Join us  

मुलं फारच बारीक आहेत, जबरदस्तीने मोबाइल दाखवत खाऊ घालता? वजन वाढवायचा अट्टहास पडेल महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 6:24 PM

मुलं बारीक आणि काटक असतील तर त्यांना हेल्दी लाइफस्टाइल द्यावी, समतोल आहार आवश्यक मात्र अकारण खाऊ घालून वजन वाढवणं धोक्याचं.

डॉ. यशपाल गोगटे

स्मार्ट आधुनिक डिव्हाइस दिसायला लहान दिसले तरी कामात तेज असतात. तसेच आजूबाजूस काही व्यक्ती दिसतात बारीक  परंतु त्या अधिक काटक असतात. त्यांना बरेच वेळा बारक्या, लुकड्या म्हणून हिणवले जाते. त्यात मुलं बारीक असतील, खूपच सडपातळ, वजन वाढत नसेल तर आईवडिलांना वाटतं की त्यांना भरपूर खायला घालावं. कसंही करुन जबरदस्तीने खायला घालून त्यांचे वजन वाढवण्याचा एकमेव विचार असतो. त्यातून मुलांच्या मनात कमी वजनाचा न्यूनगंड तयार होतो. खरंतर असं न करता बारिक मुलांना कसे बारीक ठेवता येईल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. 

(Image : Google)

बाळसे की सूज?

गरोदरपणात ज्या माता कुपोषित असतात त्यांची बाळं जन्मत: कमी वजनाची असली तरीही काटक असतात. गरोदरपणात कुपोषणामुळे बाळाच्या शरीराला कमी कॅलोरीमध्ये शरीराचे व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळता येते. जन्मानंतर मात्र या कमी वजनाच्या बाळांना बाळसेदार - गुबगुबीत करण्याच्या हव्यासापायी त्यांना अधिक प्रमाणात (आवश्यकता नसतांना मागे लागून ) खायला दिले जाते. कमी कॅलोरीवर निभावणाऱ्या त्यांच्या शरीरावर या अतिरिक्त खाण्याचा भार येतो. ही मुले बाळसेदार तर होतात परंतु हे बाळसे त्यांच्या पुढील वयात लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांना निमंत्रण देते. खास करून वयात येण्याच्या काळात या मुला-मुलींचे वजन झपाट्याने वाढते. म्हणूनच जन्मतः कमी वजनाच्या (२.५ किलोच्या आतील ) बाळांचे वजन वाढवण्याचा अट्टाहास टाळावा. या उलट त्यांना आपण योग्य वजनात हेल्दी राहण्यावर भर द्यावा. शक्यतो या मुलांना बारक्या, किडकिडीत असे म्हणून हिणवू नये.अतीच खाऊ घातलं, चुकीचा आहार असेल तर ती मुलं लठ्ठ होतात. त्यांना चयापयाचे आजार होऊ शकतात.

(Image : Google)

वजन किती हवे?

१८-२० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असते ते आपल्या शरिराला सहजपणे पेलवते. सामान्यतः एक समज आहे की वयाबरोबर वाढणारे वजन हे शरीराला सहजपणे पेलवता येते. तुमच्या १८-२० वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचे वजन ५ किलो पेक्षा अधिक असेल, आणि जरीही ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरवात ठरू शकते. बऱ्याचशा भारतीयांचे वजन जन्मतः कमीच असते व ते १८-२०व्या वर्षापर्यंत कमीच राहते. आपल्या ' वजन प्रेमी ' मानसिकतेमुळे या लोकांना जाड केले जाते. यामुळे आज भारतामध्ये चयापचयाचे आजार साथीच्या रोगाप्रमाणे पसरत आहेत. म्हणूनच मुलांना बारीक म्हणून चिडवू नका, जाड करण्याचा अट्टहासही नकोच.

(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत.) 

टॅग्स :पालकत्व