Join us  

आईबाबा, सल्ले नकोत; तुम्ही बदलणार का सांगा? मुलं बिघडली, ऐकतच नाहीत म्हणून फक्त दोषच द्याल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 6:09 PM

मुलांवर संस्कार कसे करायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. मुलं पालकांना पाहून शिकतात, स्वत:त बदल करायची पालकांची तयारी आहे का?

ठळक मुद्देकेवळ आम्ही करतो म्हणून तू कर, असा तर्क नवी पिढी स्वीकारेल का?

- डॉ. गौरी करंदीकर

माझ्या मैत्रिणीचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. त्याचे महत्त्वाचे दोन दिवस ठरवलेले आहेत, एक दिवस एका विषयावर चर्चा. दुसरा दिवस विश्रांती. तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा, याचं हे एक स्तुत्य उदाहरण! त्यामुळे या आठवड्याचा विषय काय असेल त्याबद्दल उत्सुकता असते आणि त्याचबरोबर एकाच विषयाकडे बघण्याचे अनेक पैलू समोर येतात. तर या आठवड्याचा प्रश्न होता, सध्याची सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बिघडत चालली आहे. वेगळी, आधुनिक होते आहे, तर अशावेळी आई-बाबांनी, आजी-आजोबांनी मुलांवर कोणते संस्कार करावेत?खरं तर याविषयावर चर्चेला सुरुवात करताना पहिलं वाक्य तसं आपल्या कुणासाठीच नवीन नाही.सध्याची सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बिघडत चालली आहे. वेगळी, आधुनिक होते आहे..खरंतर प्रत्येक पिढी हे आपल्या मागच्या पिढीबद्दल म्हणत आली आहे.आपण पुढच्या वर्गात गेलो तरी मागच्या वर्गातले मुलं-मुली आपल्यासारखे नाहीत, असे बहुतेकांना वाटते.

(Image : Google)

आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो तेव्हा तर हमखास हा विचार मनात यायचा. आपण किती कष्ट केले, किती सरळ होतो. आणि आता आपले ज्युनिअर्स.. असे अनेक विचार कम्पॅरिझनमध्येच मांडले जायचे. परिस्थिती बदलत चालली आहे, हे सत्य आहे. मात्र, ती सध्या नसून कायम बदलते आहे, याचा स्वीकार करणे मूलभूत आहे. आलेले बदल हे काही अचानक आले नाहीत. माणूस, कुटुंब आणि समाज बदल होतात. आपल्या विचारसरणीतही बदल होतात.या सर्वात मोठा बदल जर दिसू लागला असेल तर तो म्हणजे यशाची व्याख्या किंवा प्रमाण. बुद्धिमत्ता, मेहनत आणि आस्था नसून सुद्धा मिळणारे धन, प्रसिद्धी, पैसा व त्यासोबत येणाऱ्या सुखसोयी आणि त्याबरोबरची लखलख ही कुणालाही हवीहवीशी वाटणारी असते.एक किंवा दोन पिढ्यांपूर्वी या लखलखीत दुनियेपेक्षा व्यक्तीच्या कर्तृत्वाला जास्त मान दिला जायचा. त्यात काही अपवाद असू ही शकतील. मात्र, खऱ्या मार्गांनी गेले, मेहनत केली तर आपण समाजात मान आणि म्हणून सन्मान मिळवू, ही बऱ्याच अंशी लागू पडलेली गुरुकिल्ली होती. सहज किंवा अनुचित मार्गांनी पुढे येणाऱ्यांची संख्या मर्यादित होती व समाज त्यांना ओळखून होता.हळूहळू ती संख्या वाढत गेली आणि नुसतं सच्चे मार्ग निवडून पुढे येणाऱ्यांची संख्या घटू लागली!दुसरीकडे आधुनिक असणे मात्र दिसण्यावर किंवा वस्तूंवर, जीवनशैलीवर ठरवले जाऊ लागले. पाश्चात्य जीवनशैलीमुळे हे सगळं बिघडतंय, असे अनेकांच्या बोलण्यात येते पण, आपलं मूल परदेशी जाणार याचा आनंद अभिमानही आपण बाळगणार, जावई अमूक देशात आहे हे म्हणताना कुठे तरी कौतुक दिसतेच ना आणि दुसरीकडे त्यालाच नावं ठेवणार, माझ्या टीन क्लिनिकमध्ये काही उद्गार नेहमी कानावर पडतात. आमच्यावेळी ना, आम्ही मुलांना धाकात ठेवायचो! आज काल मुलं फार बिघडली आहेत. काही शिस्त नावाची गोष्ट नाही, वाटेल तसे डिमांड्स आहेत मुला-मुलींचे!पण मला सांगा, मुलं जन्मतः मोबाईल घेऊन येतात का? त्यांना बाजारात मॅगी मिळते, हे आपोआप कळते का? त्यांना कुठली पार्टी आणि थिम याचे ज्ञान उपजत असते का?किती मोठा वाढदिवस आणि रिटर्न गिफ्ट यांची किंमत माहिती असते का? केवळ आम्ही करतो म्हणून तू कर, असा तर्क नवी पिढी स्वीकारेल का?आपण किंबहुना माझ्यासारखे पालक आणि डॉक्टर नेहमी सांगतात, मुलांना मित्रत्वाच्या नात्यानं वागवा.

