Join us  

कितीही अभ्यास करा, घोकंपट्टी करा मार्क कमीच पडतात? असं का, मार्क कमीच का पडतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 1:09 PM

कितीही मार्क पडले तरी कमीच पडले म्हणणारे पालक आहेत, पण खरंच काही मुलांना कायम मार्क कमी का पडतात?

ठळक मुद्देकमी मार्क मिळण्याची भीती वाटून घेऊ नका, त्यापेक्षा उपाय शोधायला हवेत.

डॉ. श्रूती पानसे

मार्क कमी पडले, आता बाबा मारतील का.. आई रागवेल का, याची भीती मुलांना असते.आपल्याला मार्क कमी पडले तर.. यांचा एक ताण कोणत्याही वयातल्या ‘विद्यार्थ्यावर असतो. आताच्या काळात तर शंभरपैकी ९५ मार्क मिळाल्यावर पाच मार्क कुठे गेले, असं विचारणारे पालक आहेत. पण एकुणातच काही वेळा खरंच कमी मार्क पडतात, त्याची किती तरी कारणं आहेत. त्यावर आईबाबा, शिक्षक, काही करू शकत नाहीत. ती आपली आपणच बघावी लागतात. त्यातली काही मुख्य कारणं बघूया.

(Image : Google)

का मार्क कमी पडतात?

१. आपला अभ्यास झाला आहे, असा गैरसमज असतो.आपलं वर्गात जे काही लक्ष होतं, त्यातलं जे काही वाचलं, लिहिलं, समजून घेतलं तोच आणि तेवढाच अभ्यास, असं समजून चालतो, तिथंच चुकतं. प्रत्येक धडा, प्रत्येक संकल्पना आपणच समजून घेतलेली नसते, तिथे आपलीच चूक झालेली असते.

२. महत्त्वाचं आणि बिन महत्त्वाचंकाही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यावर आपण भर देतो, त्याचाच अभ्यास जास्त करतो, काही गोष्टी बिन महत्त्वाच्या वाटतात, तिकडे दुर्लक्ष होतं. पण दुर्लक्ष केलेल्याच गोष्टी परीक्षेत नेमक्या विचारल्या जातात, त्याचा अभ्यास झालेला नसल्यामुळे लिहिताच येत नाहीत. आणि तसंच ठोकून दिलं तर चुकतात.

३. आपण हुशार नाही, अशी मानसिकताज्यांना नेहमी जास्त मार्कस मिळतात, ते बुद्धिमान असतात, त्यांनी थोडा अभ्यास केला तरी त्यांना यश मिळतं, असा एक समज असतो. वास्तविक योग्य प्रकारे आणि एकाग्रतेने अभ्यास केला तर मार्कस मिळतात. काही मुलं बुद्धिमान आहेत आणि आपण नाही, त्यामुळे आपण कितीही अभ्यास केला तरी मार्क कमीच मिळणार असं काही नसतं. ही मानसिकता चुकीची आहे. अभ्यासाची आपली पद्धत शोधून काढा आणि सगळे अडथळे दूर करा, म्हणजे चांगले मार्क मिळतील.

(Image : Google)

४. नावडत्या विषयांचं काय ?काही जण फक्त आवडीच्या विषयांचा अभ्यास करतात. आणि अवघड विषय टाळतात. अर्थातच ही मानवी प्रवृत्ती आहे. पण अभ्यासाच्या बाबतीत आपण असं केलं तर आपणच पायावर धोंडा मारून घेऊ. सुट्टीत जेव्हा जास्त वेळ असतो, तेव्हा आवडीच्या विषयांमध्ये अगदी मनसोक्त रमता येईल. पण अभ्यास करायचा आहे, तो सगळ्या विषयांचाच. तिथे आपल्याला अजून तरी शालेय व्यवस्थेने पर्याय ठेवलेला नाही. त्यामुळे सगळ्या विषयांना सारखा वेळ द्यायला पाहिजे.

५. वेगवेगळ्या बुद्धिमत्ताआपल्या मानवी मेंदूत अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात, आपल्यात नक्की काय चांगलं आहे, आपल्या मेंदूची शक्ती नेमकी कोणत्या प्रकारचं काम करण्यात आहे, हे शोधावं लागेल.

६. अध्ययन अक्षमताअभ्यास करण्यात येणाऱ्या अनेक अडचणींमध्ये अध्ययन अक्षमता आहेत का, हे पाहायला हवं. तसं असेल तर त्यानुसार अभ्यास कसा करायचा हे ठरवायला पाहिजे.

७. अभ्यासाशी आपलं नेमकं वाकडं

 मार्क कमी पडण्याची काहीच कारणं इथे दिली आहेत. त्यापेक्षा अनेक कारणं असू शकतात.आहेतच. आणि प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कमी मार्क मिळण्याची भीती वाटून घेऊ नका, त्यापेक्षा उपाय शोधायला हवेत.त्याविषयी पुढच्या भागात..

 

(लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि कौन्सिलर आहेत.)संपर्क व्हॉट्स ॲप मेसेज : 7499855830अक्रोड, Brain & Behaviour Courses (मुलांच्या मेंदूत डोकावण्यासाठी)

टॅग्स :पालकत्वविद्यार्थी