रती भोसेकर (सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभाग, मुख्याध्यापिका)
सकाळीच सकाळी शाळेत फोन आला. फोन करणारी व्यक्ती लांब रहाणारी होती. आमच्या शाळेत म्हणजेच सरस्वती मंदिर ट्रस्ट, पूर्व प्राथमिक विभाग ठाणे येथे आयोजित केल्या जाणाऱ्या सजगता कार्यक्रमाची त्या चौकशी करत होत्या. “ताई, तुमचा सजगता कार्यक्रमाच्या जाहिरातीचा व्हिडीओ बघितला. त्यातले खेळ तर आपण नेहमी वापरतो तेच होते असं वाटलं. मी लांबून यायचे ठरवत होते. पण तेच खेळ असतील तर मग एव्हढ्या लांब येण्याचे ठरवायचे का, असा विचार मनात आला म्हणून फोन केला.”
बाई प्रामाणिक होत्या आणि त्यांचे म्हणणेही बरोबर होते. जर नेहमीचेच शैक्षणिक खेळ पहायचे असतील तर कशाला एव्हढ्या लांबून यायचे? अशी काय वेगळी मांडणी करणार आहोत बरं आम्ही? त्याविषयीचा हा संवाद.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पायाभूत टप्प्यातील मुलांच्या म्हणजेच वयोगट ३ ते ८ वर्षे वयाच्या मुलांच्या शिक्षणाचा विशेष विचार केला आहे. त्यात या वयोगटातील मुलांचा सर्वांगिण विकास समग्रपणे साध्य करणे हे महत्त्वाचे मानले आहे. तसेच या मुलांच्या पुढील शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांच्या पायाभूत भाषा साक्षरता व संख्याज्ञानावर भर दिला पाहिजे असे हे धोरण सांगते. यासाठी भारत सरकारच्या शिक्षण विभागातर्फे निपुण भारत अभियान, वर्ष २०२१ मध्ये सुरु करण्यात आले.
या अभियानाव्दारे २०२६-२७ पर्यंत तिसरीपर्यंतच्या सर्व मुलांच्या पायाभूत भाषा साक्षरता व संख्याज्ञान घटकांवर काम करणे अपेक्षित आहे.
निपुण भारत अभियानाची तीन विकासात्मक ध्येये ठरवली आहेत. ती अशी १) चांगले आरोग्य आणि कल्याण, २) बालके उत्तम संवादक व्हावीत, ३) बालके सहभागी अध्ययनार्थी व्हावीत.
ही तीन ध्येये बालकांचे सर्वांगिण विकास साध्य करणारी आहेत. बालकांच्या पाच विकास क्षेत्रांवर या तीन ध्येयांमार्फत काम करणे या अभियानामध्ये अपेक्षित आहे. हे अभियान राबविण्याची जबाबदारी राष्ट्र आणि राज्य पातळीवर विविध घटकांवर सोपविण्यात आली आहे.
नंतर वर्ष २०२२ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या योग्य अमंलबजावणीसाठी पायाभूत टप्प्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा तयार करण्यात आला. या राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याची बालकांचे पाच विकासक्षेत्रे साध्य करणारी तेरा उद्दिष्ट्ये आहेत. तेरा उद्दिष्यांच्या प्रत्येकाच्या ३ ते ८ वयोगटाच्या अध्ययन निष्पत्ती आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील ही तेरा उद्दिष्ट्ये व त्यांच्या अध्ययन निष्पत्ती या निपुण भारत अभियानाच्या तीन ध्येयांना जोडल्या आहेत. म्हणजेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील तेरा उद्दिष्टे बालकांच्या पाच विकासक्षेत्रांवर काम करत निपुण भारतची तीन ध्येये साध्य करतात. अशा प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा निपुणच्या तीन ध्येयांना साध्य करत बालकांचा सर्वांगिण विकास घडवतो आणि पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान घटकांची पूर्ती करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतो.