(Image : Google)

आपण त्यांना मैत्रीमधले नियम लावतो का?

पाश्चात्य देशात मुलांना वॉशिंग मशीन चालविणे, गार्डन स्वच्छ करणे, भांडी घासणे, घरातील सर्व कामांमध्ये मदत करायची सवय असते. आपले आजी-आजोबा, आई-वडील अशा सवयी मुलांना लावणार का? १६/१८ व्या वर्षी अमेरिकेत व्हॉलिंटीअर म्हणून काम करणे बंधनकारक असते. पैसे कमवून स्वतःचे घर, शिक्षण करणे हे बहुतांशी मुलांसाठी तिकडे कॉमनच असते.आपण आपल्या मुलांना स्वकष्टाने किमान मुलभूत गरजा भागतील इतकं तरी कमव असं कधी म्हणतो का? त्यांनी लहानसहान कामं केली तर लोक आपल्याला काय म्हणतील, याचा विचार करतो.मुलं ही उदाहरणातूनच शिकतात. त्यांच्यापुढे जे घडते त्याचे पूर्ण निरीक्षण करतात.५-१० वयापर्यंत घरातील व्यक्ती, व्यक्तिमत्त्व आणि व्यवहार बघत असतात.१०-१६ वयापर्यंत मित्रपरिवार यांची भर पडते आणि त्यांची हळूहळू स्वतंत्र मतं तयार होतात. मग त्यांच्या मनात कायम घर आणि बाहेर यात तुलना होत असते.१६-२१ ह्या वयात प्रयोग किंवा एक्सपिरीमेंटेशन ही वृत्ती तीव्र असते.मग ते त्यातून त्यांची मतं बऱ्यापैकी पक्की करतात. क्वचित काही मत पुढे बदलतात. २१ व्या वर्षानंतर त्यांच्या विचारात काही प्रमाणात परिपक्वता येते.त्याचमुळे पहिली दहा वर्षे आहार-विहार, विचार यासाठी फार महत्त्वाची ठरतात. आई-वडील ही तेव्हा वयाने आणि अनुभवाने तसे लहान असतात. घरातले चान्स घ्या म्हणाले म्हणून घेतला असं न करता, आपण आई-वडील होण्यासाठी तयार आहोत का, जबाबदारी घेणार आहोत का, याबाबत दोघांमध्ये एकमत हवं. तर हा काळ सोपा होता. पुढे मुलांच्या दहाव्या वर्षानंतर मैत्री आणि त्यांच्या प्रश्नांना न टाळता उत्तर देण्याची सवय करणे महत्त्वाचे आहे.आपण विचार केला, तर लक्षात येईल की आपल्या लहानपणापेक्षा आजच्या मुलांना डिस्ट्रॅक्शन किती जास्त आहेत, स्पर्धा पण खूप आहे, जग जवळ येत असल्यामुळे व्यवधानं अनेक आहेत.अशावेळी आई-वडील, आजी-आजोबा यांची योग्य सोबत, मैत्री आणि धाक मिळाला तर ते बाहेर माहिती आणि मतं शोधायला जाण्याची शक्यता कमी होईल.Atomic habits नावाचे एक पुस्तक आहे. त्यात जेम्स क्लिअर नावाचे लेखक म्हणतात, ‘दररोज आपण स्वत:त १ टक्के बदल केला तरी हा पॉझिटिव्ह चेंज दुसऱ्या दिवशी १.०१ होतो आणि असा रोज केला तर एका वर्षात आपल्यात ३७ पट बदल होतो. आणि अनेक वर्षे बदल केला तर तो व्याजासारखा वाढतो. एका घरातील एक व्यक्ती, एक कुटुंब, एक समाज एका वर्षात ३७ पट बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे सुरुवात स्वत:पासूनच करणं योग्य.’

 

(Image : Google)

घरात मुलांनी काही विषय मांडला, की तुला काय कळतं त्यात?

असं म्हणून त्यांना गप्प करण्यापेक्षा त्याविषयी काय चूक, काय बरोबर अशी साधकबाधक चर्चा व्हायला हवी.तंत्रज्ञान म्हणजे घरातील टीव्ही, मोबाइल आणि लॅपटॉप याचा वापर घरात कशासाठी, किती वेळ वापरला जातो, हे मुलांना पालकांच्या कृतीतून दिसायला हवं.पालकांना स्वत:ला कामाची सवय, पैसे सांभाळण्याविषयी, खर्च करण्याविषयी अनुभव, पैसे वाचविण्याचे मार्ग, आई-वडील पैशाचे नियोजन कसे करतात, याविषयी मुलांना बेसिक माहिती तरी द्यायला हवी.आपल्या संस्कृतीमध्ये, देशामध्ये, काय चांगले याचा अभिमान आपल्या कृतीतून मुलांपर्यंत पोहोचायला हवा.करिअर निवडताना फक्त ग्लॅमर, पैशांपेक्षा, मुलांची आवड हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावेळी पालकांनी समजुतीने घ्यायला हवं.मुलांसमोर कृतीतून आदर्श उभे राहायला हवेत.

(लेखिका स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :पालकत्व