Lokmat Sakhi >Parenting > प्रचंड वळवळी हायपर मुलं शांतच बसत नाहीत? 5 उपाय, मुलं आनंदीही आणि वाढेल एकाग्रताही

प्रचंड वळवळी हायपर मुलं शांतच बसत नाहीत? 5 उपाय, मुलं आनंदीही आणि वाढेल एकाग्रताही

मुलांनी अगदी ध्यान किंवा मेडीटेशन करावं असं नाही, पण काही सोप्या उपायांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी होऊ शकते मदत ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:03 PM2021-12-29T17:03:55+5:302021-12-29T17:37:18+5:30

मुलांनी अगदी ध्यान किंवा मेडीटेशन करावं असं नाही, पण काही सोप्या उपायांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी होऊ शकते मदत ...

over hyper kids don't sit still? 5 remedies, children will be happy and will increase concentration | प्रचंड वळवळी हायपर मुलं शांतच बसत नाहीत? 5 उपाय, मुलं आनंदीही आणि वाढेल एकाग्रताही

प्रचंड वळवळी हायपर मुलं शांतच बसत नाहीत? 5 उपाय, मुलं आनंदीही आणि वाढेल एकाग्रताही

Highlightsमुलांना सतत काहीतरी काम हवं असतं, हे काम त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोगी असेल तर...घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय...

लहान मूलं अजिबात एका जागी बसत नाहीत, सतत वळवळ सुरू असते. तो किंवा ती अजिबात एका जागेवर बसत नाहीत अशी तक्रार पालक सारखी करताना दिसतात. या मुलांना लहानपणापासून काही गोष्टी शिकवल्या तर त्यांना लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. यामध्ये काही गेम, योगा, ध्यान यांचा समावेश असू शकतो. आता जे मूल १० मिनिटे एका जागेवर बसत नाही ते योगा आणि ध्यान कसे करणार असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडू शकतो. पण काही सोप्या ट्रीक्स वापरल्या तर मुलेही वेगळ्या पद्धतीने मेडीटेशन करु शकतात. ध्यान आणि मेडीटेशन म्हणजे गंभीर काहीतरी असे नसून मनाची मशागत करण्याचे ती उत्तम पद्धत आहे. ही पद्धत आपल्याला त्या त्या वयोगटानुसार, मनाच्या विशिष्ट अवस्थेनुसार, त्यांच्या समजानुसार वापरता येऊ शकते. आता हे लक्षात घेऊन वय वर्षे ५ ते १० वर्षाच्या मुलांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करायचे याविषयी बोलूया.

मूळात लहान मुलांच्या शरीरामध्ये खूप मोठ्ठी ऊर्जा असते. तसेच  त्यांचे मन टिपकागदासारख असतं. या वयातील मुले खूप संवेदनशील, उत्सुक असतात. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत त्यांना जाणून घ्यायचं असतं आणि त्याचा एक परिणाम किंवा संस्कार त्यांच्या मनावर होत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्यांचं मन आणि शरीर सतत कामात असतं. आपण थकलो की आपल्या शरीराला आरामाची गरज असते. तसेच मानसिकरित्या खूप ताण झाला की आपल्याला थोडा बदल हवा असतो किंवा शांतता हवी असते. म्हणजेच आपल्या शरीराला आणि मनाला ज्याप्रमाणे विश्रांतीची गरज असते त्याचप्रमाणे लहान मुलेही थकतात आणि त्यांनाही आरामाची गरज असते. अशावेळी ध्यान किंवा मेडीटेशन यापेक्षा काही सोप्या अॅक्टीव्हीटी मुलांचे मन शांत आणि स्थिर करण्यासाठी उपयुक्त ठरतात त्या कशा सांगताहेत योगतज्ज्ञ सुचेता कडेठाणकर

(Image : Google)
(Image : Google)

१. एका मोठ्या पातेल्यात असलेलं पाणी दुसऱ्या पातेल्यात अगदी न सांडता आणि तेही चमच्याने ओतणे. यासाठी मुलांना एकाग्रता लागते. हे काम काळजीपूर्वक करावं लागणार असल्याने त्यांना इकडेतिकडे लक्ष देऊन चालणार नाही. याबरोबरच पत्त्यांचा बंगला तयार करणे, काडेपेटी मधल्या काड्या एका सरळ रेषेत लावणे अशा काही खेळांच्या माध्यमातून मुलांना एकाग्रता शुकवू शकतो. त्यामुळे दरवेळी ध्यानासाठी किंवा मेडीटेशनसाठी डोळे मिटून एका जागी बसण्याची आवश्यकता असते असे नाही. तर लहान मुलांना अशाप्रकारच्या लक्ष केंद्रित करायला लावणाऱ्या अॅक्टीव्हीटी देता येऊ शकतात.

