Lokmat Sakhi >Parenting > तुमच्या मुलाला जेवता येतं; पण स्वयंपाक करता येत नाही? -असं का?

तुमच्या मुलाला जेवता येतं; पण स्वयंपाक करता येत नाही? -असं का?

मग काय मुलांना पण आता स्वयंपाक शिकवायचा का, असा प्रश्न पडला असेल तर, त्याचं उत्तर हो! प्रश्न घरकामाचा नाही, कौशल्य शिकण्याचा आणि कामाचा आदर करण्याचा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 05:32 PM2022-03-15T17:32:59+5:302022-03-15T17:38:08+5:30

मग काय मुलांना पण आता स्वयंपाक शिकवायचा का, असा प्रश्न पडला असेल तर, त्याचं उत्तर हो! प्रश्न घरकामाचा नाही, कौशल्य शिकण्याचा आणि कामाचा आदर करण्याचा आहे.

parenting- gender neutral skills, cooking and house work, how you teach your sons to be independent and gender sensitive? | तुमच्या मुलाला जेवता येतं; पण स्वयंपाक करता येत नाही? -असं का?

तुमच्या मुलाला जेवता येतं; पण स्वयंपाक करता येत नाही? -असं का?

Highlightsमुलांना पुष्कळ मुली, मैत्रिणी ओळखीच्या असल्या म्हणजे मुलीही आपल्यासारख्याच असतात हे त्यांच्या लक्षात येईल.

-गौरी पटवर्धन

‘आमच्या मुलीला आम्ही अगदी मुलासारखं वाढवलं!’ - आम्ही आधुनिक विचारांचे आहोत हे सांगण्यासाठीचं हे परवलीचं वाक्य. मुलांना आणि मुलींना वाढवण्यातली असमानता एकेकाळी एकूणच इतकी टोकाची होती, की या वाक्यात कोणाला काही खटकतदेखील नसे. मुलीला मुलासारखं वाढवणं म्हणजे काय तर आम्ही पालक म्हणून तिला तिच्या मनासारखं शिक्षण, त्यासाठी योग्य ते वातावरण, स्वातंत्र्य देतो! थोडक्यात सांगायचं तर आम्ही जसे आमच्या मुलाच्या प्रगतीच्या आड येत नाही, तसे आम्ही मुलीच्याही प्रगतीच्या आड येत नाही.
हळूहळू काळ बदलला. एकूण लाइफ स्कील्समध्ये मुलींच्या बाजूला जो बॅकलॉक होता तो बऱ्यापैकी भरून निघाला. पूर्वी जी कामं ‘मुलांची / पुरुषांची’ समजली जायची ती महिला अगदी नियमितपणे करू लागल्या; पण या सगळ्या प्रवासात मुले मात्र मागेच राहून गेली. मुली जशा बदलल्या तसं मुलांनाही बदलावं लागेल हे मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या वेळेवर लक्षातच आलं नाही. मुलींना टिपिकल मुलींची आणि टिपिकल मुलांची अशी सगळीच कामं येतात; पण मुलांना मात्र मुलींची समजली गेलेली कामं, कौशल्य येत नाहीत असं काहीसं चमत्कारिक चित्र निर्माण झालं. हळूहळू त्यातून असमानतेचा लंबक उलट्या दिशेला जाईल की काय?

(Image : Google)

