Join us  

मुलांनी आदळआपट-थयथयाट केला तर तुम्ही काय करता? उलट करा, ओरडू नका- बघा काय होतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 9:40 AM

One time when you should not Scold your child Parenting tips : मुलांना कोणत्या वेळेला ओरडावे आणि कोणत्या वेळेला थांबावे हे लक्षात घ्यायला हवे.

मुलं चुकीची वागली की आपण त्यांना ओरडतो, मोठ्या आवाजात रागवतो. मूल ऐकत नसेल आणि चुकीचे वागत असेल तर पालक म्हणून आपला पारा चढतो आणि एकीकडे मुलंही ओरडत असतात आणि दुसरीकडे आपण त्यांना रागवत असतो. अशावेळी संपूर्ण घरातील वातावरणच खराब होते. मुलं खूप हट्टीपणा करत असतील आणि खूप वेळा सांगूनही काही गोष्टी ऐकत नसतील तर असं होणं स्वाभाविक असतं, मात्र अशाप्रकारे मुलांना ओरडणे काही वेळा तोट्याचे ठरु शकते. मुलांना आवश्यक तिथे शिस्त लावायलाच हवी, त्यांना पालक म्हणून योग्य त्या प्रमाणात आपली भितीही वाटायला हवी. पण मुलांना कोणत्या वेळेला ओरडावे आणि कोणत्या वेळेला थांबावे हे काही वेळा पालकांना समजायला हवे. याविषयीच समुपदेशक प्रिती वैष्णवी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात. त्या नेमकं काय सांगतात पाहूया (One time when you should not Scold your child Parenting tips)...

१. मुलं काही कारणाने स्वत:च खूप आरडाओरडा करत असतील तर अशावेळी आपण त्यांना अजिबात ओरडू नये. कारण ते ओरडत असतानाच आपण ओरडलो तर त्यांच्या बुद्धिमत्तेला आपण कमी लेखतो असा मेसेज त्यातून जातो. 

२. आपण ओरडतो आहोत हे चुकीचे आहे हे मुलांना माहित नसते असे नाही. आपले वागणे चुकीचे आहे हे त्यांना अतिशय लहान वयातही नीट समजत असते. घरात कोणीही असे वागत नसताना आपण काहीतरी वेगळे आणि चुकीचे करतो हे त्यांना लक्षात येते. 

३. अशावेळी आपण चुकीचे करतो आहोत आणि आता देवा मला वाचव किंवा मी पुन्हा अशी चूक करणार नाही असा काहीसा विचार त्यांच्या मनात सुरू असतो. पण याचवेळी आपण जर त्यांच्यावर ओरडलो तर त्यांच्या डोक्यात एक वेगळेच विचारांचे चक्र सुरू होते. मला कोणी समजूनच घेत नाही, कोणचेच माझ्यावर प्रेम नाहीये, मी वाईट आहे अशाप्रकारचे वेगळे विचार सुरू होतात. आपण ओरडल्याने हे होण्याची शक्यता जास्त असते. मात्र असे होणे योग्य नाही. 

४. त्यामुळे अशावेळी मुलांना आधी त्यांचे काय म्हणणे आहे ते मांडू द्यावे. त्यांना शांत होण्यास थोडा कालावधी जाऊ द्यावा आणि मग त्यानंतर परिस्थिती शांत झाल्यावर ३ ते ४ तासांनी हा विषय मुलांसमोर काढावा आणि     त्यांनी मगाशी जे वागले ते कसे चुकीचे होते हे मुलांना समजावून सांगावे. तुम्ही अशाप्रकारे मुलांशी वागाल तर मुलं तुमचं म्हणणं नक्की ऐकतील हे लक्षात ठेवा. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं