनला नाशिकच्या प्रबोधिनी विद्यालयात टाकलं. पण तिथेही विपीन रमत नव्हता. आणि त्याला माझ्यापासून दूर ठेवणं मला मान्य नव्हतं. 

नाशिकच्या डाॅ. उमा बच्छाव यांच्या माइल्डस्टोन चाइल्ड डेव्हलपमेण्ट क्लिनिकमध्ये विपीनचे उपचार सुरु झाले. त्यांच्या सेंटरमध्ये थेरेपीसाठी विपीनला आठवड्यातून तीनदा आणावं लागायचं. मी कधीच एकटीने प्रवास केला नव्हता. पण विपीनसाठी तो सुरु झाला. मनमाड ते नाशिक असा प्रवास सुरु झाला. एक दोन वर्षांतच विपीनमध्ये खूप सुधारणा दिसू लागली. त्याचे हात वळू लागले. त्याला लिहिता यायला लागलं. वाचता यायला लागलं. सेंटरमध्ये शिकवल्यानंतर घरी काय करुन घ्यायचं हे डाॅक्टर सांगायचे. डाॅक्टरांनी सांगितलेलं जसंच्या तसं मी घरी करुन घ्यायचे. विपीनसाठी तेव्हा मी जे काही करत होते ते सर्व मनापासून आणि आनंदाने. हे करताना माझी ना कधी चिडचिड झाली ना कधी मला वैताग आला.

मग लक्षात आलं की आमच्या गावात आजूबाजूला विपीनसारखीच दोन तीन मुलं होती. मी विपीनला शिकवायला बसायचे तेव्हा त्या मुलांनाही बरोबर घेवून बसायचे. विपीनसोबत या मुलांमध्येही प्रगती व्हायला लागली. त्यांच्यात बदल दिसू लागले. त्यांचे आईवडील माझ्याकडे 'हे कसं?' म्हणत विचारणा करु लागले. या विशेष मुलांना कसं शिकवायचं याचा जराही गंध मला नव्हता. मी फक्त डाॅ. उमा बच्छाव जे सांगायच्या ते करुन घ्यायचे. पण मुलांमध्ये त्याचा चांगला परिणाम दिसू लागला. माझ्याकडे येणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली. तेव्हा या मुलांना शिकवण्याची योग्य पध्दत शिकून घ्यायला हवी असं मला तीव्रतेने वाटायला लागलं. मी स्पेशल डी. एड. करायचं ठरवलं. पण माझं शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झालं होतं. स्पेशल डी.एड. ला प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. मग काय घर, विपीन, मुलांना शिकवणं यासोबत बारावीचा अभ्यास सुरु झाला. दोन प्रयत्नात बारावी उत्तीर्ण झाले.  मग स्पेशल डी.एडला प्रवेश घेतला. तेव्हा

मी ३८ वर्षांची होते. बाकीची मुलं बारावी पास झालेली. मला कसंतरीच व्हायचं पण शिकायचं होतं ना! डाॅक्टर्स, तज्ज्ञ यायचे ते सर्व इंग्रजीमध्ये शिकवायचे, बोलायचे, माझं तर सर्व डोक्यावरुन जायचं. ते जे इंग्लीश बोलत होते ते मी मराठीत लिहून मग त्याचा अभ्यास करायचे, इतर मुलांकडून समजून घ्यायचे. स्पेशल डी.एड.ची परीक्षा फर्स्ट क्लास उत्तीर्ण झाले आणि माझा काम करण्याचा उत्साह वाढला.मनमाडच्या नगरपालिकेने १ एकर जमीन दिली. त्यावर ६ वर्गखोल्या बांधून दिल्या आणि मनमाडमध्ये 'निगराणी विशेष मुलांची प्रशाला' सुरु झाली. आज या प्रशालेत ३० गतिमंद मुलं आहेत. या मुलांना दैनंदिन जीवनातल्या प्राथमिक, मूलभूत गोष्टी शिकवणं, त्यांना लिहायला वाचायला शिकवणं, गणिताची कौशल्यं शिकवणं, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणं हे सर्व प्रशालेत सुरु आहे. हे करण्यामागे प्रसिध्दी, पुरस्कार यांची हाव नाही तर मुलांबद्दलची कळकळ आहे. ही मुलं पायावर उभी राहायला हवी, आत्मविश्वासाने स्वतंत्रपणे वावरायला हवी, स्वावलंबी व्हायला हवी ही माझी मनापासूनची इच्छा आहे. इतरांसाठी उभं राहायचं शहाणपण मला विपीनसाठी प्रयत्न करताना आलं.विपीनमुळेच मी पहिल्यांदा घराबाहेर पडले, एकटीने प्रवास करु लागले. विपीनमुळे मला जग बघता आलं, खूप चांगली माणसं भेटली, खूप शिकता आलं. हे सर्व करण्याची तळमळ माझ्यात विपीनमुळे आली. विपीनला मी जसा आहे तसा आनंदाने स्वीकारला. कारण आईने आपल्या मुलांना स्वीकारलं तर जगही स्वीकारतं हे मला माहित होतं. मी जर हिंमत हरले असते, माझ्याच वाट्याला का म्हणत रडत, कण्हत-कुथत बसले असते तर विपीन घडलाच नसता.

चूल अन मूल एवढंच जग होतं माझं. पण जग किती मोठं असतं, या जगात किती प्रश्न आव्हानं असतात, या आव्हानांवर मात करणारे किती मार्ग असतात हे सर्व मी माझ्या मुलामुळे पाहू शकले, अनुभवू शकले. मी माझ्या बिपीनला घडवतेय आणि बिपीनमुळे मी स्वत:ही घडतेय. आईपणाचा हा प्रवास आव्हानांचा अन संघर्षाचा असला तरी खूप आनंद देणारा, समाधान देणारा आहे.

टॅग्स :पालकत्वदिव्यांगआरोग्यप्रेरणादायक गोष्टीशिक्षण