मागच्या पिढीतल्या भारतीय स्त्रिया ज्या वयात आजी होत होत्या, त्या वयात ती चक्क आई झाली आहे. ती आहे ब्रिटीश सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेल. नाओमीचा स्ट्रगल, तिचं खाजगी आयुष्य, तिने केलेले बोल्ड फोटोशूट, तिने केलेले स्टेटमेंट्स आणि तिचे अफेअर हे सगळेच विषय नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मॉडेल म्हणून नाओमी सुपरहिट असून तिच्याबाबत कायमच तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सूकता असते. सोशल मिडियाच्या माध्यमातून नाओमी नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मे महिन्यात अशीच एक पोस्ट नाओमीने शेअर केली आणि तिच्या चाहत्यांना धक्काच बसला.
नाओमीने यावर्षी मे महिन्यात एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये तिच्या हातात एका बाळाची इवली- इवली पाऊले होती. हा फोटो टाकून नाओमीने लिहिले होते की एका अतिशय सुंदर छोट्याशा बाळाने आई म्हणून माझी निवड केली आहे. माझ्या आयुष्यात हा छोटासा जीव येणे ही खरोखरच माझ्यासाठी एक सन्माननीय गोष्ट आहे. मी आणि माझी ही छोटीशी परी आमच्यामध्ये असणारा हा लाईफबॉण्ड वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. यापेक्षा दुसरे मोठे प्रेम कोणतेच नाही.. अशी पोस्ट टाकून नाओमीने ती आई झाली असल्याचा आनंद व्यक्त केला होता. त्या फोटोवर कमेंट करत सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी नाओमीला शुभेच्छा दिल्या होत्या. ती चक्क ५१व्या वर्षी आई झाली आहे, हीच मुळी अनेकांसाठी आश्चर्यजनक बाब होती.
मातृत्व ही खरोखरच प्रत्येक स्त्रीसाठी एक कसोटी किंवा खडतर परीक्षा असते. आई म्हणून स्वत:मध्ये अनेक बदल करावे लागतात. खूप संयम ठेवावा लागतो आणि प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामाेरे जावे लागते. त्यामुळे आपल्याकडे जर एखाद्या महिलेने तिशी ओलांडली आणि तरीही ती बाळाचा विचार करत नसेल, तर तिच्या आजूबाजूच्या मोठ्या बायका स्वत:हूनच तिला समजविण्याचा विडा उचलतात. योग्य वयात आई झालेलं कधीही चांगलं. एकदा वय वाढू लागलं की मग आई होणं शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळीवर कठीण होतं, असं आपल्याकडे नेहमीच म्हंटलं जातं.म्हणूनच तर नाओमीचं या वयात आई होणं, तिच्या चाहत्यांच्या लवकर पचनी पडलं नाही.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नाओमीला नेमकं या बाबतच विचारण्यात आलं होतं. मातृत्व हीच मुळी महिलांसाठी आव्हानात्मक बाब आहे. मग आता वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर तिचा आई होण्याचा अनुभव कसा आहे, असा प्रश्न विचारताच नाओमीने अतिशय संयमाने आणि खूपच शांतपणे या प्रश्नाचे उत्तर दिले. ती म्हणाली आई होण्याचा अनुभव हा खरोखरच माझ्यासाठी अतिशय आनंददायी बाब आहे. त्यामुळेच तर मला वाटते की माझे बाळ हे खरोखरंच एक dream child आहे. माझी मुलगी अतिशय समजूतदार आणि आतापासूनच खूप इंडिपेंडंट आहे, असेही नाओमीने सांगितलं आहे. माझी मुलगीही माझ्याप्रमाणेच एक कणखर स्त्री व्हावी, अशी अपेक्षाही नाओमीने तिच्या मुलीकडून व्यक्त केली आहे.
नाओमीचे ५१ व्या वर्षी आई होणे, हे खूप जणांसाठी आश्चर्यकारक आहे. एक- दोन वर्षांपुर्वी झालेल्या मुलाखतीत नाओमीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर यावर्षी मे महिन्यात तिने आई झाल्याची बातमी दिली. नाओमी विवाहित आहे की अविवाहित तिचे बाळ आयव्हीएफ पद्धतीने झाले आहे की नैसर्गिक पद्धतीने याबाबत कोणताही खुलासा नाही. तिचे बाळ तिने दत्तक तर घेतले नसावे ना, अशी चर्चाही केली जाते.