२. डोळे मिटून दिवसातून निदान ४ वेळा ओंकार म्हणणे. डोळे मिटून एका जागी शांत बसणे हेही मुलांसाठी एकप्रकारचे चॅलेंज असू शकते. एकावेळी ५ ते १० वेळा ओंकार म्हणायचा असे सांगितल्यावर किमान १० मिनिटे जातात. यासाठी घरातील मोठ्यांनी सुरुवातीला त्यांच्यासोबत ही क्रिया करायची आवश्यकता आहे. हळूहळू यातील गंमत लक्षात आल्यावर आपण न सांगता मुले ही कृती करतील. सुरुवातीला त्यांना याचे महत्त्व समजणार नाही, पण ते जसे मोठे होतील तसा यामागील अर्थ आणि उद्देश त्यांच्या लक्षात येईल आणि भविष्यात त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल.
.
३. चित्र काढणे किंवा रंगांशी दोस्ती करणे या क्रिया लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा रमण्यासाठी अतिशय उत्तम असतात. लहान मुलांना साधारणपणे चित्र काढायला, वेगवेगळ्या आकृत्या काढायला, रंग हाताळून पाहायला आवडते. चित्र काढण्याऐवजी त्यांना रांगोळी काढायला द्यावी. यामध्ये त्यांना जास्त लक्ष द्यावे लागेल. हात, डोळे, मेंदू या सगळ्यांचे काम असल्याने लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. मुले रांगोळी घेऊन पसारा करतात असे न म्हणता, त्यांना त्याच्याशी खेळू द्यावे. त्यांना वेगवेगळ्या डिझाइन काढायला सुचवाव्यात. 

४. सुई दोऱ्यामध्ये मणी ओवायला सांगणे, सण समारंभाप्रसंगी मुद्दाम हार गुंफायला देणे अशा गोष्टींमधूनही मुलांचे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. अशा प्रकारची लहानमोठी कामे करणे हेही एकप्रकारचे मेडीटेशन असू शकते. त्यामुळे मुले कंटाळतात, बोअर झालंय असं म्हणतात किंवा सतत मोबाईल नाहीतर टीव्ही पाहत राहतात तेव्हा त्यांना अशाप्रकारच्या अॅक्टीव्हीटी दिल्यास त्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.  

(Image : Google)
(Image : Google)

५. आपण धार्मिक वृत्तीचे असो अथवा नसो, स्तोत्र पठण हा सुस्पष्ट उच्चार आणि एकाग्रता यासाठी उत्तम पर्याय आहे. जितके उच्चार सुस्पष्ट तितके पुढे जाऊन विचारांमध्ये सुस्पष्टता येते. त्यादृष्टीने मुलांकडून स्तोत्र पाठ करुन घेऊन त्यांना एका जागेवर बसून ती म्हणायला लावावीत. त्यामुळे त्यांना एका जागी बसून एखादी गोष्ट पूर्ण करण्याची सवयही लागते.  

मुलांना हे सगळं करायला सांगणे, त्यांच्याकडून ते करवून घेणे यामध्ये पालकांना थकता किंवा कंटाळता कामा नये. मुलांना हे सगळे करताना सुरुवातीला बोअर होऊ शकते. पण काही काळाने त्यांना हे आवडते आणि ते यामध्ये रमतात. सुरुवातीला त्यांना अशा गोष्टी करण्याची सवय लावणे हाच एक मोठा टास्क असू शकतो. पण या काळात सहनशक्ती ठेवणे आणि सातत्याने त्यांना एक एक गोष्ट करायचा आग्रह करत राहणे, आवश्यक असते. या सगळ्याचा त्यांना भविष्यात निश्चितच फायदा होईल. 


 

Web Title: over hyper kids don't sit still? 5 remedies, children will be happy and will increase concentration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.