Lokmat Sakhi >Parenting > इयत्ता बदलली पण मुलांना काही येत नाही? लिहिण्याचा-अभ्यासाचा कंटाळा करतात? -पालकांनी अशावेळी काय करायचं?

इयत्ता बदलली पण मुलांना काही येत नाही? लिहिण्याचा-अभ्यासाचा कंटाळा करतात? -पालकांनी अशावेळी काय करायचं?

शाळा उघडल्या, पण कोरोनाकाळात मुलांच्या शिक्षणाची आबाळ झाली, स्क्रिन हातात आले आणि मुलं अभ्यासात मागे पडली, आता पालकांनी काय केलं तर मुलांना शिकण्याची गोडी लागेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 03:32 PM2022-07-05T15:32:48+5:302022-07-05T15:37:14+5:30

शाळा उघडल्या, पण कोरोनाकाळात मुलांच्या शिक्षणाची आबाळ झाली, स्क्रिन हातात आले आणि मुलं अभ्यासात मागे पडली, आता पालकांनी काय केलं तर मुलांना शिकण्याची गोडी लागेल?

online education kids lack of writing -learning skills, schools reopen what next? | इयत्ता बदलली पण मुलांना काही येत नाही? लिहिण्याचा-अभ्यासाचा कंटाळा करतात? -पालकांनी अशावेळी काय करायचं?

इयत्ता बदलली पण मुलांना काही येत नाही? लिहिण्याचा-अभ्यासाचा कंटाळा करतात? -पालकांनी अशावेळी काय करायचं?

Highlights हे वर्ष बाकी गोष्टी बाजुला ठेवून मुलांची गाडी रुळावर आणणे हीच आपली प्राथमिकता ठेवावी लागेल.

विनोदिनी काळगी

गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने अनेक जणांचे अनेक प्रकारे नुकसान केले आहे हे आपण जाणतोच. पण, यात सर्वांत जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते शालेय मुलांचे. आता नुकत्याच जूनमध्ये जेव्हा शाळा सुरू झाल्या आणि तेव्हा लक्षात यायला सुरुवात झाली की ‘शाळा बंद, पण शिक्षण चालू’ ही घोषणा किती आभासी होती.
त्यातील महत्त्वाची निरीक्षणे म्हणजे मुलांमध्ये चंचलता, आक्रमकपणा वाढला असून एकाग्रता खूप कमी झाली आहे. पूर्वी शिकलेल्या विषयातील आशय विसरला आहे. एका जागी बसणे, अभ्यास करणे याची इच्छाच होत नाही. आकलनासह वाचन, लेखन या क्षमताही कमी झाल्याचे जाणवते आहे. पूर्वी अभ्यासासाठी म्हणून हाती आलेला मोबाईल सोडणे आता कठीण होते आहे. यातून मुलांचे आणखी नुकसान होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळा आणि शिक्षकांना ही जबाबदारी घ्यावी लागणार आहेच. पण माझ्यामते त्यापेक्षा जास्त जबाबदारी पालकांची आहे.
आम्हाला वेळ नाही, आम्हाला जमत नाही असे पालकांनी म्हणून भागणार नाही. हे वर्ष बाकी गोष्टी बाजुला ठेवून मुलांची गाडी रुळावर आणणे हीच आपली प्राथमिकता ठेवावी लागेल. काही पालकांनी यावर मुलांना गाईड आणून देणे, शिकवणी वर्गाला पाठवणे असे उपाय सुरू केले आहेत. पण शिकवणीवर्गातही लक्ष नसेल तर काय उपयोग? आणि आकलनाशिवाय काहीही उतरवून काढणे हेही निरुपयोगी आहे. हल्ली तर धड्याखालचा स्वाध्याय सोडवून देणारे व्हिडिओपण असतात म्हणे. यातून आपण मुलांना अपंग बनवत आहोत.


(Image : Google)

पालकांना काय करता येईल?