मग हे निपुण भारत मिशन काय, त्याची ध्येय कोणती, त्यात विकसित करायची कौशल्ये आणि क्षमता कोणत्या, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान घटक कोणते, ते साध्य करण्यासाठीचे शैक्षणिक खेळ कोणते, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तेरा उद्दिष्ये कोणती? त्यांच्या अध्ययन निष्पत्ती कोणत्या? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची कोणती उद्दिष्टये निपुणची कोणती ध्येये कशी साध्य करतात, त्याव्दारे बालकांमधील निपुणला अपेक्षित कोणत्या क्षमता विकसित करतात. या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या उद्दिष्टयांच्या अध्ययन निष्पत्ती पूर्णपणे खेळपध्दतीने कशा साध्य करायच्या? त्यासाठीची शैक्षणिक साधने कोणती? मुख्य म्हणजे यासाठी काही वेगळेच साहित्य तयार करायचे आहे का? या सगळ्यांविषयी जाणून घेत बालशिक्षणाची म्हणजेच पायाभूत टप्पा, वय वर्षे ३ ते ८ मधील बालकांच्या शिक्षणाची वाटचाल करायची आहे.
“ हा खेळ निपुणच्या ध्येय क्र १ साठी असलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील उद्दिष्ट १ (CG १ - Curricular Goal)मधील मुलांना स्वतःची आवडनिवड समजते या अध्ययन निष्पत्तीसाठी( Learning Outcomes) होईल नं ?”
“ अग, निपुणच्या ध्येय क्र २ ला अनुसरुन राष्ट्रिय अभ्यासक्रम आराखड्याच्या चार CGs आहेत, त्यासाठी मुलांनी काढलेली चित्र पहा. त्यातून मुलांमध्ये त्या CG ला अपेक्षित अध्ययन निष्पत्ती (Learning Outcome) साध्य झालेली अगदी सहज समजून येतेय.”
“निपुणचे आमचे ध्येय क्र ३ साध्य करणाऱ्या राष्टीय अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांचे शैक्षणिक खेळ तयार झाले आमचे. आता थोडे तक्ते राहिलेत.”
“पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाच्या घटकांचे माझे खेळ तयार झाले. त्यातील मौखिक विकासासाठी अजून काय बरं ठेवता येईल?”
निपुणच्या ध्येयांना साध्य करणा-या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या CGsसाठी, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान घटकांच्या साठी भरपूर नवीन शैक्षणिक खेळ तयार करणे, मुलांच्या नेहमीच्याच विविध विकासात्मक खेळांना निपुणच्या ध्येयांनुसारच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांना जोडणे. प्रत्येक ध्येय साध्य करणाऱ्या CGsचे तक्ते करणे. पायाभूत भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान घटक विषद करणारे तक्ते करणे, या सगळ्यांचीच मुलांकडून चित्र काढून घेणे. या विषयी सतत शाळेत बोलणे सुरु आहे. जे दुसऱ्याने ऐकले तर कदाचित पटकन् संदर्भ लागणार नाही.
पण हे सगळे जर प्रत्यक्ष विविध शैक्षणिक खेळ व मुलांनी काढलेल्या चित्रांतून पहाता आले तर मात्र पटकन समजून येईल. यासाठीच ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा उद्दिष्टे आणि निपुण भारत अभियान ध्येये जोडणी व पायाभूत भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान घटक सजगता कार्यक्रम’ अशा मोठ्या नावाचा छोट्यांच्या शिक्षणाविषयीचा सजगता कार्यक्रम आयोजित केला आहे.