बरं हा विषय फक्त घरकामाचा नसतो. प्रत्येक गोष्टीकडे टिपिकल पुरुषी दृष्टिकोनातून बघणं, तशाच पद्धतीची उत्तरं शोधणं, तीच योग्य असल्याचा अट्टहास बाळगणं असे अनेक कंगोरे या प्रश्नाला आहेत; पण सुदैवाने त्याचं उत्तर सोपं आहे. काही काळ मुलींना मुलांसारखं शिक्षण दिलं त्याबरोबर आता काही वर्षे मुलांना घरकामासह अनेक कौशल्य शिकविली तर मुलं-मुली कौशल्याच्या एका पातळीवर येतील.
मात्र असं सांगितलं की, लगेच पुढचा प्रश्न येतो, मग काय आता मुलांना स्वयंपाक शिकवायचा का?
-तर हो! शिकवायचा. कारण मुलांनाही जेवायला अन्न लागतं. त्यामुळे स्वतःपुरतं अन्न शिजवता येणं हे मूलभूत जीवनकौशल्य आहे. त्याचा मुलगा-मुलीशी काही संबंध नाही. इतकंच नाही, तर पुढे जाऊन आपल्या मुलाचं आयुष्य सोपं जावं असं वाटत असेल तर त्याला लहानपणापासून अनेक गोष्टी शिकवायला हव्यात; पण त्या नुसत्या शिकवून भागत नाही. ज्या मुलांचे वडील या गोष्टी करताना दिसतात त्यांना त्या शिकणं आणि आत्मसात करणं जास्त सोपं जातं.

(Image : Google)

घरात एवढं करता येईल..?

१. मुलांना प्रत्येक घरकामात सहभागी करून घ्या. स्वयंपाक, त्यातही चहा-कॉफी, उपमा, पोहे, कुकर लावणं, सोप्या भाज्या शिकवणं, कणिक मळणं, पोळ्या करणं, तयारी करणं, टेबल-ओटा आवरणं, कपडे धुणं, कपड्यांच्या घड्या घालणं, घर झाडणं - पुसणं, भाजी आणणं - निवडणं, संडास-बाथरूम-बेसिन स्वच्छ करणं, लहान बाळाला खेळवणं हे सगळं मुलांना करू द्या. त्यातून त्यांना अत्यंत आवश्यक गोष्टी शिकायला मिळतात. या रोजच्या कामांमध्ये किती वेळ जातो आणि किती कष्ट पडतात हे लक्षात येतं. जोडीदाराच्या कष्टाची त्यांना किंमत राहते.
२. ‘मुलगा असून रडतोस काय?’ असली वाक्य मुलांसमोर बोलू नका. रडणं ही मानवी भावना आहे. त्याला स्त्री-पुरुष असण्याचं बंधन नसतं. मुलगा रडला तर त्याला हसणं, त्याची चेष्टा करणं यामुळे मुले आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत आणि नंतर त्या भावनांना भलतीकडे वाटा फुटतात. मुलं तापट होतात, घुमी होतात, मूडी होतात. त्यामागे इतरही कारणं असू शकतात; पण भावनांचा निचरा योग्य प्रकारे न होणं हे त्यामागचं मोठं कारण असतं.
३. ‘मुलगा असून भातुकली असली खेळतोस?’ अशा कमेंटस्नी मुली खेळतात ते काहीतरी कमी प्रतीचं असतं असे समज मुलांच्या मनात तयार होतात. समानतेच्या पायालाच सुरुंग लागतो.

(Image : Google)

४. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या शरीरात नेमके काय बदल होताहेत हे त्यांना समजावून सांगा. या वयातली मुलं सैरभैर मन:स्थितीत असतात. त्यात त्यांना कोणी काही समजावून सांगत नाही. त्यातून अनेक प्रश्न आणि न्यूनगंड मुलांच्या मनात निर्माण होतात.
५. मुलींच्या शरीरात नेमके काय बदल होतात त्याचीही मुलांना स्पष्ट कल्पना द्या. मुलांच्या मनातलं कुतूहल योग्य मार्गाने शमलं म्हणजे त्यांना भलत्या मार्गाने चोरून चुकीच्या माहितीवर अवलंबून राहावं लागत नाही. बरोबरीच्या मुलींशी त्यांचं निकोप नातं तयार होण्याच्या शक्यता वाढतात.
६. मुलींचा नकार हा ‘नकार’च असतो हे त्यांना स्पष्ट समजावून सांगा.
७. मुलांना पुष्कळ मुली, मैत्रिणी ओळखीच्या असल्या म्हणजे मुलीही आपल्यासारख्याच असतात हे त्यांच्या लक्षात येईल.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
patwardhan.gauri@gmail.com

 

Web Title: parenting- gender neutral skills, cooking and house work, how you teach your sons to be independent and gender sensitive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.