Lokmat Sakhi >Parenting > चांगली आई होणं म्हणजे नक्की काय असतं? नेहा धुपिया सांगते, आईच्या मनातला गिल्ट..

चांगली आई होणं म्हणजे नक्की काय असतं? नेहा धुपिया सांगते, आईच्या मनातला गिल्ट..

आईची भूमिका पार पाडतांना स्त्रियांना अनेक आव्हानांना (challenges of motherhood) सामोरं जावं लागतं. ही आव्हानं काय असतात, त्यांना कसं तोंड द्यायचं याबद्दल दोन मुलांची आई असलेली अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) जे सांगते ते महत्त्वाचं आहे.. काय म्हणते नेहा धुपिया?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 06:00 PM2022-09-02T18:00:51+5:302022-09-02T18:13:48+5:30

आईची भूमिका पार पाडतांना स्त्रियांना अनेक आव्हानांना (challenges of motherhood) सामोरं जावं लागतं. ही आव्हानं काय असतात, त्यांना कसं तोंड द्यायचं याबद्दल दोन मुलांची आई असलेली अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) जे सांगते ते महत्त्वाचं आहे.. काय म्हणते नेहा धुपिया?

Neha Dhupia teach lesson to become good mother | चांगली आई होणं म्हणजे नक्की काय असतं? नेहा धुपिया सांगते, आईच्या मनातला गिल्ट..

चांगली आई होणं म्हणजे नक्की काय असतं? नेहा धुपिया सांगते, आईच्या मनातला गिल्ट..

Highlightsप्रसूतीनंतर शारीरिक आणि मानसिक पातळीवर झालेल्या बदलांना स्वीकारलं तरच आईपणाच्या भूमिकेशी एकरुप होता येतं.पालकत्वाची भूमिका पार पाडताना आपल्या जबाबदाऱ्यांसोबतच स्त्रियांना आपल्या मर्यादाही माहीती असायला हव्यात. आई झालेल्या स्त्रीनं आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:बद्दल मृदू भाव जपणं आवश्यक आहे. 

गरोदरपणाच्या अवस्थेबद्दल जितकं बोललं जातं तितकं प्रसूतीनंतरच्या (postpartum)  अवस्थेबद्दल बोललं जात नाही. त्यामुळे या टप्प्यातली आई झालेल्या स्त्रीच्या मनातली अस्वस्थता बाहेर पडत नाही. हाच तो नाजूक टप्पा असतो जिथे प्रसूतीनंतरच्या नैराश्याला (postpartum depression)  सामोरं जावं लागतं. पण हे का होतं? याचं उत्तर दोन मुलांची आई असलेली अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia)  देते. तिच्या मते प्रसूतीनंतरच्या अवस्थेबद्दल आई झालेल्या स्त्रियांनी व्यक्त होणं आवश्यक असतं, याविषयी बोललं जाणं गरजेचं असल्याचं नेहा सांगते. पोस्टपार्टम अर्थात प्रसूतीनंतरच्या अवस्थेबद्दल बोललं गेल्यास या टप्प्यात होणार मानसिक त्रास कमी होतो. 

Image: Google

नेहा म्हणते की, बाळांतपणानंतर स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक पातळीवर खूप बदल झालेले असतात. या बदलांना तिनं स्वत: स्वीकारणं महत्वाचं आहे. शरीरावर पडलेले स्ट्रेच मार्क्स स्वीकारणं गरजेचं आहे. आई झाल्यानंतर आपल्यात जो बदल झाला आहे तो जर आनंदानं स्वीकारला तर आईपणाच्या भावनेशी आणि भूमिकेशी स्त्रीला एकरुप होता येतं. 
लोकं काय म्हणताय, काय टीका टिप्पण्या करताय याकडे दुर्लक्ष करावं. बाळंतपणानंतर किती सुटलीस, किती जाडी झालीस या लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. खरंतर आई होताना दिसणाऱ्या बदलांपेक्षाही न दिसणारे बदल झालेले असतात. त्या बदलांना स्वीकारणं , समजून घेणं हे या टप्प्यात महत्त्वाचं असतं. आई झालेल्या स्त्रीनं शरीरात झालेल्या बदलांनी निराश होण्यापेक्षा शरीर पूर्ववत होण्यास संयमानं वेळ द्यायला हवा. बाळंतपणानंतर विशिष्ट कालावधीपर्यंत आराम केल्यानंतर स्त्रीनं लवकरात लवकर आपल्या कामाकडे वळणं आवश्यक असतं. त्यामुळे नैराश्याचे विचार कमी होतात. बाळ झाल्यानंतर स्त्री आई होते पण पालक होण्यासाठी तिनं जास्तीत जास्त या भूमिकेविषयी शिकणं, जाणकारांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं. पालकत्व ही भूमिकाही आहे आणि कलाही. मुलांसोबतचं आपलं नातं घट्ट होण्यासाठी ,एक पालक म्हणून स्वत:ला समाधान मिळणं या दोन्ही गोष्टी यात महत्वाच्या असतात असं नेहा म्हणते.