अगदी आपल्या सर्वांनाच माहित असलेल्या धाग्यापासून सुरुवात करु. मुलांचा सर्वांगिण विकास करणे हे बालशिक्षणात अपेक्षित आहे. मुलांच्या विविध विकास क्षेत्रांवर म्हणजेच, भावनिक व सामाजिक विकास, भाषाविकास, बौध्दिक विकास, स्थूल आणि सूक्ष्म स्नायू विकास, कलात्मक दृष्टी विकास यांवर काम करत बालशिक्षणाची वाट आखली जाते. या विकास क्षेत्रांवर आधारित शैक्षणिक खेळांची मांडणी केली जाते.
उदा. बालकाचा भावनिक व सामाजिक विकास साध्य करताना स्वतःच्या कुटुंबाची, शेजारी, शाळा व मित्र यांची ओळख हा भाग येतो आणि त्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात जे ३ ते ६ या वयानुसार बदलत जातात. जसे शहरी भागात घरचे कुटुंबाचे फोटो मागवले आणि त्यावरच्या वर्गात गप्पा झाल्या, ते फोटो वर्गात मुलांसाठी लावले तर कुटुंबाची ओळख हा सामाजिक विकास बालकांमध्ये साध्य झालेला दिसेल.
आता वरचाच उपक्रम आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि निपुण ध्येयाच्या अनुषंगाने पाहू.
'निपुणचे ध्येय क्र १ म्हणजे बालकांचे चांगले आरोग्य व कल्याण हे आहे. त्याची जोडणी ही राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याच्या उद्दिष्ट क्र ४ बालके भावनिक बुध्दिमत्ता विकसित करतात याच्याशी केली आहे. ज्याची एक अध्ययन निष्पत्ती अशी आहे की बालक स्वतःला कुटुंब, शेजारी, शाळा यांचा एक घटक म्हणून ओळखतो. ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यास वरील उपक्रम नक्कीच घेता येईल. एकूण आपण घेत असलेले विविध विकास क्षेत्रांवर आधारित शैक्षणिक खेळ आपल्याला या राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याच्या उद्दिष्टांशी व त्या अनुषंगाने निपुणच्या ध्येयांशी जोडता येणार आहेत.
आता अजून काही निपुणच्या ध्येयांनुसारची उदाहरणे घेऊ -
निपुणच्या ध्येय क्र. १ चांगले आरोग्य आणि कल्याण मध्ये विकसित करण्याचे कौशल्य आहे, स्वतःची जाणीव होणे - माझी आवड, नावड समजते. या घटकाला अनुसरुन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील उद्दिष्ट क्र ४ मधील अध्ययन निष्पत्ती बालक स्वतःची आवड दर्शवतो याच्याशी घालते व यावर आधारित मला खाण्यास काय काय आवडते, सांगू का. हा शैक्षणिक खेळ तयार घेता येईल. हाही खेळ पूर्वी आपल्या भावनिक व सामाजिक विकासातर्गत घेतला जात असे.
निपुणचे ध्येय क्र २ – बालके उत्तम संवादक व्हावीत, यासाठी विकसित करण्याचे कौशल्य आहे ध्वनी आणि चिन्हे यांची सांगड घालता येणे, यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील उद्दिष्टाची अध्ययन निष्पत्ती सर्वसामान्य चिन्हे, प्रतीके व मुद्रा ओळखतो, मुळाक्षरे आणि त्यांच्या ध्वनींची सांगड घालतो याला अनुसरुन अक्षरे व त्यांची चित्रे किंवा प्रतिके आणि त्यांची नावे हा खेळ मुलांसाठी होईल. हे खेळ वाचनपूर्व तयारीच्या अंतर्गत घेत होतो, तर ध्वनींचा खेळ हा भाषाविकासातील श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी घेत होतो.
आणि निपुणचे ध्येय क्र २ हेही भाषाविकासाच्या कौशल्यांवर आधारित आहे.