१. प्रत्येक मूल वेगळे आहे आणि त्याच्या सवयी, आवडी यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे पालकांनाच चांगले समजू शकते. त्यासाठी पालकांनी (आई, वडील किंवा घरातील मोठी मंडळी) स्वत:च्या वेळापत्रकात मुलांसाठी ठराविक वेळ राखून ठेवायला हवा आणि तो फक्त त्यासाठीच वापरण्याचे पथ्य पाळायले हवे. मुलांसाठी जास्त वेळ दिलात तर त्यांच्याबरोबर तुमचा मोबाईलवरचा वेळही आपोआप कमी होईल हा तुमचापण फायदा आहेच.
२. मोबाईलच्या माध्यमातून मुले इंटरनेट आणि सोशल मीडियाशी जोडली जाण्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. तो मोठाच विषय आहे. पण सध्या आपण मोबाईलमुळे मुले अभ्यासात आणि शारीरिक खेळातही निष्क्रिय होत आहेत याचा विचार करू. यासाठी मुलांना मोबाईलचा वेळ नेमून देणे आणि तो काटेकोरपणे पाळायला लावणे आवश्यक आहे. शिवाय त्यांना ठराविक काळ मोकळ्या मैदानावर, चांगला व्यायाम होईपर्यंत खेळायला पाठवणेही गरजेचे आहे. खेळण्याने मनावरचे ताण कमी होऊन उत्साह वाढतो.

(Image : Google)

३. मुलांचा अभ्यास घेण्याची सुरुवात स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे पाठ करून किंवा लिहून घेण्यापासून करायची नाही बरंका! आधी आपले मूल कोणत्या विषयात आणि कोणत्या कौशल्यात किती मागे आहे हे त्याच्याशी संवाद करून समजून घेणे. तसेच आहे त्याचा मोकळेपणाने स्वीकार करून ही कमतरता आपण मिळून दूर करू शकतो याबाबतचा विश्वास मुलांमध्ये जागृत करावा लागेल.
४. पाठ्यक्रमातील कमकुवत क्षेत्रांची मुलांबरोबर यादी करून त्रुटी दूर करण्यासाठी मुलाचे मत जाणून घेऊन कृती योजना आखावी लागेल.
५. कदाचित काही पालकांची मुलांचा अभ्यास घेण्याची क्षमता असणार नाही. याबाबत दोन गोष्टी करता येतील. एक म्हणजे, आपल्या मुलाचे काही मित्र-मैत्रिणी व त्यांचे पालक एकत्र येऊन अशी योजना आखता येईल. यात पालक आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या विषयांची जबाबदारी घेऊ शकतील.
६. एकट्याचा अभ्यास घेण्यापेक्षा मुलेही एकमेकांच्या नादाने अभ्यास करतील. मात्र, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला यायलाच हवी असा आग्रह धरून चालणार नाही. खूप संयमाने आणि हळुवारपणे हे काम करावे लागेल.
७. दुसरी गोष्ट म्हणजे सुशिक्षित पालकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या मुलाबरोबर घरी अभ्यासाचे वातावरण नसणाऱ्या २-३ मुलांचा अभ्यास घेतला तर मोठेच काम होईल.
८. मुलांना आकलनासहित वाचन, लेखन यावे याची सुरुवात त्यांच्या आवडीचे गोष्टीचे पुस्तक त्यांच्याबरोबर वाचून करता येईल. (पालकांचेही वाचनही आता कमी झालंय) या गोष्टीतले तुला काय आवडले? का आवडले? जे आवडले ते आपण लिहू या का? अशा पायऱ्यांनी जावे लागेल.
९. अगदी लहान मुलांसाठी (७-८ वर्षांपर्यंत) गिरवणे किंवा बघून उतरवणे याला हरकत नाही कारण त्यांच्यासाठी लेखनाकडून अपेक्षा म्हणजे कारक स्नायुंचा विकास, हात आणि डोळे यांचा योग्य समन्वय अशा असतात. पण मोठ्या मुलांसाठी आपण जे ऐकले, वाचले, पाहिले त्यातून काय समजले याची स्पष्टता येण्यासाठी आणि समजलेल्या भागाचे दृढीकरण होण्यासाठी लेखनाचे महत्त्व असते.
१०. हे लक्षात घेऊन मुलांना लेखनाकडे वळवणे आणि मग लेखनाचा वेग वाढवणे आवश्यक ठरेल. (हस्ताक्षर, शुद्धलेखनाचा अति आग्रह धरू नये) स्वत:च्या विचाराने लेखन करणे आणि स्वत:च्या वेगळ्या कल्पना मांडणे ही त्यातील उच्च कौशल्ये आहेत.
११. या सगळ्यासाठी मुलांशी चर्चा करून वेळापत्रक तयार करणे, ते पूर्ण होण्यासाठी सातत्य राखणे आणि शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त स्वयंअध्ययनासाठी निश्चित वेळ देणे महत्त्वाचे आहे. शेवटी प्रश्न आपल्या मुलांच्या भवितव्याचा आहे ना!

(लेखिका नाशिकस्थित आनंद निकेतन शाळेच्या संचालक आहेत.)

Web Title: online education kids lack of writing -learning skills, schools reopen what next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.