Join us

शाब्बास पोरा! ना फोन, ना सोशल मीडिया... JEE मेन्समध्ये 'असे' मिळवले पैकीच्यापैकी गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:31 IST

ओम प्रकाश बेहेराने पूर्ण ३००/३०० गुण मिळवून जेईई मेनमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.

भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या जेईई मेन्स (जेईई मेन २०२५) मध्ये एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ओडिशातील ओम प्रकाश बेहेराने पूर्ण ३००/३०० गुण मिळवून जेईई मेनमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याच्या यशाचं रहस्य म्हणजे त्याने अभ्यासासाठी फोन पूर्णपणे दूर ठेवला. ओम प्रकाशने पूर्णपणे त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं, ज्यामुळे त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. 

ओम प्रकाश बेहरा याचा जन्म ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये झाला आणि त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य नागरी सेवेत आहेत, ज्यामुळे त्याला लहानपणापासूनच चांगलं आणि मोठं काम करण्याची प्रेरणा मिळाली. कुटुंबाकडून मिळालेल्या या प्रेरणेमुळे त्याला जेईईसारख्या कठीण परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यास खूप प्रेरणा मिळाली.

दररोज ८ ते ९ तास अभ्यास

ओम प्रकाशने  अभ्यासासाठी शिस्तबद्ध पद्धत निवडली. तो दररोज ८ ते ९ तास अभ्यास करतो, ज्यामुळे त्याला प्रत्येक विषयाची सखोल माहिती मिळण्यास मदत होते. प्रत्येक मॉक टेस्टनंतर, तो त्याच्या चुकांचं विश्लेषण करतो आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो.

फोनपासून अंतर

आजकालचे बहुतेक तरुण सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जगात हरवलेले असताना, ओम प्रकाशने आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी फोन न वापरण्याचा निर्णय घेतला. त्याला असा विश्वास होता की, फोनमुळे होणारे लक्ष विचलित होतं. या निर्णयामुळे त्याला पूर्णपणे लक्ष केंद्रित राहण्यास मदत झाली आणि हेच त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचं मुख्य कारण बनलं.

जेईई मेन २०२५ ची तयारी करताना, ओम प्रकाशने प्रामुख्याने एनसीईआरटी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित केलं आणि प्रशिक्षक शिक्षकांच्या सल्ल्याचं पालन केलं. त्याच्या मते, योग्य अभ्यास साहित्य आणि कोचिंग क्लासमुळे त्याला प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मदत झाली. ओम प्रकाश आता जेईई एडव्हान्स्डसाठी उत्सुक आहे. आयआयटी मुंबईमधून कॉम्पूटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करण्याचं त्याचं स्वप्न आहे.

टॅग्स :पालकत्व