निपुणचे ध्येय क्र ३ सहभागी अध्यनार्थी व्हावीत, याचे विकसित करण्याचे एक कौशल्य आहे स्मरणशक्ती विकसित करणे, यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार उद्दिष्टाची अध्ययन निष्पत्ती दृक प्रतिमा ओळखतो, आठवतो व त्यांच्या जोड्या लावतो ही आहे तर यानुसार स्मरणशक्तीची कार्डांचा खेळ तयार केला जाऊ शकतो. हे खेळ बौध्दिकविकासासाठी घेत होतो. आणि आताही नव्या रुपातही या ध्येयाला अपेक्षित कौशल्ये मुलांचा बौध्दिक विकास साध्य करणारीच आहेत.
तसेच पायाभूत भाषा साक्षरता घटकांशी निगडित खेळांचे उदाहरण म्हणजे मुलांचा मौखिक विकास करताना आपण चित्र वर्णन घेतो किंवा गाणी, गोष्टी, घटनाक्रम घेतो ते सर्व यात येते. तर संख्याज्ञान म्हणजे मोजणी, संख्याक्रिया, गणनपूर्व संकल्पना, दशक संकल्पना, एकास-एक संकल्पना आदी घटकांवर आधारित खेळ होत. जे आपण भाषाविकास आणि बौध्दिक विकास – गणिती संकल्पनेसाठी घेत होतो.
एकूण ३ ते ८ वयोगटाच्या मुलांच्या विकासक्षेत्रांशी निगडित अनेक खेळ जे आपल्या परिचयातील असतील तर काही नवे असतील ते महत्त्वाचे नाही तर, ते खेळ आपल्याला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या उद्दिष्टांशी जोडत निपुणच्या ध्येय व पायाभूत भाषा साक्षरता व संख्याज्ञान घटक पूर्ती करणारे कसे आहेत आणि त्यातून मग बालकांचा सर्वांगिण विकास कसा साध्य होणार आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे आपले नेहमीचेच खेळ आहेत का या प्रश्नाचे उत्तर होय बरेच खेळ आपलेच आहेत. तसेच काही त्यात भरही आहे.
पण नाविन्य राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या उद्दिष्टांशी, त्यांच्या अध्ययन निष्पत्तींशी, निपुणच्या ध्येयांशी या खेळांचे जे नवे नाते आहे त्याचे आहे. नाविन्य बालकांची आपल्याला परिचित असलेली विकासक्षेत्रे साध्य करणारे खेळ या नव्या दृष्टीने कसे बघायचे यात आहे. म्हणजेच शैक्षणिक खेळ जे आपल्या अगदी ओळखीचेच आहेत, ते अगदी जुने संवगडी नव्या वाटेवर, नव्या देशात भेटले की कसे हायसे वाटते, तसे वाटायला लावणारे आहेत. तसेच या प्रत्येक अध्ययन निष्पत्ती मुलांमध्ये साध्य झाल्या आहेत हे दर्शविणारी प्रत्येक अध्ययन निष्पत्तीला अनुसरुन मुलांनी काढलेली चित्र हे नाविन्य आहे. ही चित्र म्हणजे मुलांमधील अध्ययन निष्पत्तीचे अवलोकन कसे करता येईल, मुलांमध्ये ती अध्ययन निष्प्तती साध्य झाली आहे का हे कसे जाणून घेता येईल याची ती मांडणी आहे. म्हणजेच नव्या वाटेवर, अध्ययन निष्पत्तींचे खेळ कोणते आणि त्या मुलांमध्ये साध्य झाल्या आहेत का याची पडताळणी कशी करायची याचा संपूर्ण आढावा घेणारा हा सजगता आहे.
एकूण असं..
मंजिल भले ही पुरानी हो, रास्ते तो नये है!
मंजिल को पाने के लिए, नया सफर जरुरी है!
भेट द्या
निपूण भारत अभियान-ध्येये आणि पायाभूरत साक्षरता -संख्याज्ञान
दि. ३ आणि ४ फेब्रूवारी
सरस्वती मंदीर ट्रस्ट, नौपाडा-ठाणे