Image: Google

आईच्या मनातला अपराधभाव

पालकत्वाबद्दल स्वत:चे अनुभव सांगताना नेहा आईच्या मनातल्या अपराधी भावाबद्दलही बोलली आहे.  ती म्हणते माझी मुलं रात्री साडे आठला झोपली की आम्हा नवरा बायकोला बाहेर लेट नाइट डिनरला जाण्याची इच्छा होते. पण तेव्हा लगेच मनात येतं की रात्री उशीरा परतलं तर झोपणार उशिरा. मग मुलं उठतात त्यावेळी जाग कशी येणार? आणि असं झालं नाही तर मात्र आई म्हणून आपण कमी पडलो असं वाटत राहातं. हा अपराधीभाव आई झालेल्या प्रत्येक स्रीला छळतो.

आईच्या मनातल्या या अपराध भावनेवर अभ्यासही झालेला आहे. मानसशास्त्रज्ज्ञ कामना छिब्बर म्हणतात की रोजची कामं, मुलांप्रतीच्या आपल्या जबाबदाऱ्या यात समतोल साधणं हे स्त्रीपुढचं मोठं आव्हान असतं. हे आव्हान पेलताना काही कामात कमी पडलो, मुलांना पुरेसा वेळ देता आला नाही तर आईच्या मनात अपराधभाव निर्माण होतो. याबद्दल 143 महिलांवर झालेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की जर स्त्रियांनी याबाबत स्वत:विषयी करुणाभाव ठेवला तर त्या पालकत्वाच्या भूमिकेतल्या अपराध गंडातून मुक्त होवू शकतात. जर याबाबत स्वत:ला दोषी ठरवलं तर पालक म्हणून आईच्या मनात समाधानाची भावना  निर्माण होणं अवघड होतं. 

Image: Google

'गिल्ट'मधून बाहेर पडण्यासाठी..

पालकत्वाची भूमिका निभावताना आईच्या मनात निर्माण होणाऱ्या अपराध भावनेतून बाहेर पडता येतं. त्यासाठी कामना छिब्बर यांनी काही सोपे मार्ग सांगितले आहेत. 

1. मुलांसोबतची आपली दिनचर्या ठरवून घ्यावी. त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा. 

2. आपण ठरवलेल्या दिनचर्येत कधी अचानक बदल करावे लागतात, लागतील या गोष्टीबाबत जागरुक राहायला हवं. समजा आज मुलांना वेळ देता आला नाही म्हणून निराश होण्यापेक्षा आज नाही देता आला वेळ पण उद्या तर आपण त्यांच्यासोबत असणारच आहोत असा विचार करणं गरजेचं आहे. 

3. मुलं लहान असली तरी आई काय सांगतेय हे समजून घेऊ शकतात. त्यामुळे कधी मुलांना वेळ देता आला नाही, एखादी गोष्ट त्यांच्यासाठी करणं जमलं नाही म्हणून निराश होण्यपेक्षा त्यांच्याशी बोलावं. आपण अमूक एका कारणामुळे उपलब्ध असणार नाही किंवा अमूक एखादी जबाबदारी पार पाडू शकणार नाही हे जर मुलांशी बोललं गेलं तर मुलं नाराज होत नाही आणि आईच्या मनातही आपण कमी पडलो असा अपराधभाव निर्माण होत नाही. 

4. मुलांना सांभाळतांना आपल्याला मदत करणारी यंत्रणा ( सपोर्ट सिस्टीम) तयार करणं, बळकट करणं गरजेचं असतं. म्हणजे मुलांसाठी एखादी गोष्ट करणं आईला जमलं नाही तरी ती गोष्ट घरातले इतरजण निभावून नेऊ शकतात. 

5. मुलांना वेळ देताना आपण आपल्या कामाबद्दलच्या मर्यादाही निश्चित करायला हव्यात. कामं जर निष्कारण मुलांसाठीच्या वेळेत येत असतील तर त्यांना नाही म्हणणं स्त्रियांना जमायला हवं. 

6. आईची भूमिका निभावताना, पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत: बद्दल स्रियांनी मृदू भाव ठेवायला हवा. समजा नाही जमली एखादी गोष्ट करायला तर ते मनाला लावून न घेणं जमायला हवं. 


 

Web Title: Neha Dhupia teach lesson to become good mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.