'तुम्ही जगातले सर्वात वाईट मम्मी पपा आहात!' 'तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का?' ' तुम्ही एकमेकांशी इतके का भांडता?' 'तुम्हाला माझं काही पडलेलंच नाही!' ही वाक्यं आहेत आठवीत जाणाऱ्या सियाची. ती आई-बाबांमधल्या सततच्या भांडणामुळे वैतागली आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे सतत वाद होणे, छोट्या वादाचं रुपांतर मोठ्या भांडणात होणे, शिवीगाळ, मारहाण,वस्तूंची तोडफोड हे सगळं सियासमोर सतत होत असतं. हल्ली तर सियाला शाळेत जायला, बाहेर खेळायला जायलाही भीती वाटते. आपण शाळेत गेल्यावर या दोघांमध्ये भांडण झालं तर ते कोण सोडवणार? अशी चिंता सियाला वाटते.मनसोक्त खेळणं, बागडणं, मन लावून अभ्यास करणं या गोष्टी करायच्या सोडून सियाला आई बाबांच्या भांडणाचा विचार करावा लागतो. आई बाबांना आपल्या भांडणाचा सियावर परिणाम होतोय असं जाणवतं पण आपल्यातली भांडणं मिटवण्यासाठी आपण काही करायला हवं यासाठीचा कोणताच मार्ग त्यांना दिसत नाहीये.कोणत्याही नात्यात प्रेम, आपुलकी, विश्वास यासोबतच वाद, मतभेद, भांडण या गोष्टीही तितक्याच स्वाभाविक आहेत. याला नवरा बायकोचं नातंही अपवाद नाही. वाद होणं, वाद शांततेत मिटणं, सर्व काही सुरळीत होणं हे जेव्हा होतं तेव्हा मुलंही याकडे बघत असतात. अशा वादातून मुलं समस्या निवारणाचे कौशल्य शिकतात. त्याचा उपयोग त्यांना भविष्यात होणार असतो. पण सतत वाद, मोठी भांडणं, हिंसा, अपशब्दांचा वापर या गोष्टी नवरा बायकोत होत असतील तर हे पाहणाऱ्या मुलांवर त्याचे वाईट परिणाम झाल्याशिवाय राहात नाही.
(Image :google)
आई-बाबांच्या भांडणाचा मुलांवर काय परिणाम होतो?
१. आई बाबांमधे कधीतरी होणाऱ्या किरकोळ भांडणांचा परिणाम मुलांवर होत नाही. मात्र ही भांडणं मुलांसाठी तेव्हा त्रासदायक होतात जेव्हा ती सतत होतात. भांडणाची तीव्रता जास्त असते. त्यात अपशब्द आणि मारहाण असते. अशा भांडणांमुळे मुलांमधे भीती, राग, दु:ख या नकारात्मक भावना निर्माण होतात.२. मुलांमध्ये भावनिक वर्तणूक समस्या, झोपेचे तंत्र बिघडणं, समस्या सोडवता न येणं, कोणाशी मैत्री करता न येणं, अभ्यासात लक्ष न लागणं, शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होणं, शारीरिक आरोग्य बिघडणं, वरचेवर आजारी पडणं या समस्या निर्माण होतात.३. नवरा बायकोमधल्या भांडणांचा मुलांवर होणारा तीव्र परिणाम म्हणजे मुलांना असुरक्षित वाटायला लागतं, असाहय्य वाटायला लागतं, त्यांना त्यांच्या स्वत:च्या , आपल्या पालकांच्या सुरक्षिततेबाबत काळजी वाटू लागते.४. पुढे जावून आई बाबांमधल्या भांडणाला आपणच जबाबदार आहोत असं मुलांना वाटू लागतं. त्यातून अपराधभाव, न्यूनगंड निर्माण होतो. बाहेर चारचौघात वावरण्याचा आत्मविश्वास कमी होतो.
आईबाबा भांडण आवरा कारण..https://urjaa.online/why-parents-fight-with-each-other-are-parents-kknow-about-an-impacts-of-parental-conflict-on-children/